आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृदिन विशेष:माझ्यातली सुप्तावस्थेतली ‘फादर फिगर’

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाप होण्याची भावना मनात निर्माण होण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष बाळाचे बाप होणं किंवा पुरुष असणंही गरजेचं नसतं. कारण बाप या भावनेला कोणतंही बंधन मान्य नसतं, अगदी लैंगिकही. काळानं जबरदस्तीने सोपवलेली बापपणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका ‘फादर फिगर’चा हा अनुभव...

आमच्या घरी आमची आई, मी, माझी बहीण आणि तिची मुलगी असे चौघं राहतो. बहिणीच्या प्रसूतीनंतर आठवडाभरातच त्या लहानग्या जिवाला एका रात्री माझ्याजवळ झोपावं लागलं आणि त्या क्षणी माझ्या मनात एका बापाचा जन्म झाला. पुढे बरेच दिवस तो सुप्तावस्थेतच होता. साधारण वर्षभराने आम्ही सगळे एका जत्रेत गेलो. तिथे वेगवेगळे आकाशपाळणे आलेले होते. मी आणि माझी बहीण आम्ही दोघंही एकेका पाळण्याची सैर करायला लागलो. आकाशपाळण्यानंतर आम्ही जमिनीसरशी गोल फिरणाऱ्या एका तबकडीत बसलो. चार/पाच महिन्यांचं बाळ कडेवर घेऊन आई कठड्याबाहेर उभी होती. पाळणा गोल फिरत होता, आई आणि बाळ आमच्याकडे पाहत होते. सुरुवातीला आम्ही त्यांना दिसत होतो. वेग वाढत गेला तसतसे आम्ही त्यांना दिसेनासे झालो. बाळाला कडेवर घेऊन एकटी उभी असलेली आई मला दिसत होती; पण बाळासह तिची नजर भिरभिरत आम्हाला शोधत होती. हे लक्षात आलं आणि कधी एकदा ह्या फेऱ्या थांबतायत आणि पाळण्यातून उतरतोय असं मला वाटायला लागलं. पुढची प्रत्येक फेरी जीवघेणी ठरत गेली. पाळणा थांबला आणि मी त्यातून उतरलो ते कायमचं. पुन्हा कधीही कोणत्याही राक्षसी पाळण्यात बसलो नाही. माझ्या मनात जन्मलेला बाप आकार घेत होता.

बाप होण्याची भावना मनात निर्माण होण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष बाळाचे बाप होणं किंवा पुरुष असणंही गरजेचं नसतं. कारण बाप या भावनेला कोणतंही बंधन मान्य नसतं, अगदी लैंगिकही. दोन महिन्यांपूर्वी मुंबईत पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उषा मंगेशकर म्हणाल्या की, ‘आमचे बाबा वारले आणि काही दिवसांतच आमची दीदी साडी नेसून आमचे बाबा होऊन कामावर जायला लागली.’ ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या भावंडांच्या, तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या किंवा सहकाऱ्यांच्या सुरक्षेचा, मग ती सुरक्षा आर्थिक असो, सामाजिक असो किंवा भावनिक असो, त्या सुरक्षेचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात तुमच्याही नकळत एका बापाने जन्म घेतलेला असतो. इंग्रजीत ‘फादरफिगर’ असं एका शब्दात या भावनेचं यथार्थ वर्णन केलंय.

गर्दीत चालताना सोबतच्याचा हात घट्ट धरणं, स्वत: रहदारीच्या बाजूने चालून सोबतच्याला सुरक्षित करणं, बसमध्ये खिडकीजवळ न बसता कडेला बसणं, प्रवासात तुलनेने जड असलेली बॅग आपण उचलणं, रेल्वे प्रवासात लहानग्यांना विशेषत: मुलींना सुरक्षेच्या कारणामुळे वरच्या बर्थवर झोपवणं, रात्रीच्या प्रवासात स्वत:च्या झोपेला आवर घालणं, असे विचार आणि त्याबरहुकूम कृती आपल्या मनातला बापच करत असतो. व्यक्तीच्या मनात ती स्त्री असेल तर वात्सल्याची भावना जशी उपजतच असते तशीच पुरुषाच्या मनात संरक्षकाची भूमिका उपजतच असते. धाकट्या बहिणीला खेळताना कोणी पाडलं की त्याला दोन रट्टे देण्याच्या रूपात ती अधूनमधून व्यक्त होत असते. आई म्हणजे कोमल भावना आणि बाप म्हणजे कणखर प्रवृत्तीचा.. ही संकल्पना तर आता बाजूला पडलीये. बापाची संवेदनशील प्रतिमा आता पुढे येतेय. ‘अहो’ बाबापासून ‘अरे’ बाबापर्यंतचा मोठा पल्ला बापाने पार केलाय. बाबा आता मुलांचा मित्र होतोय, आईच्या अपरोक्ष स्वयंपाक करून खाऊ घालतोय. प्राण्या-पक्ष्यांमध्येही ही बाब तर पूर्वीपासून दिसून येते. धनेश पक्ष्यात मादी झाडाच्या ढोलीत स्वत:ला बंद करून अंडी उबवून पिल्लं मोठी करते, तोवर नरपक्षी शिकार करून मादी आणि पिल्लांचं पोषण करतो. सी हॉर्ससारखा छोटासा जलचर पिल्लांना आपल्या पोटातल्या पिशवीत सुरक्षित ठेवतो. नुकताच एका व्याघ्र अभयारण्यातला व्हिडिओ समोर आलाय. एका वाघिणीच्या मृत्यूनंतर तिचे काही महिने वयाचेच बछडेही मरण पावतील अशी भीती असताना त्यांचा बाप असलेला वाघ त्यांच्यासाठी शिकारीतला वाटा घेऊन येत असल्याचं या व्हिडिओत दिसलं आणि वाघाबद्दलचे गैरसमज बऱ्याच प्रमाणात दूर झाले.स्त्री ही अनंतकाळची माता असते तसंच बाप होणं ही अनंतकाळ चालणारी प्रक्रिया असते. आपल्या मनात बापाने जन्म घेण्यासाठी एखादा क्षण पुरेसा असतो, पण तो बाप पुढे आयुष्यभर घडत असतो, घडवत असतो. कधी कधी काळाने जबरदस्ती सोपवलेली बापपणाची जबाबदारी सांभाळताना नवशिक्या बापाची तारांबळ उडते. अशा वेळी आपल्या गेलेल्या वडिलांकडे मन मोकळं करताना तो म्हणतो... हल्ली मी बसमध्ये खिडकीजवळ नाही, विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यावर बसतो. ‘तिकीट’ म्हणत कंडक्टर माझ्याच तोंडासमोर हात नाचवतो. अपरात्री वाजलेली डोअर बेल अनोळखी गावांचे अवचित प्रवास आणि सामानाच्या जड पिशव्यांना हल्ली मीच सामोरा जातो ऑफिसमध्ये कामाचा ताण आळसावलेली सुटीची सकाळ आणि महिनाअखेरची घालमेल हल्ली मलाही जाणवते गोल फिरणारा आकाशपाळणा वेगाचं आव्हान देणारा रिकामा रस्ता झगझगत्या दुकानातले नवे कोरे बूट हल्ली खुणावत नाहीत मला तुमच्या माघारी सगळंच बदलून गेलंय...बाबा

हर्षवर्धन दीक्षित संपर्क : ९८८१२२३६७५

बातम्या आणखी आहेत...