आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापु रुष असो वा स्त्री, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास आणि परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण होय! या शिक्षण पद्धतीत, स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची शैक्षणिक परिस्थिती कशी आहे, त्यावरून ठरते. स्त्रीशिक्षणाचा इतिहास आठवताना, त्याचा पाया रचणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व जाणवल्याशिवाय राहात नाही. प्रारंभीच्या काळात न्यायमूर्ती गोविंदराव रानडे, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा कितीतरी प्रभृती स्त्रीशिक्षणाच्या प्रसारासाठी मनापासून झटल्या. या महान समाजधुरिणाांचे योगदान आज फलित स्वरूपात या शतकात आपल्याला पाहायला मिळत आहे. स्त्रीशिक्षणाविषयी जागरूकता, सजगता अगदी खेड्यापाड्यातही दिसून येते. स्त्री शिक्षणाच्या प्रचार- प्रसारासाठी मागच्या पिढीने घेतलेली मेहनत सफल झाली असे आजच्या सुशिक्षित, आधुनिक स्त्रीकडे बघून म्हणता येऊ शकेल. परंतु, समाजसुधारकांनी स्त्री फक्त सुशिक्षित व्हावी, यासाठीच अट्टहास केला होता का? शिक्षण मिळवून, लिहिणे-वाचणे शिकून, नावापुढे चार पदव्या लागाव्या यासाठीच सर्व खटाटोप होता का? तर नक्कीच नाही. स्त्री ही सुशिक्षित होण्याबरोबरच स्वावलंबीही व्हावी, स्वतःच्या क्षमतांचा-बुद्धीचा तिने पुरेपूर वापर करावा, स्वतःची शक्ती ओळखावी, हे होणेही अपेक्षित होते. यशस्वी स्त्रियांच्या अनेक सन्माननीय उदाहरणांतून आपल्याला दिसून येते की आजच्या स्त्रिया फक्त सुशिक्षितच नाहीत, तर त्या सामाजिक जबाबदारी घेणाऱ्याही आहेत. स्वत:च्या कर्तव्याचे भान ठेवून आपल्या सुसंस्कृत वर्तनाने त्या समाजासमोर एक आदर्श म्हणून स्वतःला सिद्ध करत आहेत. शैक्षणिक हक्क हा स्त्रियांच्या जीवनाचा पाया असेल, तर आर्थिक स्वावलंबन किंवा सामाजिक जबाबदाऱ्यांचे असणारे भान हा कळस आहे. लग्नानंतर “आजारपण’, “शारीरिक अशक्तपणा’ असे कोणतेही ठोस कारण नसताना फक्त “नोकरी करायला आवडत नाही, प्रवास झेपत नाही, बिझनेस जमत नाही’, “नोकरीचा कंटाळा आला’, “मूड नाही’ असा नन्नाचा पाढा म्हणत आईवडिलांचे श्रम, पैसे, वेळ खर्च करून घेतलेले अमूल्य शिक्षण मुलींनी वाया घालवू नये, असे प्रांजळपणे वाटते. लग्न, बाळंतपण, लग्नानंतर झालेले स्थलांतर, अचानक आलेले एखादे आजारपण यामुळे नोकरी-स्वतःचा व्यवसाय यात अल्पकाळासाठी घेतलेला ब्रेक समजून घेता येतो. पण, यातले काहीही कारण नसताना शिक्षणाचा कोणत्याही प्रकारे उपयोग न करणे हे खटकणारे आहे. सांसारिक व्यवधान, जबाबदाऱ्या प्रत्येकीला असतात, आयुष्याचा भागच आहे तो. पण, त्यातूनही वेळेचे व्यवस्थापन करून जमेल तितका वेळ शिक्षणाचा सदुपयोग करायला हवा. स्वतःसाठी, कुटुंबासाठी पैसे कमावण्याची गरज नसेल, तर समाजासाठी विधायक उपक्रम राबवून, गरजू घटकांना विनामूल्य शिकवून किंवा अन्य माध्यमांद्वारे विनामूल्य सेवा देऊनही तो करता येतो. पण, शिक्षणाचा उपयोग व्हायलाच हवा. मुले लहान असताना नोकरीतून घेतलेला ब्रेक, कित्येक स्त्रियांच्या बाबतीत नोकरीतून घेतली रिटायरमेंटच होते. कारण नंतर मुलं मोठी झाली, तरी नोकरीला त्यांनी कायमचा रामराम केल्याचे दिसते. आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना माझे हेच कळकळीचे सांगणे आहे की, आईवडिलांनी तुमच्याबाबत बघितलेल्या स्वप्नांना न्याय द्या, घेतलेल्या शिक्षणाचा असा उपयोग करा की आईवडिलांना तुमचा गर्व वाटला पाहिजे. आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही नोकरी, व्यवसाय, समाजकार्य काहीही करा, पण स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. घरातली कामं करायला दिवसातले काहीच तास लागतात आणि आजकाल तर कितीतरी कामे करण्यासाठी घरी मदतनीस येतात. त्यामुळे “घरी खूप काम असतं’ हे कारण देऊन निष्क्रिय राहू नका. कितीतरी स्त्रिया आज दूरदूरच्या ठिकाणी जाऊन नोकरी करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, घरची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे भले तुम्ही आर्थिकदृष्ट्या बळकट असाल, तुमच्यावर पैसे कमावण्याची बळजबरी नसेल, पण त्या स्थितीतही आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करणे ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे. शिक्षण व्यवस्थेचा उपयोग करून आपण शिक्षण घेतो तेव्हा त्याची समाजासाठी परतफेड करणे हे “माणूस’ म्हणून आपले कर्तव्य आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया का रचला? अंगावर शेण-चिखलाचे मारे सहन करून, असलेली एकच साडी धुऊन आणि ती तशीच ओली नेसून पुन्हा तसेच अविरत शिकवण्याचे कार्य त्या माउलीने का केले त्या काळात? तर आज तुम्ही, मी स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, स्वतःच्या हक्कासाठी कुणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी! एक स्त्री म्हणून त्यांना झालेला त्रास समजून घेतला, तर आताही डोळ्यात पाणी येईल! हेच विचार मनात पक्के रुजवत प्रत्येक आईवडील आपले पैसे, श्रम, वेळ खर्च करून आपल्या मुलींना शिकवतात, आत्मविश्वासाने जगण्याची मानसिक ताकद देतात. आईवडिलांचे हे ऋण “लेक’ या नात्याने आपण कधीही फेडू शकत नाही, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्षे आपल्या शिक्षणासाठी खर्च केली आहेत, त्या शिक्षणाचा उपयोग करून त्यांना आपला अभिमान वाटेल, आपले कौतुक बघून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतील असे काहीतरी “एक मुलगी’ म्हणून आपण आयुष्यात नक्कीच करू शकतो! बरोबर ना? { संपर्क : ९३२०४४१११६
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.