आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Gift Of Nature Is The Same For All | Article By Channaveer Bhadreshwarmath

संतवचने आणि वर्तमान:निसर्गाची देणगी सर्वांना समानच

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावे शतक हे बसव युग म्हणून ओळखले जाते. याच काळात जेडर दासिमय्या नावाचे ज्येष्ठ कवी आणि संत होऊन गेले. खुद्द महात्मा बसवण्णा दासिमय्यांचा आपल्या वचनात ज्येष्ठ शरण म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करतात. असे जेडर दासिमय्या आपल्या वचनांत म्हणतात, भूमी- मीन, प्राणवायू- हवा, पाणी, पेरा आणि पेरणीनंतर होणारी रास हे सारं ईश्वरी देणगी आहे. जगन्नियंत्याने म्हणजेच निसर्गाने माणसाला जे दिलं ते सारं दान आहे. म्हणूनच आपण जे काही खातो, वापरतो हे सारं देवानं दिलेलं आहे. त्यावर सर्वांचा समान अधिकार आहे. ते देवाकडून मिळालेलं दान. संपूर्ण सृष्टी अखिल प्राणिमात्रांच्या हक्काची, मालकीची असताना मूठभरांनी ती मालकी हक्काने आपल्या अधिपत्याखाली अविरत ठेवावी याचेच आश्चर्य मानावे लागेल. म्हणूनच जे मुळातच आपलं नाही, ते निसर्गाने दिलेलं आहे, त्यावर मालकी हक्क दाखवत इतरांना मज्जाव करणाऱ्यांंचा बसवण्णा आणि शरणांनी तीव्र शब्दांत विरोध केलाय.

हे सार आठवण्याचं कारण म्हणजे या महिन्यात गाजत असलेली बातमी. शिक्षकांनी केलेल्या मारहाणीत ९ वर्षांच्या शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. मारहाण इतकी भीषण होती की त्याच्या कानातील नसा तुटल्या. मुख्याध्यापकांच्या पाण्याच्या माठाला शिवल्याची किंमत त्याला स्वत:च्या जिवानिशी चुकवावी लागली. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील खाजगी शाळेतील या घटनेचे देशात पडसाद उमटले. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असताना अशा घटनांची पुनरावृत्ती होणे अतिशय क्लेशकारक आहे. धर्म ही माणसाच्या जगण्याची एक रीत, शैली असली तरी धर्मातील आचरण तत्त्वांच्या अविवेकी अतिरेकी अवलंबामुळे माणसा-माणसातले स्पृश्य-अस्पृश्य भेद अधिक बळकट झाले. कर्मपरत्वे तिचे स्वरूप न राहता ती जन्मपरत्वे होऊन बसली. माणसातील भेदनीतीचा पाया मजबूत होत गेला. एकंदरीत काही माणसांचे माणूसपणच नष्ट होऊन ते कलंकित जिणे जगत होते. याच पार्श्वभूमीवर महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकात सुरू केलेल्या समतेच्या चळवळीचा आणि समग्र क्रांंतीचा अभ्यास करावा लागेल. बसवण्णा आणि शरणांनी जातीवर आधारित भेद नाकारले. स्त्री-पुरुष भेद नाकारले. कर्मकांड नाकारले. इतकेच नव्हे तर वेदप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य नाकारत माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील अनुभवांना केंद्रबिंदू मानले. दासिमय्या यांच्याप्रमाणेच जमीन आणि पाण्यावरील सार्वजनिक मालकी सांगताना बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात, जमीन एकच आहे हो दलित वस्ती आणि शिवालयासाठी पाणी एकच आहे हो पूजेचे आचमन आणि शौचासाठी कुळ एकच आहे हो स्वत:ला जाणून घेणाऱ्यांसाठी मार्ग एकच आहे हो कूडलसंगमदेव तुम्हाला जाणून घेण्यासाठी कुडलसंगमदेव बसवण्णांचे आराध्य दैवत. कुडलसंगमदेवाने म्हणजेच जगत्नियंत्याने - निसर्गाने मानवामानवांत कोणतेही भेद केले नाहीत. त्याला स्त्री आणि पुरुषातील लिंगभेदही मान्य नाही. आकाश, जमीन, पाणी, अग्नी, वायू या पंचमहाभूतांनी कोणताच भेद केला नाही. मंदिर काय, दलित वस्ती काय, इथून तिथून जमीन सारखीच. तीच कथा पाण्याची. पूजेसाठी, पिण्यासाठी, आंघोळीसाठी आणि शौचासाठीही पाणी एकच. पाणी म्हणजे पाणी. स्वत:ला जाणून घेणाऱ्यांचे कुळ एकच होय. इथे जातीपातीला थारा नाही. कारण कूडलसंगमदेवास जाणून घेण्यासाठी तुमच्यातील समर्पणभाव, निस्सीम भक्ती महत्त्वाची असून तुमची जात, लिंग वा कुळ महत्त्वाचे नसल्याचे बसवण्णा सांगतात.

दुसऱ्या एका वचनात बसवण्णा म्हणतात भेदभाव मानवनिर्मित आहे. केवळ स्त्री किंवा खालच्या जातीचा म्हणून अग्नीचा दाह कमी अथवा अधिक जाणवत नाही. निसर्ग सर्वांना समाज संधी आणि न्याय देतो. परंतु मानवानेच जाणीवपूर्वक भेदभाव निर्माण केले. यामागे मूठभर लोकांचा स्वार्थ असल्याचे सांगण्यास बसवण्णा विसरले नाहीत. जन्माच्या नव्हे, श्रमाच्या-कामाच्या वर्गवारीतून त्या व्यक्तीची ओळख असावी, असा आग्रह बसवण्णांनी धरला होता. लोखंड तापवून लोहार झाला, कपडे धुऊन परीट झाला, अशी श्रमाधिष्ठित व्यवस्था ते मांडतात.

ईश्वराबद्दल बसवण्णा म्हणतात पाण्याच्या प्रवाहाचा आणि वृक्षाच्या हिरवाईचा कर्ता तूच आहेस. तरीही तुझ्याकडे दुर्लक्ष करून साजरी होणारी भक्ती दिखाऊ स्वरूपाचीच म्हणावे लागेल. बसवण्णांनी जातिसंस्था झुगारली. कर्माधिष्ठित समाजनिर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला होता. केवळ जन्माने कोण श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. त्या-त्या व्यक्तीचे कर्तृृत्व त्याने जन्म घेतलेल्या जात व कुळामुळे नसते. व्यक्तीच्या जातीचा आणि कुळाचा त्याच्या विद्वत्तेशी आणि कर्तृत्वाशी संबंध नसल्याचे बसवण्णा सांगतात. यासंदर्भात अल्लमप्रभुदेव, अक्कमहादेवी, सिद्धरामेश्वर यांच्यासह इतर अनेक शरणांनी भेदाभेद नाकारत समतेचा जागर केला आहे. योगियांचे योगी अल्लमप्रभुदेव आपल्या एका वचनात म्हणतात, आकाशात एक सरोवर आहे, ज्या सरोवरातून गुहेश्वर सर्वांसाठी पाणी देतो, त्याच पाण्याची देवासाठी आणि माणसासाठी अशी वर्गवारी करणाऱ्यांना नरक चुकले नाही पाहा. अशा शब्दांत पावसाची सार्वजनिकता अल्लमप्रभूंनी स्पष्ट केली आहे. पाणी, जमीन, वायू आणि अग्नी यांच्याकडे सर्वांसाठी समान न्याय असल्याचे करूळ केतय्या नावाचे शरणा आपल्या वचनात सांगतात. तर उन्हाचे चटके आणि थंडीचा कडाका प्रत्येक माणसाला समानच जाणवतो. ठराविक कुळाचा म्हणून उन्हाचे चटके बसणार नाहीत, असे घडत नसल्याचे वैराग्यज्योती अक्कमहादेवी म्हणतात. स्वत:च्या अधिकारासाठी आणि स्वार्थासाठी माणसानेच माणसामाणसांत भेद निर्माण केले. बलवानाने गरीब आणि दुबळ्यास स्वत:च्या अंकित ठेवले. त्याला आपला दास केले. सेवक बनवले. याच शोषणाच्या व्यवस्थेतून समाजात विशिष्ट वर्ग-वर्ण व्यवस्था निर्माण केली. अखेर ती व्यवस्था प्रथा म्हणून पाळणे, परंपरा म्हणून धर्माधिष्ठित ठेवणे हे सक्तीचे केल्याने माणुसकीचा घात झाला. आज विज्ञानाने कवेत घेतलेल्या जगातही कुणाकडूनही शिवाशीव पाळली जाणे ही बाब विकृतीच अधोरेखित करणारी आहे. आपण देश म्हणून स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली आहेत. धर्मनिरपेक्ष व संवैधानिक व्यवस्था स्वीकारूनही ७ दशके उलटली आहेत. जगातील सर्वोत्तम मानली जाणारी लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे आपल्या जीवनात भौतिक बदल खूप झाले. आंतरिक बदलही होत आहेत. पण या अांतरिक बदलाच्या प्रवासात अधिक सजग राहण्याची गरज आहे. त्यासाठी आपला केंद्रबिंदू माणूसच राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे.

चन्नवीर भद्रेश्वरमठ संपर्क -९९२२२४११३१

बातम्या आणखी आहेत...