आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Grace Of God, The Blessings Of The Great, And The Love Of The Faithful... | Article By Rohini Kachole

मधुरिमा विशेष:ईश्वरकृपा, थोरांचे आशीर्वाद, अन् आप्तेष्टांचं प्रेम...

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ खेर बायोप्सीचा रिपोर्ट हातात पडला. डोळ्यांसमोर अंधार झाला. शरीरातील त्राण नाहीसे झाले. “हॉबकिन लिम्कोना’च्या कॅन्सरची सुरुवात झालेली होती. घरातील हसते-खेळते वातावरण क्षणात ढवळून निघाले. भरधाव वेगाने चाललेल्या वाहनास कचकन ब्रेक मारल्यासारखी परिस्थिती झाली. आत्ताच कुठे पन्नाशीची सुरुवात... मुलांचे शिक्षण पूर्ण व्हायचे होते. थोरला एमबीए करत होता. धाकटी कन्या शरयू ही वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात होती. मन आक्रंदत होते. काहीही चाहूल न लागता रोगाने शिरकाव केला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी विमा काढताना संपूर्ण वैद्यकीय तपासणी केलेली होती. सर्व काही आलबेल होते. २०१३ ची दिवाळी आपल्या पुढ्यात असे काही घेऊन येईल ही पुसटशी कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजनानंतर आम्ही चार-पाच कुटुंबे कोस्टल कर्नाटकच्या सहलीला गेलेलो. हसत-खिदळत समुद्राच्या लाटांवर मौजमस्ती करीत होतो. यथेच्छ खाणे झालेले होते. कोल्हापूरला सर्वजण आपापल्या दिशेने निघाले. आम्हीही पुण्यास येण्यासाठी बसमध्ये बसलो. थोड्याच वेळात मला थंडी भरली आणि ताप आला. सोबत असलेली गोळी घेऊन झोपी गेले. सकाळी पुण्यात पोहोचलो. घरी आल्यावर खूप थकवा जाणवत होता. तापही होता. हे लक्षण काहीसे वेगळे जाणवत होते. मी सकाळीच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली. प्रवासामुळे ताप असावा असे डॉक्टरांचे अनुमान होते, परंतु मी त्यांना अॅडमिट करून संपूर्ण तपासणी करावी असा आग्रह केला. छातीचा एक्स-रे चा रिपोर्ट नॉर्मल आला. सोनोग्राफी करताना त्यांना जांघेत, मानेत काही गाठी जाणवल्या. त्या कशाच्या आहेत हे तपासणीसाठी बायोप्सीची तपासणी केली. त्याचा रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागणार होते. मला मनोमन त्या गाठी बहुतेक टीबी (क्षय) च्या असाव्यात असे वाटत होते. शेवटी रिपोर्ट आलाच. आता परिस्थितीला समोरे जाणे हाच पर्याय होता. माझे स्वत:चे वैद्यकीय ज्ञान बाजूला सारून सरळ दीनानाथ हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागातील डॉ. सचिन हिंगमिरे यांच्याकडे गेले. त्यांनी या रोगाचा प्रतिकार कसा करावा, आहार कसा असावा, विहार असा असावा हे समजावून सांगितले. त्यांच्या या सल्ल्याने मनाला हुरूप आला. मुलांसाठी, स्वत:साठी, कुटुंबासाठी परत उभे राहायचे हा निश्चय केला. या वेळी सासर-माहेरची, मैत्र-नातलग यांची मोलाची साथ होती. पतीला नोकरीच्या ठिकाणी या कालावधीत वरिष्ठांनी सांभाळून घेतले.

मानसिक बळ मिळाले, पण शारीरिक बळही या वेळी खूप महत्त्वाचे होते. बारा किमोथेरपी आणि चौदा रेडिएशन या उपचारात अंतर्भूत होते. पहिली किमो हातातील शिरेद्वारे देण्यात आली. शिरेद्वारे काहीतरी जळत गेल्याची जाणीव होत होती. वेदना होत होत्या. प्रत्येक किमोच्या सायकलमध्ये १५ दिवसांचा अवधी असे. प्रत्येक किमोपूर्वी रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, लिव्हर टेस्ट करणे अनिवार्य होते. दुसरी किमो डाव्या हाताच्या शिरेतून दिली. किमोची औषधे शिरेतून जाताना तीव्र वेदना होत. सकाळी चालू केलेले सलाइन सायंकाळपर्यंत चालत असे. या वेळी शिरेतून निडल बाहेर येऊन शिरेभाेवती सूज आली होती. त्या वेळी काहीच जाणवले नाही, परंतु दोन दिवसांनी हात प्रचंड दुखत होता. थम्बोसिसमुळे वेदना असह्य होत्या. मरणयातना काय असतात ते अनुभवत होते. तीन दिवसांनंतर औषधोपचाराने ते दुखणे कमी झाले. या किमोनंतर माझे कमरेपर्यंत रुळणारे केस गळणे सुरू झाले. हात लावला की केसांचा झुपकाच हातात येत असे. तीन-चार दिवसांत संपूर्ण केस गेले होते. केसविकारतज्ज्ञ असूनही स्वत:साठी काहीही करू शकत नव्हते. हतबलता काय असते हे त्या वेळी कळले. प्रत्येक किमोच्या वेळी वेगवेगळी लक्षणे दिसत. त्रासही वेगळाच असे. २०१३ पासून ते मे २०१४ पर्यंत हे सर्व उपचार घेतले. शरीराची खूप हानी झाली. डोक्यावर केस नाही, अंगात त्राण नाही अशा स्थितीत मी मनोनिग्रह केला की, घरी बसले तर डोक्यात नको ते विचार येऊन मानसिक संतुलन बिघडेल. आहे त्या अवस्थेत मी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. क्लिनिकला प्रदर्शनी बोर्ड लावला होता “ईश्वरकृपा, थोरांचे आशीर्वाद आणि आपले प्रेम यामुळे मी या जीवघेण्या आजारावर मात केली. असेच सहकार्य लाभू द्या.’ विशेष म्हणजे मी विग न लावता पूर्णपणे केस नसलेल्या नव्या लूकमध्ये रुग्ण तपासत होते. रुग्णांनीही या माझ्या नवीन लूकला आपलेसे केले. माझ्या या अनुभवातून एकच सांगेन, आजारात कुटुंब, मित्रपरिवार पाठीशी होता. माझ्यावर उपचार करणारे दीनानाथ मंगेशकरमधील तज्ज्ञ, स्टाफ, माझे क्लिनिक आणि शरयू हर्बलचे माझे कर्मचारी, वितरक यांचा पाठिंबा आणि शेवटी स्वत:चा मनोनिग्रह या सर्वांमुळे मी आज पुन्हा उभी राहिले आणि पूर्ववत कार्यरत आहे.

डॉ. रोहिणी काचोळे संपर्क : ९८८११३०९३६

बातम्या आणखी आहेत...