आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Journey Of 'fatherhood' Towards Pragalbhata ...| Article By Vivek Dhaneshwar

पितृदिन विशेष:प्रगल्भतेकडे होणारा ‘बाप’पणाचा प्रवास...

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीने एकत्रितरीत्या पाल्यांचं संगोपन करणं नैसर्गिकरीत्या घडत जातं. तुलनेने एकल पालकत्वाच्या बाबतीत हा प्रवास बऱ्यापैकी खाचखळग्यांचा, अनपेक्षित वळणांचा असतो. पत्नी हयात असताना तिच्या संगतीत मुलींचे लाडकोड करण्यात बहरलेलं ‘बाप’पण आणि पत्नीच्या निधनानंतर त्या ‘बाप’पणाला लागलेली आईपणाची झालर...वैचारिकदृष्ट्या परिपक्व करणाऱ्या या प्रवासाबद्दल सांगताहेत विवेक...

मला व शिल्पाला पालकत्व प्राप्त झाले ते २००० मध्ये, जेव्हा गार्गीचा जन्म झाला. त्यानंतर ७ वर्षांनी ईशिता झाली. गार्गी काय किंवा ईशिता काय, दोघींच्या बालपणामधील संगोपनाशी शिल्पा (माझी पत्नी) हयात असेपर्यंत माझा संबंध कमीच आला. याची दोन कारणे आहेत. एकतर मी जेथे नोकरी करत होतो तिथे प्रकल्प अवस्थामधील कामे असल्याने मला बऱ्यापैकी गुंतून राहावे लागत असे. दुसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे, शिल्पाने समर्थपणे ती जबाबदारी उचलली होती. ते बघता माझ्यापर्यंत त्याच गोष्टी आल्या, जिथे जिथे माझ्या पत्नीचा नाइलाज झाला. दोघींच्या बालपणात माझी भूमिका मुख्यत्वेकरून लाड पुरवण्यापुरती मर्यादित होती. गार्गी जशी मोठी मोठी होत गेली तसतसे काही विषय समोर आले, ज्यात मी एकटा किंवा मी आणि शिल्पा दोघे मिळून गार्गीसाठी समुपदेशकाची भूमिका पार पाडत असू. बाकी दोघींच्या शिक्षणासाठी शाळेची निवड, गणवेश, वह्या, पुस्तके, वाहन व्यवस्था, शिक्षक-पालक सभा या सगळ्या जबाबदाऱ्या शिल्पा निभावत होती. तोपर्यंत एक बाप म्हणून माझी भूमिका तशी मर्यादितच होती.

शिल्पाच्या शेवटच्या काही महिन्यांत जेव्हा ती अंथरुणाला खिळून होती तेव्हा गार्गी तसेच ईशिताशी संबंधित काही गोष्टीमध्ये मला जाणीवपूर्वक लक्ष घालावे लागत असे. मला असे वाटते की, बाप म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या मला नव्याने समजायला त्याच क्षणाला सुरुवात झाली. शिल्पासाठी घरी दिवसा परिचारिका ठेवलेली असली तरी बऱ्याच गोष्टीत मलादेखील मदत करावी लागे. त्यामुळे मी ठरवून माझ्या नोकरीतून काही काळ विश्रांती घेतली. मग घरीच असल्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दोन्ही मुलींचा दिनक्रम नीट समजून घेता आला. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी सहभागी होऊ लागलो. बऱ्याच वेळेला धाकटी ईशिता उठायला उशीर करे. मग तिची शाळेची बस चुकायची.तिला शाळेला नेऊन सोडणे, आणणे, पालक सभांना उपस्थिती, शाळेतल्या प्रकल्पांसाठी मदत हे सर्व करायला लागलो. मला स्वयंपाकाचा तसा गंध नाही. त्यामुळे धाकट्या मुलीसाठी शाळेचा डबा थोरली गार्गी तयार करायची. मग त्या वेळी दूध गरम करून देणे, दप्तर भरून देणे, डबा भरून देणे, पाण्याची बाटली भरून ठेवणे अशी सर्व शक्य ती पुरक मदत मी करत असे. आज मागे वळून पाहतो त्या वेळी वाटते की मला स्वयंपाक करायला यायला हवा होता. म्हणजे जेव्हा जेव्हा ईशिताला शाळेत केवळ दूध पिऊन जावे लागले त्या वेळी मी डब्यासाठी काहीतरी करून देऊ शकलो असतो... तुलनेने थोरली गार्गी स्वत:चे सगळे आवरून, ईशितासाठी हवे-नको ते पाहून स्वत:च्या महाविद्यालयात जाणे-येणे सांभाळत असे. तिच्या मदतीने एक बाप म्हणून मी दोघींसाठी जे काही करायला हवे ते करण्यात व त्या वेळी शिल्पाचे दुखणे सांभाळण्यात मला खूपच मदत झाली. खूप वेळा माझी चिडचिड होत असे तीदेखील मुलींनी समजावून घेतली. आज या घडीला त्या चिडचिडीचा पश्चात्ताप होतो खरा. पण तो काळ मला बाप तसेच पती म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रगल्भतेची जाणीव करून देणारा होता. शिल्पा गेली तेव्हा ईशिता सातव्या इयत्तेत, तर गार्गी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला होती. पत्नीच्या जाण्याने सगळीच समीकरणे बदलत गेली. ती गेली त्या वेळी मुलींच्या परीक्षा जवळ आलेल्या होत्या. हे तर खरेच की आई गमावल्याचे सांत्वन करणे अशक्यच होते, पण तरीही हळूहळू त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सावरण्यासाठी मी प्रयत्न केले. बऱ्याच वेळा मग आम्ही तिघे शिल्पा असतानाचे एकत्र आनंदी क्षण आठवत असू. भावनात्मक दृष्टीने छोटी मुलगी तशी लवकर परिपक्व झाली आहे. मोठी (तुलनेने) अजूनही जास्त भावनात्मक आहे. नोकरीनिमित्त परगावी यावे लागल्याने मुलींसोबत असण्याचा काळ कमी झाला आहे खरा, परंतु याची कसर आम्ही दूरध्वनी माध्यमातून भरून काढतो आहोत. दोघी मुलींशी रोज संवाद हा ठरलेला दिनक्रम आहे. या संवादामधून दिवसभरामधील घडामोडी, गमतीजमती, प्रश्न यावर आम्ही चर्चा करतो. शिल्पा असताना तसेच ती गेल्यावरदेखील मी मुलींसोबत जाणीवपूर्वक मैत्रीचे नाते जपण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या परिणामी आज एक मुलगी आपल्या आईजवळ ज्या विश्वासाने एखादी गोष्ट मनमोकळेपणाने सांगू शकते तीच गोष्ट माझ्या मुली माझ्याशी शेअर करतात. माझा सल्ला घेतात. अर्थातच, मैत्री व लाड यांच्यासोबतच शिस्तदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. जिथे जिथे मला शिस्तीचा बडगा उगारण्याची गरज वाटते तेव्हा तेव्हा मी शक्यतो प्रत्यक्ष भेटीत त्या गोष्टीवर त्यांच्याशी चर्चा करतो. त्या गोष्टीशी संबंधित चांगल्या व वाईट बाजूची त्यांना कल्पना देतो. आपण घेत असलेल्या निर्णयाच्या तत्कालीक व दूरगामी परिणामांची त्यांना जाणीव करून देतो. त्यांची निर्णयक्षमता तर्कसंगत पद्धतीने विकसित होण्यास मदत करतो. आमच्या चर्चामधून केवळ गार्गी, ईशिताच नव्हे तर माझीदेखील वैचारिक परिपक्वता वाढण्यास मदत होत आहे असे मला जाणवते. मी कधीच आदर्श नवरा वा बाप असण्याचा दावा केला नाही व करणार नाही. दोन्ही मुलींच्या जन्मानंतर लाभलेले ‘बाप’पण शिल्पाच्या संगतीने मुलींचे लाडकोड करण्याच्या रूपाने बहरले व शिल्पा गेल्यावर या बापपणाला आईपणाची झालर लागली आहे. मुलीचे लाड करण्याबरोबरच त्यांना दिलेल्या मोकळिकीकडे मी आई बनून बघायला शिकलो आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलींमध्ये जे जे काही मला सुधारण्यायोग्य वाटते ते ते मी त्यांना सांगतो. काही बाबतीत यश मिळाले आहे, काही बाबतीत प्रतीक्षा आहे. या प्रवासात मुलीदेखील त्यांच्या बाबाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बाप’पणाचा प्रवास मला दिवसेंदिवस प्रगल्भतेकडे नेतो आहे...

विवेक धनेश्वर संपर्क : ९०९९०१५७७९

बातम्या आणखी आहेत...