आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:विस्मृतीत गेलेली ‘हंटरवाली’...

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेल स्पेंडर या स्त्रीवादी अभ्यासिकेच्या मते, प्रस्थापित पितृसत्ता तिच्या मूल्यव्यवस्थेच्या विरोधी कार्य करणाऱ्या अथवा तिला कमकुवत करू शकेल, अशा कार्यकर्तृत्वाला विस्मृतीत ढकलते. ‘हंटरवाली’ हे त्याचेच उदाहरण.

“हं टरवाली’ म्हणजेच ‘फियरलेस नादिया’ हे नाव आपल्यापैकी बहुतांश जणांनी कदाचित ऐकले नसेल. इतिहास लेखनातील पितृसत्ताक ज्ञानसंरचनेमुळे हे नाव माहीत नसणे अतिशय स्वाभाविक आहे. डेल स्पेंडर या स्त्रीवादी अभ्यासिकेच्या मते प्रस्थापित पितृसत्ता तिच्या मूल्यव्यवस्थेच्या विरोधी कार्य करणाऱ्या अथवा तिला कमकुवत करू शकेल अशा कार्यकर्तृत्वाला विस्मृतीत ढकलते. ‘हंटरवाली’ हे त्याचेच उदाहरण. ‘हंटरवाली’ अर्थात फियरलेस नादिया हे हिंदी चित्रपटसृष्टीतील तीस-चाळीसच्या दशकातील झंझावाती पर्व. फियरलेस नादियाचे मूळ नाव मेरी अँन इव्हान्स. हिचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे झाला. वडील ब्रिटिश सैन्यामध्ये मुंबईत नियुक्त असल्याने तिचं बालपण भारतातच गेलं. लहानपणीच तिला घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकचं प्रशिक्षण देण्यात आलं. भारतात जेव्हा तथाकथित चांगल्या, उच्चशिक्षित घराण्यातील स्त्रिया चित्रपटात काम करायला पुढे येत नव्हत्या तेव्हा अनेक विदेशी नायिका हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होत्या. विदेशी मूळ असलेल्या नादियाला मूव्हीटोन स्टुडिओच्या भाभा बंधूंनी ‘देश दीपक’ या चित्रपटात सर्वप्रथम गुलाम मुलीच्या पात्रासाठी अभिनयाची संधी दिली. ‘हंटरवाली’ हा नादियाचा मुख्य भूमिकेतील पहिला चित्रपट तुफान लोकप्रिय झाला.

प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद तिच्या चित्रपटांना मिळत असे. नादियाच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये नादिया ही मुख्य भूमिकेत असे आणि चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी नादिया ही पहिली अभिनेत्री होती. पारंपरिक भाषेत सांगायचे म्हणजे नादिया या चित्रपटांची ‘हीरो’ असायची. नादिया ही होमी भाभांच्या मूव्हीटोन स्टुडिओची स्टार अभिनेत्री होती. नादियाने ‘हंटरवाली’सह चाळीसहून अधिक हाऊसफुल्ल सुपरहिट चित्रपटांची मालिका हिंदी चित्रपटसृष्टीला दिली. घोडेस्वारी, धूम सायकल चालवणे, चालत्या ट्रेनवरून पळणे, उडी मारणे, हेssss असे म्हणत हाक मारणे, मोठ्याने ओरडणे, खलनायकाला उचलून गरगर फिरवून फेकून देणे, वाघ-सिंहाचा जबडा फाडणे, अन्यायाविरोधात लढणे, स्त्रियांच्या अधिकारांविषयी बोलणे अशा सर्व प्रकारच्या भूमिका ज्या हिंदी चित्रपटातील नायिका आजही क्वचित साकारताना दिसतात त्या सर्व भूमिका नादियाने हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत केल्या. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचे स्ट्ंटस किंवा भूमिका करताना नादियाने कधीच डमी कलाकार वापरले नाहीत. सर्व स्टंट्स ती स्वत:च करत असे. स्टंट दृश्ये चित्रित करत असताना नादिया अनेक वेळेस जखमीसुद्धा झाली, मात्र तरी ती डगमगली नाही. त्यामुळेच होमी वाडियाने नादियाचे नामकरण ‘फियरलेस नादिया’ असे केले. सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे हे नादियाच्या चित्रपटांचे प्रमुख विषय असत. चित्रपटांमध्ये तिचा आवडता कुत्रा, कार आणि घोडा असायचे. कुत्र्याचे नाव गन्बोट, घोड्याचे ‘पंजाब का बेटा’ आणि कारचे नाव ‘रोल्स रॉयल्स की बेटी’ असे. असा रुबाब आजवर कोणत्याच हिंदी चित्रपट नायिकेला प्राप्त झालेला दिसत नाही.

आज जागतिकीकरणाच्या काळात अनेक चित्रपट कलाकार व्यावसायिक उत्पादनाचे स्टार ब्रँड झालेले दिसतात, मात्र तीस-चाळीसच्या दशकांतच नादिया अनेक प्रॉडक्ट्सची स्टार अॅम्बेसडर होती. नादियाच्या भूमिका या रझिया सुलताना, राणी लक्ष्मीबाई, चांदबीबी, अहिल्याबाई होळकर इ. भारतीय वीरतेचं रुपेरी पडद्यावरील प्रतीकात्मक चित्रण असल्याने नादिया ही स्वातंत्र्यलढ्यातील भारतीय स्त्री सामर्थ्याचं आणि स्वातंत्र्य चळवळीचं प्रतीक होती. नादिया ही खऱ्या अर्थाने बॉलीवूडची पहिली ‘सुपरस्टार’, ‘सुपर हिरोइन’ (आपल्याला फक्त ‘सुपर हीरो’चीच कल्पना अवगत असली तरी..) ‘बॉक्स ऑफिस क्वीन’ होती आणि या सर्व चित्रणामध्ये कुठेही स्त्री देहाविषयीची लैंगिक बीभत्सता, ओंगळता अथवा अवघडलेपण नसल्याने पडद्यावर नादियाला बघताना प्रेक्षकांच्या नजरा तिच्या शरीरावर खिळून न राहता मनसोक्तपणे-सहजतेने नादियाच्या अभिनयाचा आंनद घेतात. स्त्रीदेह आणि स्त्रीत्वाच्या चित्रणाला पुरुषी नजरेच्या परे चित्रित करणाऱ्या नादियाच्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून नादियाचे हे महत्त्वपूर्ण योगदान म्हटले पाहिजे.

स्त्रीवर पितृसत्तेने लादलेल्या सर्व मर्यादांना अव्हेरून स्त्रीचं मानवी ऊर्जेनं ओतप्रोत भरलेलं सामर्थ्यपूर्ण अस्तित्व पडद्यावर उभं करणारी ‘हंटरवाली’ आज हिंदी चित्रपटाच्या इतिहासात आणि आपल्या स्मृतिपटलावर मात्र क्वचितच कुठे दिसते. फियरलेस नादियाने साकारलेल्या भूमिका खऱ्या अर्थाने स्त्रीचं दुय्यम, दुर्बल, नाजूक, स्वत्वहीन, स्वरहीन, असहाय पुरुषकेंद्री, पुरुषावलंबी पत्नी, माता, कुलटा अथवा लैंगिक उपभोगाची वस्तू याच कक्षेत स्त्रीचं अस्तित्व रुजवणाऱ्या पितृसत्ताक व्यवस्थेत निर्भीड, स्वतंत्र, सामर्थ्यशाली विचार आणि शरीराची स्त्री प्रतिमा साकारतात, ज्या साहजिकच शोषित, अबला अथवा लैंगिक उपभोग्य वस्तूच्या द्वैतात कल्पिणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला गैरसोयीची आणि धोकादायक ठरते. पितृसत्ताक हितसंबंधांना आव्हान देणाऱ्या किंवा स्त्रीत्वाच्या पितृसत्ताक धारणांविरोधी कार्यकर्तृत्व करणाऱ्या स्त्रियांना एकतर बदनाम केले जाते किंवा त्यांचे अस्तित्वच विस्मृतीत ढकलले जाते. भारतीय चित्रपट निर्माते व चित्रपट समीक्षकांच्या जाणिवनेणिवेतील पितृसत्ताक प्रभावामुळे फियरलेस नादियाचा झंझावाती वारसा विस्मृतीत ढकलला गेलाय. परिणामत: सक्षम शरीर लाभलेल्या स्त्री नायिका ‘बचाव बचाव’ किंवा ‘मेरे करण अर्जुन आयेंगे’ म्हणत असहायपणे नायकाची वाट बघणाऱ्या कठपुतळ्या बनण्यापलीकडे स्वत:ची एजन्सी/कर्तेपणात वापरताना दिसत नाहीत. हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिणारे तसेच चित्रपट समीक्षकदेखील ‘स्टंट नायिका’ या ओझरत्या उल्लेखात दोन ते तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर गारूड घातलेल्या या हंटरवालीची भलावण करतात आणि स्त्रीत्वाचे खऱ्या अर्थाने सहज मनस्वी सबल क्रियाशील नादियाचे प्रारूप दुर्लक्षित करतात. प्रभुत्वशाली नायिकेचे असे चित्रण पेलण्याचे सामर्थ्य चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्येदेखील नसल्याने स्त्रीला शोषित, असहाय अथवा लैंगिक उपभोग वस्तूच्या परे निर्भीड मनस्वी स्त्रीत्वाचा उत्सव करणारे चित्रपट व नायिका निर्माण होऊ शकले नाहीत.

फियरलेस नादियाच्या चित्रपटांचे चिकित्सक पुनर्वाचन पुनरावलोकन करून स्त्रीत्वाच्या झंझावाताची प्रतिमा वर्तमानात ‘रोल मॉडेल’ म्हणून प्रस्थापित करणे हेच पितृसत्ताक-ज्ञानसत्ताकारणाच्या दुजाभावाचा खरा प्रतिवाद ठरेल. तीस-चाळीसच्या दशकात नादिया तिच्या चित्रपटांमध्ये ज्या भूमिका साकारते तशाच भूमिका हिंदी चित्रपटांमध्ये जेव्हा पुरुष नायक साकारतो तेव्हा तो बॉलीवूडचा ‘अँग्री यंग मॅन,‘शहेनशहा’ ठरतो अन् नादिया मात्र ‘स्टंट वुमन’ का ठरते या पितृसत्ताक भेदभावात्मक समीक्षा निकषांची चिकित्सा करणे त्यामुळेच गरजेचे ठरते. भारतात बॉलीवूडच्या या ‘हंटरवाली’चा झंझावात अजूनही अज्ञात आणि दुर्लक्षित असणे हे निश्चितच खेदजनक आणि संतापजनकही...

निर्मला जाधव संपर्क : nirmalajadhav@gmail.com

बातम्या आणखी आहेत...