आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:लोककलेची ‘कातिल’?

समीर गायकवाड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सध्या विविध क्षेत्रांत काही ठराविक नावांचा दबदबा दिसून येतो, तर काही नावांचा जलवा दिसतो! यातलेच एक नाव आहे गौतमी पाटील. अगदी कमी वयात बेफाम नावलौकिक आणि प्रसिद्धीचे वलय कमावलेली वादग्रस्त नृत्यांगना म्हणून अशी तिची ओळख बनली आहे. आजची तरुण पिढी तिच्या नावाची, तिच्या नृत्याची दीवानी आहे. गौतमी जिथे कार्यक्रम करते, तिथं हमखास काही ना काही घडतं. तिच्या कार्यक्रमस्थळी बऱ्याचदा मारामारी, हुल्लडबाजी झाली आहे, काही ठिकाणी खुर्च्या फेकल्या गेल्या आहेत. तिच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणात गोळा होतात अन् धिंगाणा घालतात, हे जणू ठरलेले आहे. अलीकडेच नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांना, पत्रकारांनाही मारहाण, धक्काबुक्की झाली. या घटनेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे, पण प्रश्न एवढ्याने सुटणार नाही. दस्तुरखुद्द गौतमी पाटीलने याविषयी तिच्या चाहत्यांना, संयोजकांना आणि सुरक्षा व्यवस्थेला सुनावणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त तिच्या कार्यक्रमांमध्ये अशा घटना वारंवार का घडतात, याचाही लेखाजोखा घेणे आवश्यक बनले आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची अधिक प्रसिद्धी तिच्याविषयीच्या स्लोगनने झाली, ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ ही स्लोगन सोशल मीडियावर अफाट लोकप्रिय झाली. यूट्यूबवर तिच्या व्हिडिओंनी लाखो व्ह्यू काउंट मिळवले. अनेकांनी ते शेअर केले. सोशल मीडियावर तिची हवा झाली. तिचे चाहतेच हा उद्योग करत होते. गौतमी पाटील हा नेमका काय प्रकार आहे, या जिज्ञासेपोटी अनेक जण तिला सर्च करू लागले. यामुळे तिच्या नावाचा एक विस्फोटच झाला. त्यातून तिचे मोठमोठे कार्यक्रम सुरू झाले. त्यानंतर खेडोपाडीही तिचे नाव पोहोचले. मग कार्यक्रमांची लड लागली. ती कुठे येणार, कधी येणार, तिचा कार्यक्रम किती वेळ असणार, याची खमंग चर्चा होऊ लागली. तिचे वेड लागलेले तरुण तिच्या एका झलकेसाठी मरू लागले. प्रसिद्धी कधीच एकटी येत नसते, ती वाद अन् बदनामीही सोबत आणते. गौतमीही याला अपवाद नव्हती. तिचे कार्यक्रम, तिचे नृत्य-अंगविक्षेप, कार्यक्रमस्थळी होणारे वाद आणि आर्थिक उलाढाल यातून तिच्यावर चौफेर टीका होऊ लागली. मात्र, यादरम्यान तिच्या चाहत्यांमध्ये घट न होता उलट वाढच झाली!

“आम्ही पाच हजार मागितले, तर पैशाचा बाजार मांडला, असं म्हणणारे लोक गौतमीने तीन गाणी वाजवली की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणदेखील दिलं जात नाही,” असा शेलका आरोप इंदोरीकर महाराजांनी केला. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर गौतमीवर टीका करताना म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका! शंभर कलावंतांच्या तमाशाला दोन लाख रुपये मानधन मिळेना आणि या चार पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय!” याशिवाय, अनेक कथित संस्कृतिरक्षकांनी तिला धाक दाखवला. राजकीय पक्षही यात मागे नव्हते. मनसेने तर उघड भूमिका घेत तिला माफी मागायला भाग पाडले. महिला आयोगापर्यंत तिचे किस्से गेले. यानंतर तिच्या कार्यक्रमाचे काही संयोजकही गोत्यात आले होते. गौतमीच्या टीममध्ये अकरा मुली असतात. एकूण वीस जणांची टीम आहे. या सर्वांचा काही खर्च नक्कीच असेल. त्यानुसार ती मानधनही घेत असणार. इंदोरीकर महाराज सांगतात तेवढं मानधन आपण घेत नाही, असं मागे गौतमीने सांगितलं होतं. आपण कुणाकडूनही एका शोसाठी पाच लाख रुपये घेतल्याचं कुणीही सिद्ध करून दाखवावं, असं आव्हानही तिने दिलं होतं. रघुवीर खेडेकरांच्या आरोपांना उत्तर देताना ती म्हणाली की, आपण लावणी करत नाही, डीजे नृत्याचा आपला शो आहे! हे सर्व इतक्यावर थांबले नाही.

काही दिवसांनी चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली. तिच्याविषयी आकर्षण असणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केलं होतं, हे विशेष! इतकं सारं असूनही बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो, तर कुणी घराच्या छतावर जाऊन तिच्या नखरेल अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो आणि हे चित्र राज्यात सवयीचं झालं आहे. अलीकडच्या काळात तिच्या कार्यक्रमांना महिलाही हजेरी लावताना दिसताहेत, हा एक लक्षणीय बदल म्हणावा लागेल.

गौतमी पाटील इंटरनेट सेन्सेशन कधी नि कशी झाली, या प्रश्नात अनेक उत्तरे दडली आहेत. तिच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात किळसवाण्या, अश्लील हरकती असत, बीभत्सतेकडे झुकलेले हातवारे असत. यामुळे भान हरपलेली तरुणाई चेकाळली, पिसाळली. तिच्या डान्स क्लिप चवीने बघितल्या जाऊ लागल्या. हा मामला आंबटशौकिनापुरता नव्हता, हे विशेष! नंतर तिने याबद्दल माफी मागितली. आपला अंदाज थोडासा बदलला, पण तिचा उत्तान, मादक पेहराव नि नखरेल अदा मात्र बदलल्या नाहीत. उलट या सर्व प्रकाराने तिला प्रसिद्धीच मिळवून दिली. परवाच्या मारहाणीच्या प्रकारामुळे गौतमीच्या कार्यक्रमात आता छायाचित्रकारांना, पत्रकारांना किंमत उरलेली नाही, असा दावा करणाऱ्या वृत्तवाहिन्यांनीच एकेकाळी टीआरपीच्या खेळासाठी गौतमीची सवंग पब्लिसिटी चालवली होती.

अगदी तडका देऊन तिच्याविषयी खमंग माहिती दिली जात होती. आता खेळ उलटा झाला आहे. पिसाटलेल्या पब्लिकला कशाशीही देणेघेणे राहिलेले नाही, त्यांना ज्याचा अडथळा वाटतो वा जे त्यांना एक्स्पोज करताहेत, त्यांना ते आडवे जाताहेत. गौतमी म्हणते की, ती लावणी करत नाही. मात्र, बहुतांशाने ती लावणीवरच नृत्य सादर करते. तिला लावणी भलेही गाता येत नसेल वा पारंपरिक धाटणीचे लावणीनृत्य करणे पचनी पडत नसेल. पण तरीही ती लावणीवरच नाच करते, हे तितकेच खरे. डान्स शोसाठी ती किती पैसे आकारते हा मुद्दा वैयक्तिक मानला, तरीही त्याचे पडसाद लोककलेच्या क्षेत्रात नक्की उमटताहेत.

एकेकाळी मराठी सिनेमात तमाशापटांचे वर्चस्व होते. विनोदी चित्रपटांच्या लाटेत हे साम्राज्य खालसा झाले. तमाशासाठी हा काळ कठीण होता. मात्र, सुरेखा पुणेकर यांनी लावणीला संजीवनी दिली. खेड्यापाड्यातल्या यात्रांमधले फड हाऊसफुल्ल होऊ लागले. पण, मागच्या दशकात या क्षेत्राला पुन्हा अवकळा आली होती. तमाशापंढरी नारायणगाव याची साक्ष देते. कित्येक तमाशा फड मोडकळीस आले, कित्येकांना अख्ख्या सीझनमध्ये सुपारी मिळेनाशी झाली. अशा स्थितीत गेल्या वर्षापासून लावणी पुन्हा चर्चेत आली. आजवर कधीच मिळाला नव्हता, असा अभूतपूर्व प्रतिसाद तिला मिळू लागला. गौतमीने लावणीला आधार दिला असला, तरी तो पोषक नव्हे, तर घातक होता, हे नव्या वर्षाने पटवून दिले. लोकनाट्य कला केंद्रावर तिच्यासारख्या पेहरावाची, अंगविक्षेपांची मागणी होऊ लागली. लावणी नृत्यांगना म्हणजे चरित्रहीन आणि सहज उपलब्ध असलेली वस्तू म्हणून पाहिली जाऊ लागली.

तमाशा फड हे कधीच बायकांचे बाजार नव्हते. पारंपरिक तमाशा नृत्याचा आविष्कार घडवणाऱ्या नि त्यावर प्रेम असणाऱ्या कलावंतांचा तो श्वास होता. काही जणांच्या तर कित्येक पिढ्या यात गेल्यात. आता मात्र लावणी पाहायला, ऐकायला येणाऱ्या रसिकांची बदलणारी चव या लोककलेच्या साधकांना खटकू लागली आहे. हे सगळं कुणामुळं घडलंय, याचं उत्तर सर्वश्रुत आहे. गौतमीमुळं काही चांगलं घडलंय का, हे एकवेळ सांगता येणार नाही, पण वाईट गोष्टींना मात्र नक्कीच पाठबळ मिळालंय. कारण लावणी इतकी थिल्लर कधीच नव्हती. गौतमीने स्वतःच्या कलेच्या जोरावर नव्या लावण्या निर्माण करून त्यावर डीजे शो करावे, जुन्या-नव्या लावण्यांची मोडतोड करून त्यांची चव घालवू नये. कारण ती जे करते आहे, त्याची फळे अन्य नृत्यांगनांना, फडांना भोगावी लागताहेत. तिचे मानधन किती आहे, हे फारसे महत्त्वाचे नाही. या क्षेत्रातील बहुतांश उलाढाल तिच्याच भोवताली होतेय, हेही कटुसत्य आहे. तिच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या बार्शी येथील एका व्यक्तीने तर तिच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या कार्यक्रमात पत्रकारांना झालेली मारहाण असो की अन्य हुल्लडबाजी असो; याविरोधात पोलिस आता तरी कठोर पावले उचलतील का, असा प्रश्न विचारला जातोय. गौतमीने अजूनही या प्रवृत्तींविरोधात कोणतेही ठोस विधान केलेलं नाही, हे पुरेसे बोलके आहे. तिच्यापासून या क्षेत्राला अगदी थोडासाच फायदा झाला असेल, परंतु हानी मात्र पुष्कळ होते आहे. तिने वेळीच स्वतःला नि आपल्या चाहत्यांना, आयोजकांना आवर घातला नाही, तर आजचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

तमाशा फड हे कधीच बायकांचे बाजार नव्हते. पारंपरिक तमाशा नृत्याचा आविष्कार घडवणाऱ्या नि त्यावर प्रेम असणाऱ्या कलावंतांचा तो श्वास होता. आता मात्र लावणी पाहायला, ऐकायला येणाऱ्या रसिकांची बदलणारी चव या लोककलेच्या साधकांना खटकू लागली आहे. गौतमी पाटीलमुळे काही चांगलं घडलंय का, हे एकवेळ सांगता येणार नाही, पण वाईट गोष्टींना मात्र नक्कीच पाठबळ मिळालंय. कारण लावणी इतकी थिल्लर कधीच नव्हती.

रसिक स्पेशल
समीर गायकवाड
sameerbapu @gmail.com
संपर्क : ९७६६८३३२८३