आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Pakistan Army Has Made A Mistake In Deciding Its Target | Article By Pawan K Sharma

विश्लेषण:आपले लक्ष्य ठरवण्यातच चुकले आहे पाकिस्तानचे लष्कर

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील एका अग्रणी राजकारण्याच्या हत्येचा प्रयत्न करणारे सहसा लक्ष्य चुकत नाहीत. १९५१ मध्ये पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांची जनरल झिया-उल-हक यांनी कांगारू-न्यायालयाद्वारे हत्या केली होती. त्यांची मुलगी बेनझीर भुत्तो यांनाही २००७ मध्ये मारले गेले. ३ नोव्हेंबरला इम्रान खान इस्लामाबादकडे लाँग मार्च काढत असताना वजिराबादमध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्या पायाला चार गोळ्या लागल्या, मात्र त्यांचा जीव वाचला. हा चमत्कार कसा झाला?

या प्रश्नाची तीन उत्तरे आहेत. एक, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांच्याबद्दल वाढता असंतोष; दोन, पाकिस्तानची बिकट अर्थव्यवस्था आणि तीन, इम्रान खान यांची झपाट्याने वाढणारी लोकप्रियता. आतापर्यंत पाकिस्तानचे सैन्य निवडून आलेल्या पंतप्रधानांना सहज बाजूला करायचे, अशी परिस्थिती होती. लष्कराच्या परवानगीने नागरी सरकारे स्थापन झाली. लष्कराच्या नाराजीनंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले. आजपर्यंत एकाही पाकिस्तानी पंतप्रधानाने कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. इम्रानही २०१८ मध्ये लष्कराच्या निवडीने सत्तेवर आले. मात्र, त्यानंतर त्यांचा प्रभाव वाढला. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र परराष्ट्र धोरण चालवण्यास आणि लष्कराच्या कारभारातही हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना विरोध केला आणि त्यांच्याविरोधात आयएसआय प्रमुख फैजल हमीद यांना पाठिंबा दिला. एप्रिल २०२२ मध्ये लष्कराच्या कथित संमतीने अविश्वास प्रस्ताव आणून इम्रान यांना पदावरून हटवण्यात आले.

यानंतर इम्रान दृश्यावरून गायब होतील किंवा त्यांच्यावर इतके कायदेशीर खटले दाखल होतील की ते स्वतःच मागे हटतील, असे लष्कराला वाटत होते. पण इम्रान यांनी ऐतिहासिकदृष्ट्या लष्कराशी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत खऱ्या लोकशाहीची हाक दिली. लष्कर लोकशाहीविरोधी, बेजबाबदार आणि भ्रष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मोहिमेने प्रेरित होऊन लोक ‘यह जो दहशतगर्दी है, इसके पीछे वर्दी है।’ अशा घोषणा देऊ लागले. जुलै २०२२ मध्ये इम्रान यांची हकालपट्टी झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांच्या पक्षाने पंजाब पोटनिवडणुकीत २० पैकी १५ जागा जिंकून मोठे यश मिळवले. खरे तर पंजाब हा पाकिस्तान मुस्लिम लीगचा (नवाझ) बालेकिल्ला मानला जातो. इस्लामाबादकडे निघालेल्या त्यांच्या लाँग मार्चकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. आज इम्रान पाकिस्तानचे सर्वात लोकप्रिय राजकारणी झाले आहेत.

इथे गंमत म्हणजे इम्रान स्वतः लोकशाहीवादी नाहीत. लष्कराच्या पाठिंब्यावर ते सत्तेवर आले आणि सरकारमध्ये असताना लष्कर व आयएसआयवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करून त्यांचे अपहरण करण्यात आले. पण, आज त्यांच्या परिवर्तनाच्या मोहिमेला लोकांचा पाठिंबा मिळत आहे, त्याचे वाईट अर्थव्यवस्था हेच कारण आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये गेली आहे. यावर्षी आलेल्या भीषण पुराने त्यांचे खूप नुकसान केले. महागाई अनियंत्रित झाली आहे, इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, पाकिस्तानी रुपया कोसळला आहे आणि ऊर्जेचे संकट ओढवले आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि आयएमएफच्या ७.२ अब्ज डाॅलर बेलआउट पॅकेजची वाट पाहत आहे. पाकिस्तानची ६४ टक्के लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे आणि या तरुणांना चांगले भविष्य हवे आहे. त्यांना इम्रानमध्ये आशा दिसते. त्यामुळे लष्कर आणि आयएसआय बॅकफूटवर आले आहेत. ते पाकिस्तानवर पूर्वीप्रमाणे लष्करी राजवट लादतील, पण त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. कदाचित या वेळी पाकिस्तानातील जनता त्याला कडाडून विरोध करेल आणि लष्कराची मुळे हादरतील. त्यामुळे मारेकऱ्याचे लक्ष्य चुकले. पाकिस्तानातील आर्मी-आयएसआय कॉम्बोला मोहिमेतून माघार घेण्याचा संदेश इम्रान यांना द्यायचा होता, पण त्याच वेळी जनतेच्या विरोधाच्या भीतीने ते त्यांना मारूही शकले नाही. ही विचारपूर्वक आखलेली रणनीती होती, ती फारशी प्रभावी ठरलेली दिसत नाही. इम्रान यांनी आपला लाँग मार्च पुन्हा सुरू केला आहे. ते खचले नाहीत. पाकिस्तानमध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या तर इम्रान पुन्हा सत्तेत परतण्याची दाट शक्यता आहे.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) पवन के. वर्मा लेखक, मुत्सद्दी, माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com

बातम्या आणखी आहेत...