आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनाप्रमाणे निसर्गातील वेळेवरही बरेच काही अवलंबून असते. आजकाल पर्यावरणाविषयी बरीच चर्चा होत असल्याने हवामान बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेणे योग्य ठरेल. आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येते की, फुलं बहरलेली असतात तेव्हा फुलपाखरं येणं साहजिक आहे, पुरेसं अन्न असतं तेव्हा पक्ष्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात आणि घरांमध्ये दिसणाऱ्या पाली हिवाळ्यात नाहीशा होतात. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम फ्रंटियर्स २०२२ अहवालाचा शेवटचे प्रकरण फेनोलॉजीबद्दल आहे. फेनोलॉजी हे जैविक घटनांच्या अशाच टायमिंगचे विज्ञान आहे.
जगाच्या ज्या थंड भागात ऋतूंचे विभाजन स्पष्ट आहे तिथे उष्णकटिबंधीय प्रदेशांपेक्षा फेनोलॉजीचा अधिक अभ्यास केला गेला आहे. निसर्गाची टायमिंग विस्कळीत झाल्यास संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा परिणाम होतो. उदा. आशियामध्ये आढळणारा ग्रेट टिट हा एक पक्षी आहे. पिल्ले त्याच्या अंड्यातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या अन्नासाठी मोठ्या संख्येने सुरवंटांची आवश्यकता असते. अनेक भागात उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाल्याने या पक्ष्यांची पिल्ले वेळेआधीच अंड्यातून बाहेर पडतात, मात्र त्या वेळी सुरवंटांची पैदास होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पिल्लांसाठी अन्नाचे संकट निर्माण होते.
वाढत्या तापमानामुळे विविध प्रजातींचे प्राणी आणि पक्ष्यांच्या स्थलांतरावरही परिणाम होत आहे. मोनार्क फुलपाखरू हिवाळ्यात कॅनडा ते मेक्सिकोपर्यंत सुमारे ४००० किमी प्रवास करतात, परंतु जास्त तापमानामुळे त्यांचा नियोजित स्थलांतर कालावधी दर दशकात सहा दिवसांच्या दराने पुढे जात आहे. या विलंबामुळे अनेक फुलपाखरे उबदार भागात पोहोचू शकत नाहीत. कारण तेच- टायमिंग बदलल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या.
कोणत्याही शेतकऱ्याला पिकांबद्दल विचारा, तो सांगेल की, दीर्घ उन्हाळा किंवा उशिरा पडणाऱ्या पावसाचा परिणाम उत्पादनावर होत आहे. वनस्पती या बदलाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. ऋतूंच्या मनमानीमुळे जगात मुख्य पिकांचे जीवनचक्र बदलत आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या विविधतेवर आणि शेतकऱ्यांच्या निर्णयांवर होतो. हे निर्णय माती, कीटक, पिके इत्यादींशी तसेच दीर्घकाळात ते अन्नाच्या उपलब्धतेशी संबंधित आहेत.
जगाच्या अनेक भागांमध्ये सागरी जीव किंवा मासे यांच्या अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत, हे तुम्ही ऐकले असेलच. पाण्यातील वाढत्या तापमानामुळे होणारे वेळ-बदल पृथ्वीच्या तुलनेत अधिक वेगाने दिसून येतात. भारतातील कुमाऊं भागातील महत्त्वाच्या वन्य वृक्षांच्या जीवनचक्रावरही याचा परिणाम झाला आहे.
आपण हे समजून घेतले पाहिजे की, हवामान बदलामुळे आपले दैनंदिन जीवन तर कठीण होत आहेच, पण आपल्या सभोवतालच्या सजीवांच्या जीवनचक्राच्या वेळेवरही त्याचा परिणाम होत आहे. असा परिणाम झालेले प्राणी आणि वनस्पती समायोजित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु नेहमीच यशस्वी होत नाहीत. या विसंगतीचे दीर्घकालीन परिणाम आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतात. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) साधना शंकर लेखिका आणि भारतीय महसूल सेवा अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.