आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:सरत्या वर्षाने दिलेली नवी उमेद...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण २०२२ चे पान उलटून २०२३ च्या पानावर आलो आहोत. गेल्या वर्षीच्या पानावर नजर टाकली तर लक्षात येईल की भारतीय स्त्री जगतात कितीतरी आनंददायी, सकारात्मक आणि बळ देणाऱ्या घटना घडल्यात. हे खरे आहे की, पूर्वीच्या तुलनेने आता भारतीय स्त्रीला अनेक संधी उपलब्ध होत आहेत, समाजमन बदलते आहे. पण, या बदलाचा वेग फार संथ आहे त्यामुळे तिच्यासमोर वेगळी असली, तरी अनेक आव्हाने आहेत. ग्लास सिलिंग आहेच. ती त्याचे भांडवल करून सहानुभूती घेऊ शकली असती. पण, गेल्या वर्षातील स्त्रियांच्या कामगिरीकडे नजर टाकली तर असे दिसते की त्यांनी अडचणींच्या दगडाला पायाखाली घेऊन त्यावर उभे राहून आपली उंची वाढवण्याला प्राधान्य दिलेय.

भारतात या आधीही स्त्रियांनी पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री यासारखी महत्तम पदे भूषविली आहेत. पण, गेल्या २५ जुलैला “राष्ट्रपती’ या सर्वोच्चपदी झालेली द्रौपदी मुर्मू यांची निवड विशेष म्हणावी लागेल. भारताच्या राष्ट्रपतिपदासाठी निवड होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या त्या दुसऱ्या आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या व्यक्ती आहेत. स्वत:च्या सामाजिक पार्श्वभूमीचा त्यांनी राजकीय कारकीर्दीत कुठेही अडसर ठरू दिला नाही.

पतीच्या विचारप्रणालीनुसार पत्नीची वाटचाल असते, हे नेहमीचे चित्र आहे. पण, दोन स्त्रियांनी त्यात बदल केलाय. ‘फोर्ब्स’च्या २०२२ मधील जगातील सर्वात ताकदीच्या शंभर महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन ३६ व्या क्रमांकावर आहेत. इंदिरा गांधींनंतर अर्थमंत्रिपद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. त्या एनडीए सरकारचा भाग असल्या, तरी त्यांचे पती काँग्रेस समर्थक आहेत, असे म्हटले जाते. पत्नीची पतीपेक्षा वेगळी राजकीय भूमिका असली, तरी ती संरक्षणमंत्री किंवा अर्थमंत्रिपदाचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकते, हा नवा बोध भारतीय स्त्रियांचे मनोबल उंचावणारा आहे. रोहिणी नीलेकणी यांनी गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १२० कोटी रु. च्या देणग्या दिल्यामुळे २०२२ च्या एडेल्गिव्ह ह्यूरन इंडिया फिलँथ्रॉपी यादीत सर्वाधिक उदार भारतीय महिला म्हणून त्या प्रथम स्थानी पोहोचल्या आहेत. ‘अर्घ्यम’ या सामाजिक संस्थेच्या त्या संचालिका आहेत. सगळ्याच गोष्टींसाठी सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा काहींसाठी आपण आपल्या परीनं पुढं यायला हवं, असं आवाहन त्या भारतातील श्रीमंतवर्गाला करतात, तेव्हा त्यांचं वेगळेपण उठून दिसतं.

“आपला लढा लढताना, काम उपसताना एखाद्या स्त्रीला रडू आलं तर त्यात काहीही गैर नाही, उलट तिने कणखरपणाचा मुखवटा न घालता रडून मोकळं व्हावं आणि नव्या जोमाने कामाला लागावं..” विनीता सिंह यांची ही पोस्ट गेल्या वर्षी चर्चेचा विषय ठरली. यशस्वी व्हायचे असेल, तर पुरुषी गुण अंगी बाणवले पाहिजेत, असं हल्ली स्त्रियांना वारंवार सांगितलं जातं. त्या पार्श्वभूमीवर हे सांगून विनीता सिंह यांनी स्त्रियांना आश्वस्त केले. विनीता सिंह म्हणजे ‘शुगर कॉस्मेटिक’ या लोकप्रिय ब्रँडमागचा चेहरा. “शार्क टँक’ हा स्टार्ट अप्सना मंच आणि संधी उपलब्ध करून देणारा गतवर्षीचा प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो. त्यात विनीता प्रशिक्षक आणि जजच्या चमूमध्ये होत्या. करोडोंचा पगार देणारी सुरक्षित नोकरी सोडून त्या व्यवसायात उतरल्या आणि नोकरी मागण्याऐवजी नोकरी ‘देण्या’ला, निर्माण करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं.

एक मध्यमवर्गीय बी टेक उत्तीर्ण शिक्षिका ठरवले, तर आपल्या बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर भारतातील १० सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवू शकते, हे दिव्या गोकुलनाथ यांनी गेल्या वर्षी सिद्ध केले आहे. २०११ मध्ये स्थापन झालेल्या ‘बायजू’चे नाव कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणासाठी सर्वतोमुखी झाले. दिव्या या बायजू रवींद्रन यांच्या पत्नी. दोघांनी मिळून या कंपनीचे मूल्य आता २१ अब्ज अमेरिकन डॉलर इतके उंचावर नेऊन ठेवलेय. इंग्लिशमध्ये लिहिले तरच लेखिका म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळते हा समज कादंबरीकार आणि लघुकथा लेखिका गीतांजली श्री यांनी मोडीत काढला. हिंदी भाषेतील ‘रेत समाधी’ या त्यांच्या कादंबरीच्या अनुवादाने २०२२ च्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारावर आपले नाव कोरले. मुलीचे खेळातले करियर हा तिच्या पुढील जीवनातला अडथळा मानणाऱ्या समाजाची मानसिकता मुली आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर येत्या काळात नक्कीच बदलतील. त्याची नांदी युवा महिला खेळाडूंनी २०२२ मध्ये केली, असे म्हणायला हरकत नाही. दोनदा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकलेच पण शिल्की देवी हेमाम ही फक्त १६ वर्षीय मणिपूरची खेळाडू २०२२ मधील महिला आशिया फुटबॉल चषकातील सर्वात तरुण खेळाडू ठरली. वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिप २०२२ मध्ये १५ वर्षांच्या लिंथोई चनाम्बमने ज्युदोमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. भारतातील अव्वल महिला बुद्धिबळपटूंपैकी एक आणि राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेती महाराष्ट्राची दिव्या देशमुख ही भारताची २१ वी महिला ग्रँडमास्टर आहे. १५ वर्षांखालील गटातील भारताची सर्वोत्कृष्ट टेबल टेनिसपटू म्हणजे नागपूरची १३ वर्षीय जेनिफर वर्गीस. तिने २०२२ मध्ये ट्युनिस येथे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि सुवर्णपदकासह जगातील अव्वल २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. राजकारण आपला प्रांत नव्हे असे अनेक सुशिक्षित तरुण मानत असताना एक युवती जिद्दीने वेगळी वाट चोखाळते आहे. तिचे नाव आहे यशोधरा शिंदे. महिलांसाठी स्वच्छतागृहे, परदेशासारखी शाळेत किंवा विशिष्ट ठिकाणी सॅनेटरी पॅडच्या व्हेंडिंग मशीन्सची सुविधा गावात देणे असे वेगळे मुद्दे तिच्या प्रचारात होते. परदेशातील धर्तीवर गावाचा विकास करण्याचा मनोदय तिने गावकऱ्यांसमोर व्यक्त केला. जॉर्जिया या देशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतलेली ही फक्त २१ वर्षांची युवती डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या सांगलीतील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे. खेळापासून अर्थशास्त्रापर्यंत आणि शिक्षण क्षेत्रापासून राजकारणापर्यंत विविध क्षेत्रावर आपली मोहोर उमटवणाऱ्या या मुली-महिलांमध्ये तीन सामाईक गुण आहेत. ते म्हणजे ‘आस्क’ अर्थात अ‍ॅटिट्यूड, स्कील आणि नॉलेज. आपले ध्येय निश्चित करणे, त्यासाठी आवश्यक ते ज्ञान ,प्रशिक्षण मिळवणे आणि मेहनतीच्या जोरावर व सरावाने कौशल्य प्राप्त करणे. या यशस्वी स्त्रियांनी आपलं स्त्री असणं मध्ये येऊ न देता आपला प्रवास ज्या तडफेने सुरू ठेवला आहे, तो सर्वसामान्य भारतीय स्त्रियांना नववर्षामध्ये नवी उमेद देणारा आहे, हे निश्चित.

मोहिनी मोडक संपर्क : mohinimodak@gmail.com

बातम्या आणखी आहेत...