आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक - प्रशासन:‘माहिती’चा प्रवाहो चालला!

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुसंख्य सरकारी कार्यालयांत ३० ते ३५ वर्षे नोकरी केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपण एवढ्या वर्षांत कोणते काम केले, हे सांगता येत नाही. त्यातील अनेकांना, आयुष्यभराचा कालावधी वरिष्ठांनी प्रपत्रात मागितलेली माहिती भरण्यात निघून गेला, असे सांगता येऊ शकते. हल्ली एका पत्रावरून दुसरे पत्र कॉपी-पेस्ट करून संगणकावर टाइप करीत असल्यामुळे या विषयात नव्या मुद्द्यांची भर पडली आहे. पण, वारंवार पाठवल्या जाणाऱ्या या माहितीचे पुढे काय होते, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा!

को णत्याही सरकारी खात्यात, कोणत्याही वेळी पूर्णवेळ अन् सातत्याने, अखंडपणे कोणते काम चालू असेल तर ते म्हणजे माहिती भरण्याचे काम. पूर्वी इंटरनेट नव्हते तेव्हा उभ्या-आडव्या तक्त्यांत दिवसभर कुठली तरी माहिती हाताने किंवा टाइप करून विविध प्रपत्रांत भरण्याचे काम चालत असे. ६ गठ्ठे पद्धत आल्यानंतर ‘पीआरए’ आणि ‘पीआरबी’ नावाचे नियतकालिक माहिती पाठवण्याचे रजिस्टर ठेवले जाई. यात दररोज, दर आठवड्याने, दर पंधरवड्याने, दर महिन्याला, दर तीन महिन्याला, सहामाही आणि वार्षिक कोणकोणती माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठवावी व त्यासाठी कोणत्या नमुन्यात कनिष्ठांकडून माहिती मागवावी, याच्या नोंदी ठेवल्या जायच्या. नोकरशाहीत एकदा ‘माहितीचे प्रपत्र’ सुरू झाले की, ते परत कधीही बंद होत नाही. अगदी त्या माहितीची गरज संपुष्टात आली तरी! राज्यातील एका भागात गारपीट झाली की, सर्व जिल्ह्यांतून दर तीन दिवसांनी, सात दिवसांनी ‘गारपीट’चे प्रपत्र मागवले जाते. शिवाय, वरिष्ठ कार्यालय स्वत:चे काम कमी करण्यासाठी २/३ प्रतींमध्ये ही माहिती मागवते. ज्या तालुक्यात / जिल्ह्यांत गारपीट झालेली नाही, त्यांनासुद्धा “निरंक’ असे लिहून ३ प्रतींमध्ये कागद खर्च करायला लावतात. गारपीट बंद होत नाही, तोवर जर कुठे भूकंप झाला तर भूकंपाचे रिटर्न सुरू होते. वारंवार पाठवल्या जाणाऱ्या या माहितीचे पुढे काय होते, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा! एखादी माहिती आली नाही, तर त्याला स्मरणपत्र किंवा मेमो देतात. पण, जी माहिती आली आहे, तिला मात्र अनेकदा केराची टोपली दाखवतात! एका जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याच्या वेळी कलेक्टर कचेरीतील एका कर्मचाऱ्याची पूर्ण रात्र शेळ्या, मेंढ्या, मोठी जनावरे, छोटी जनावरे, पिके, पिकांखालील क्षेत्र अशी वेगवेगळ्या रकान्यात माहिती भरताना आणि गावनिहाय बेरीज करताना अक्षरश: दमछाक झाली. काहीही केले तरी आकडे काही जुळेनात. गाई, बैल, मेंढ्या, शेळ्या इत्यादी प्राणी मयत किती आणि जखमी किती, याची माहिती तो भरत होता. मध्येच एका तालुक्यातून आलेल्या माहितीमध्ये २ घोडे, ३ हत्ती, ४ मोर, १ वाघ, ३ माकडे, ४ सिंह, १५ पोपट अशी आकडेवारी त्याने पाहिली. त्याला फार राग आला. त्याने रागारागाने मध्यरात्री तहसीलदारांना फोन लावला. ते म्हणाले, “मला पण माहीत नाही. मी सही केली असली, तरी तलाठ्याला विचारून सांगतो.’ त्यांनी तलाठ्याला बोलावणे पाठवले. मध्यरात्री तलाठी धावत-पळत तहसील कार्यालयात आला अन् त्याने सांगितले, ‘गारपीट झाली, तेव्हा गावात एक सर्कस आली होती. त्यामुळे मी केलेला पंचनामा आणि माहितीसुद्धा योग्य आहे!’ पूर्वी माहिती विचारताना तारेद्वारे प्रपत्रात माहिती मागितली जायची. त्या वेळी फॅक्स किंवा ई-मेल नव्हता. कृषी विभागाच्या बैठकीत एका अशासकीय तज्ज्ञ सदस्याने, ‘वृक्ष लागवड कार्यक्रमात चारा देणारी झाडे विभागाने लावावीत,’ अशी सूचना केली. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांना चारा देणारी झाडे किती लावली, याची माहिती देण्यास सांगण्यात आले. पत्र पाठवले तेव्हा ‘चारा देणारी झाडे’ऐवजी ‘वारा देणारी झाडे’ अशी टायपिंगची चूक झाली! बहुतेक जिल्ह्यांनी, ‘जिल्ह्यातील एकही झाड हे वारे देण्यास तयार नाही, कारण लावण्यात आलेली रोपे केवळ दोन महिन्यांची आहेत’, असे उत्तर पाठवले!! आणखी वरिष्ठ सरकारी अधिकारी सकाळी ऑफिसला आले की, एखाद्या विषयाची माहिती उभ्या प्रपत्रात भरायला सांगत. दुपारनंतर तीच माहिती रकाने आडवे करून भरायला लावत. त्यामुळे सर्व स्टाफने त्यांचे नाव ‘उभे-आडवे साहेब’ असे ठेवले होते! बहुसंख्य सरकारी कार्यालयांत ३० ते ३५ वर्षे नोकरी केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपण एवढ्या वर्षांत कोणते काम केले, हे सांगता येत नाही. त्यातील अनेकांना, आयुष्यभराचा कालावधी वरिष्ठांनी प्रपत्रात मागितलेली माहिती भरण्यात निघून गेला, असे सांगता येऊ शकते. हल्ली एका पत्रावरून दुसरे पत्र कॉपी-पेस्ट करून संगणकावर टाइप करीत असल्यामुळे या विषयात नव्या मुद्द्यांची भर पडली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहिती गोळा करण्याच्या कार्यपद्धतीनुसारही खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते... { जेवढी माहिती मागितली आहे, तेवढीच कनिष्ठ अधिकाऱ्याला मागणारे अधिकारी. { जास्त आणि अनावश्यक माहिती विनाकारण मागवणारे अधिकारी. { वरिष्ठांनी माहिती मागितली, तर कोणतीच माहिती न पाठवणारे अधिकारी. { इतर अधिकाऱ्यांनी कोणती माहिती पाठवली आहे, ती पाहून माहिती पाठवणारे अधिकारी. { वरिष्ठांना मोठेपणा देऊन, ‘तुम्हीच सांगा माहिती कशी द्यायची?’ अशी विचारणा करणारे अधिकारी. { महत्त्वाची माहिती मागितली तर कार्यालयातून दौऱ्यावर निघून जात “आता बसा बोंबलत..” म्हणणारे अधिकारी! अशा सगळ्या तऱ्हांमुळे, अनेक वर्षे काम केलेले काही अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर मुला-बाळांनाही प्रपत्रात माहिती विचारत असल्याचे ऐकिवात आहे! शेखर गायकवाड shekharsatbara@gmail.com