आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:विमानात बसलेला माणूस!

नितीन थोरात4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुम्हाला म्हणून सांगतो गावकऱ्यांनो, आमचं विमान आभाळातून निघालं हुतं तवा बाहेर समदे काळे ढग हुते. मग मी काय केलं, खिडकी उघडून बाहेर हात काढला. तुम्हाला इश्वास बसणार नाही, हाताला काळा कापूस चिकटल्यावानी समदे काळे ढग चिकटले हुते..’ सुदामनाना असं काहीच्या काही बोलत होते. ते ऐकून आता मी खरोखरच त्यांच्या दिशेनं भिरकावण्यासाठी दगड शोधू लागलो.. बंडल मारायलाही एक मर्यादा असते हो. समोरच्या लोकांना कळत नाही म्हणून काहीही फेकावं..?

वि मानात बसणारे पहिले ग्रामस्थ म्हणून टोमणेवाडी ग्रामपंचायतीने सुदामनानांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. कदाचित आधुनिक भारतातला हा पहिलाच कौतुक सोहळा होता. भावनांना आवर घालत साश्रुनयनांनी सुदामनाना विमानाचं कौतुक सांगत होते आणि मी माझ्या भावनांना आवर घालत त्यांचं भाषण सहन करीत होतो. ‘मित्रांनो, विमान म्हणजे काय असतं? हवेत उडणारी एसटीच. वेगळं काही नाही. एसटीमध्ये रुमाल टाकून आपण सीट पकडू शकतो, पण विमानात तसं करता येत नाही. कारण विमानाच्या खिडक्या उंच असतात.’ सुदामनाना असं बोलले आणि मी समोरच्या पाचपन्नास लोकांच्या चेहऱ्याकडं पाहिलं. सुदामनाना काहीतरी अगाध ज्ञान सांगत असल्यासारखं सगळे जण मन लावून ऐकत होते.

संध्याकाळची वेळ होती आणि ग्रामदैवताच्या मंदिरासमोर टाकलेल्या मंडपात हा कौतुक सोहळा सुरू होता. सुदामनाना म्हणजे टोमणेवाडीचे माजी सरपंच. मी ‘खंडोबा’ कादंबरी लिहायला घेतली होती. त्यासाठी काही संदर्भ टोमणेवाडीतील पुजाऱ्यांकडून मिळतील अशी माहिती मला मिळाली म्हणून तिथल्या मित्रांची ओळख काढून मी टोमणेवाडीला गेलो. पुजाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. रात्री मित्राच्या घरी जेवण करून शतपावली करायला चौकात गेलो, तर तिथं हा कार्यक्रम सुरू होता. माजी सरपंच विमानात बसले म्हणून गावाने त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केल्याचा बोर्ड वाचूनच मी चकित झालो अन् मातीत बैठक मांडली.

सुदामनाना बोलत होते.. ‘मुळात विमानात उडतं कसं हा सगळ्यांना प्रश्न पडतो. तर त्यावर मी विमानाच्या ड्रायव्हरशी बोललो. तुम्हाला तर माहिती असंलच की आपण आपल्या गाडीचा पहिला गेअर टाकला अन् झटकन क्लच सोडला की पहिलं चाक वरती उडतं. मित्रांनो, विमानाचं सेम तसंच असतं. विमानाचा ड्रायव्हर पहिला गेअर टाकून लगीच क्लच सोडत्यात. पुढचं चाक वरती उडालं की रेस वाढवत्यात.. विमान तसंच बुंगाट पळत सुटतं अन् हवेत जातं..’ सुदामनाना सांगत होते आणि मी डोळे फाडून त्यांच्याकडं पाहत होतो. कसला बंडल मारतोय हा माणूस, असा विचार करत मी समोरच्या लोकांकडं पाहिलं, तर सगळे सुदामनानाच्या बंडलवाणीत तल्लीन झाले होते. तसा मी हात वरत करत म्हणालं,

‘मग ती विमानाला दोन्ही बाजूला पंख असत्यात ते कशाला असत्यात?’ सगळ्यांनी माझ्याकडं पाहिलं. ‘तुम्ही कोण?’ सुदामनानांच्या या प्रश्नावर मी म्हणालो, ‘मी लेखक आहे. पुस्तक लिहिण्यासाठी आलो होतो..’ नाना म्हणाले, ‘तुम्ही बसलाय का कधी विमानात?’ मी होकार दिला असता तर नानांचं महत्त्व कमी झालं असतं, असं माझ्या मनात आलं आणि मी नकारार्थी मान डुलवली. तसं स्मित करत त्यांनी मला बसण्याचा इशारा केला. मी खाली बसलो तसे सुदामनाना बोलू लागले.. ‘विमान आभाळातून उडतं, तवा ते सूर्याच्या एकदम जवळ जातं. त्येच्यामुळं खिडकीतून आपल्याला कडक ऊन लागू शकतं. ते लागू ने म्हणून दोन्ही बाजूला पंख असत्यात. ऊन पंखावर पडतं आणि विमानात बसलेल्या लोकांचं उन्हापास्नं संरक्षण हुतं..’ मी कपाळावर हात मारून घेतला. तसा प्रेक्षकांमधला एक जण म्हणाला, ‘पण, नाना विमान आपल्या गावाववरून जात असतंय तवा लय आवाज येत असतोय. विमानातबी तेवढाच आवाज येतोय का?’ भारी प्रश्न होता. पण, उत्तर देणारे नाना होते. त्यामुळं माझा मूड गेला. प्रत्येकाच्या शंकेचं निरसन करण्याचा नानांनी जणू चंगच बांधला होता. नाना भाव खात म्हणाले, ‘तुम्ही गावाकडची अडाणी लोकं, कधी शहाणी होणार काय माहिती? आरं बाबा, विमान वॉटरप्रूफ असतंय म्हणून त्याच्यात आवाज येत न्हाय!’

बातम्या आणखी आहेत...