आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Need For Mental Change In The Family System... | Article By Dr. Shilpa Bendale

विचार:गरज कुटुंबव्यवस्थेच्या मानसिक बदलाची...

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न लग्न म्हणजे काय असतं? आनंदाचं उधाण असतं, जबाबदारीचं वाण असतं. पतीमागे पाऊल टाकणाऱ्या मनात सहचर्याचं सुंदर जीवन असतं...

लग्न म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र संस्कार. सर्वांच्याच आयुष्यातील एक चिरस्मरणीय व्यक्तिगत आणि तरीही सामाजिक सोहळा. या विवाह संस्थेतूनच पुढे जन्माला येते ती कुटुंब व्यवस्था. विवाह उत्सवानंतर खऱ्या अर्थाने आयुष्य बदलतं ते नवविवाहित मुलीचं. नवीन घर, नवीन वातावरण, नवी माणसं आणि त्या सर्वांशी आयुष्यभर जुळवून घेणं. तेव्हा या घरात येणाऱ्या नवीन सभासदाला समजून घेणं ही सर्वांची जबाबदारी; त्यातही घरातील स्त्रियांची जरा जास्तच. म्हणूनच विवाह संस्थेच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्था उभी करत असताना कुटुंब व्यवस्थेचा भाग होऊ पाहणाऱ्या या नवीन सभासदाला समजून घेण्याची मानसिकता बदलाची आवश्यकता आहे. सासू, जावा, नणंद तिच्या आधी या सर्व प्रवासातून गेलेल्या असतात तेव्हा त्यांनी घरात आलेल्या नवविवाहितेच्या पाठीशी मैत्रीण म्हणून उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक घराचे संस्कार किंवा रुढी, परंपरा यात थोडाफार फरक असू शकतो, पण त्यासाठी आमच्याकडे हे चालणार नाही, या पद्धतीनेच वागावे लागेल अशा कुरापतींपेक्षा नवविवाहितेची मानसिकता समजून घेतली पाहिजे आणि स्वतःची मानसिकताही बदलली पाहिजे. नवविवाहितांसाठी सर्व कुटुंब सदस्यांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडेफार बदल करुन घेतल्यास कुटुंब व्यवस्था सहजीवन व्यवस्था होईल.

लग्न जमवताना नोकरी करणाऱ्या मुलीला प्राधान्य दिले जाते. लग्नानंतर मात्र घर आणि नोकरी सांभाळताना त्या मुलीची प्रचंड तारेवरची कसरत होते. तेव्हा घरातील सून म्हणून तिच्यावर अटी, शर्ती न लादता तिला नोकरी आणि घर यातील समतोल कसा साधता येईल याची काळजी नवऱ्यासकट प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. सासर सोबतच मुलीच्या माहेरच्या सदस्यांची मानसिकता बदलणेही तेवढेच गरजेचे आहे. मुलीच्या संसारात ढवळाढवळ वाटतील अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. पूर्वी लग्नानंतर माहेरपणाव्यतिरिक्त आई मुलीचा जास्त संवाद होत नसे, पण हल्ली मोबाइल युगात उठता बसता चौकशा होऊ लागल्या आहेत. अतिरेकी संवादातून वितुष्ट निर्माण होऊ लागले आहे. कमावत्या मुलींच्या बाबतीत माहेरच्यांनी हस्तक्षेप न करता ती आणि तिचा नवरा काय तो त्यांच्या कमाईचा व्यवहार करतील अशाच भूमिकेत राहावे. तुम्ही ज्याच्याशी मुलीची लग्न गाठ बांधून दिलीय त्याच्यावर विश्वास ठेवा. मुलींनीही सुज्ञ, समंजस भूमिका घेत सासर-माहेरचा उत्तम समन्वय राखावा शेवटी सासर आपले, माहेरही आपलेच आणि संसारही आपलाच.

कुटुंबव्यवस्थेत हल्ली प्रकर्षाने जाणवू लागलेला विषय म्हणजे कायद्याचा. अपवाद सर्व ठिकाणी नक्कीच आहेत तरीही छोट्या छोट्या गोष्टींवरून मुली कायद्याचा आधार घेऊन बऱ्याचदा सासरच्या मंडळीला दबावात घेतात अर्थात माहेरचा पाठिंबा असतोच. नोकरी, स्वातंत्र्य व समानता यामुळे स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यात. ही आनंदाची बाब असली तरी यातून बऱ्याच मुलींचे वागणे हे ‘मी वेगळी’ ‘मी वरचढ’ असे दिसू लागले आहे. आम्ही तडजोड का करावी अशी मानसिकता या मुलींमध्ये वरचेवर नजरेस पडते. कायदा आणि सहानुभूती बऱ्यापैकी महिलांच्या बाजूने असल्यामुळे आणि पोलीस स्टेशन आणि न्यायालयात उलटसुलट माहिती सादर केल्यामुळे तर कित्येक सासरच्या मंडळींचे आयुष्यच उद‌्ध्वस्त झालेले आहे. या सर्वांमधून काय साध्य होणार आहे? याचेही उत्तर शोधावेच लागेल. एकाच्या आयुष्याची फरपट करुन दुसऱ्यासोबत संसाराचा घाट घालू पाहणारी मानसिकता कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लावणारी असल्यामुळे ती बदलण्याची गरज आहे. लग्न, विवाह संस्था म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं मिलन नसून ते दोन कुटुंबांचं पर्यायाने दोन समाज आणि गावांचं मिलन आहे. आपल्या आयुष्यात परक्या व्यक्तीला सामावून घेणं, त्याला जीव लावणं, त्यावर मनापासून प्रेम करणं, तन-मन त्याला समर्पित करणं हे केवळ विवाह संस्कारांमुळेच शक्य होतं. विवाह ही आयुष्यभरासाठी केलेली वचनबद्धता आहे याची जाणीव नवविवाहित जोडप्यासोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला असली पाहिजे. कारण हा प्रवास तप्तपदीचा नसून सप्तपदीचा आहे.

प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे

बातम्या आणखी आहेत...