आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:डिजिटल लिपी गिरवणाऱ्या मनाच्या मालकिणी!

कविता ननवरे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ पण बायांना खुरपताना, शेण काढताना, ऊस तोडतानाही बघितलं आहे. आपण त्यांना नोकऱ्या करताना, महिन्याच्या सुरुवातीला बँकेत जाऊन स्वत:च्या पगाराचे पैसे काढताना बघितलं आहे. गेल्या काही वर्षांत बायांना दुकानातून सामान खरेदी केल्यानंतर मोबाइलवरून पेमेंट करताना, ऑनलाइन शॉपिंग साइटवरून हव्या त्या वस्तू ऑर्डर करतानाही बघतो आहोत. हा लेख वाचणाऱ्या तुम्ही आणि लिहिणारी मीही याचाच एक भाग आहोत. इन्स्टा, फेसबुकवर एका ऊसतोड कामगार बाईला उसाच्या फडात उभी राहून, ऊस तोडत व्हिडीओ शूट करताना, रील बनवताना तुम्ही बघितलं असेल. माझ्याप्रमाणे तुम्हीही तिचे व्हिडिओ बघून काही क्षण तिथे रेंगाळला असाल. कारण आपल्याला सवय नाही या जगातल्या आतून बाहेरून रापलेल्या बायांना इन्स्टाग्रामवर किंवा फेसबुकवर बघायची. एका ऊसतोड कामगार बाईला आत्मविश्वासाने सोशल मीडिया हँडल करताना पाहून समाधान वाटलं. खुरपता खुरपता मोबाइल हातात घेऊन स्वतःच्या पैशाने अॅमेझॉनवरून हव्या त्या वस्तू ऑर्डर करणारी एक बाई नुकतीच माझ्या पाहण्यात आलीय. माणूस चंद्रावर गेल्यावर जेवढा आनंद व्हावा, तेवढाच हे सुखद दृश्य पाहून झाला. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे बायांचं डिजिटली साक्षर होणं वाढत चाललंय.चांगलं शिक्षण घेऊन नोकरी मिळवणं आणि मोबाइल, इंटरनेट यांचा सराईत वापर करायला शिकून त्यातून अर्थार्जन करता येणं यात फार काही मोठा फरक राहिलेला नाही. कोरोना महामारीचे हजारो तोटे झाले पण काही फायदेही झाले. त्यातला महत्त्वाचा फायदा म्हणजे खेडेगावातल्या बाया मोबाइल उत्तमप्रकारे वापरायला शिकल्या. काही अल्पशिक्षित, अडाणी बाया रिकाम्या वेळेत निरनिराळे व्हिडिओ शूट करून युट्युबवर अपलोड करू लागल्या. त्यांनी फक्त ‘खुल जा सिम सिम’ म्हणायला अवकाश, त्यांच्यासाठी यूट्युब नावाची अलिबाबाची गुहाच उघडली. त्या रील्स बनवू लागल्या, व्हिडीओ शूट करून ते एडिटही करू लागल्या, स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर अपलोडूही लागल्या. आणि एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला की टाइमपास म्हणून बनवलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळू शकतात. आधी साधा फोटो काढायचा म्हटलं तरी लाजणाऱ्या अडाणी बाया आता सेलिब्रिटी झाल्यात. एका अडाणी बाईची पोहोच असून असून किती असते, तर सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स तयार करून त्या माध्यमातून चांगले पैसे मिळविण्याइतकी. आहात कुठे? सोलापूरच्या काठेवाडीची, ग्रामीण भाषेत बोलून दैनंदिन कामं करतानाचे व्हिडिओ करणारी “गावठी पूनम’ नावाचंच यूट्युब चॅनल असणारी पंचविशीच्या आसपासची साधीशी मुलगी. पारंपरिक तसेच आधुनिक पदार्थ बनवून अल्पकाळात प्रसिद्ध झालेल्या नगरच्या सुमन धामणे अर्थात ‘आपली आजी’, ‘गावरान एक खरी चव’ नावाचा नावासारखेच गावरान यूट्युब चॅनल चालवणारी अडाणी आई आणि अल्पशिक्षित लेक, तुफान मनोरंजन करणारी ठसकेबाज बकुळा, नुकत्याच प्रकाशझोतात आलेल्या ऊसतोड कामगार मनीषा हजारे... उदाहरणं द्यावी तेवढी कमीच आहेत. या बायांकडे आहे फक्त एक बरा स्मार्टफोन, इंटरनेट पॅक आणि ते हाताळण्याची साक्षरता. याच्याच बळावर त्या घरबसल्या चांगले पैसे कमवत आहेत. या बायांना व्हिडिओ कंटेंट कशाशी खातात, हे माहीतही नाही आणि खरं तर माहीत असण्याची गरजही नाही. पण त्यांच्या व्हिडिओंनी, त्यातील रॉ कंटेंटने नेटिझन्सना खूळ लावलंय, हे नक्की. गावठी पूनमचा एक व्हिडिओ आहे, ज्यातून ती तिचं लग्न कसं जमलं ते सांगते. सातवीत असताना स्थळ आलं आणि लग्न झालं. सातवीची इयत्ता अर्धवट शिकलेली पूनम आजघडीला हजारो सबस्क्रायबर असलेली एक यूट्युबर आहे. यूट्युबवर शेकडो रेसिपी चॅनल आहेत, पण शेतात चूल मांडून आणि ताजा भाजीपाला तोडून पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणाऱ्या ‘गावरान एक खरी चव’मधल्या मायलेकी भलत्याच फेमस आहेत. ‘आपल्या आजी’ची तर गोष्टच अफलातून आहे. कोरोना काळ होता. नातू म्हणाला, आजी पावभाजी बनव. आजीने चविष्ट पावभाजी बनवली. नातवाला आयडियाची कल्पना सुचली आणि उदयास आलं ‘आपली आजी’ नावाचं यूट्युब चॅनल, ज्याचे आज दहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. या आजींनी ‘आपली आजी’ नावाचा मसाल्याचा ब्रँडही नावारूपास आणला आहे. तांत्रिक बाबी नातू सांभाळत असला, तरी या चॅनलच्या सर्वेसर्वा आजीच आहेत. आजींना वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत. अमूलच्या पेजवरही आजींनी आपली पुरणपोळीची रेसिपी सादर केली आहे. उसाने खचाखच भरलेल्या बैलगाडीत रील बनवणाऱ्या ऊसतोड कामगार मनीषा हजारे व त्यांच्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात बघत गालातल्या गालात लाजून हसणारे त्यांचे पती दिसतात, तेंव्हा या ओरिजनल गाण्यात अभिनय करणारे करिष्मा कपूर आणि अजय देवगण फिके वाटू लागतात. मनीषा हजारे एका व्हिडिओत म्हणतात, ‘आम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट माहीत होती ती म्हणजे ऊस तोडणे.” एका ऊस तोडणाऱ्या बाईला तिच्या डिजिटल साक्षरतेनं स्वतंत्र ओळख मिळवून दिलीय. मनीषा आणि अशोक या जोडप्याकडे बघून खऱ्या अर्थानं सहजीवन आणि स्त्री स्वातंत्र्याचा नेमका अर्थ समजतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत गावखेड्यातील मुलीचं इंजिनिअर, डॉक्टर होणंही कौतुकाचा विषय व्हायचं. आता मुलगी आयएएस, आयपीएस झाली अशा बातम्या ऐकणं अंगवळणी पडू लागलंय. गावखेड्यातील मुलींनी हरेक क्षेत्रातली पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत कधीच कात टाकली आहे. चारचौघात हसण्याचं बंधन असणाऱ्या, पदर पडण्याचं भेव वाटणाऱ्या या बायापोरी स्मार्टफोनचा स्मार्टपणे वापर करून सोशल मीडियावर सेलिब्रिटी होतायत. त्या माध्यमातून अर्थार्जन करताहेेत. डिजिटल साक्षरतेमुळं लाखो फॉलोअर्स कमावलेल्या मनाच्या मालकिणी बघितल्या की खऱ्या अर्थानं स्त्री स्वातंत्र्य उंबरठ्याच्या आत आल्यासारखं वाटतंय.

संपर्क : lihitibai@gmail.com

बातम्या आणखी आहेत...