आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:शिकागो व्याख्यानाची सार्वकालिकता

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर या वर्षाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक, आध्यात्मिक पातळ्यांवर काम करणाऱ्या विवेकानंद केंद्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या ११ सप्टेंबरला स्वामी विवेकानंदांनी शिकागो इथल्या सर्वधर्मपरिषदेत केलेल्या भाषणाला १२९ वर्षे पूर्ण झाली.

स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण ज्या हिंदुस्थानात राहतो, त्या तुमच्या-माझ्या हिंदुस्थानातील हिंदू धर्मावर अनेक धर्मांतील-जातींतील लोकांनी आक्रमणे केली खरी; तरी पण हा धर्म केवळ टिकून आहे. एवढेच नव्हे तर सर्व नद्यांचे पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळते त्याचप्रमाणे सर्व धर्मांचे उगमस्थान वेगवेगळे असले तरी ते हिंदू धर्माला येऊन मिळाले आहेत. हिंदू धर्माने सर्वांना सामावून घेतले आहे. यातूनच हिंदू धर्माची सहिष्णुता दिसून येते. परंतु आजच्या काळात स्वतःच्या पंथाचा वृथा अभिमान बाळगून इतरांना तुच्छ लेखणे असो किंवा स्वत:चे मतच तेवढे खरे असे मानणे असो...अशा प्रकारांमुळे आपसात होणारी भांडणे इतकी विकोपाला जात आहेत की त्यामुळे संस्कृतीचा ऱ्हास तर झालाच आहे; पण, राष्ट्रा-राष्ट्रांमध्येदेखील भयंकर अस्वस्थता निर्माण झालीय. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाची बनलेली कूपमंडुक वृत्ती. प्रत्येक धर्मातील माणसाला मी आणि माझा धर्मच तेवढा खरा, असे वाटते ही खूप खेदाची गोष्ट आहे. प्रत्येक माणसाच्या ठायी वास करणारी प्रवृत्ती, त्याचे रंगरूप, गुणदोष हे भिन्न असले तरी त्याच्या ठायी वसणारा आत्मा एकच असतो. या आत्म्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त माणसाच्या मृत्यूनंतर रंगभूमीवरच्या कलाकाराने ज्याप्रमाणे वस्त्र बदलून रंगभूमीवर प्रवेश करावा त्याप्रमाणे तो एका देहातून दुसऱ्या देहात प्रविष्ट होतो. त्यालाच आपण नाव देतो, पुनर्जन्म....! त्यामुळे आत्मा अविनाशी आहे हे चिरंतन सत्य आहे. आपण ज्या इंद्रियांच्या अधीन होऊन काम-क्रोधादी विकारांच्या, षड्रिपूंच्या विळख्यात बद्ध होतो, त्या इंद्रियांच्याही पलीकडे जाऊन या देहात चैतन्य जागृत ठेवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण शरण गेलो तर आपल्या जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले, असे म्हणता येईल आणि मी, माझा धर्म, माझा पंथ तेवढेच खरे, अशी कूपमंडुक वृत्ती न राहता “ईशावास्यम् इदं सर्वम्’ अशी वृत्ती मनात वास करू लागेल. आपले वेद, उपनिषदे सातत्याने आपल्याला हाच संदेश देत आली आहेत. कोणताही भेद न करता सर्वांठायी वसणारा आत्मा तर एक आहेच; परंतु सर्व प्राणिमात्रांत वास करणारा ईश्वरही सर्वत्र एकच आहे, याचे भान आपण सातत्याने आपल्या मनात जागते ठेवले तर तुमच्या-माझ्या ठायी काम-क्रोधादी षड्रिपूंच्या माध्यमातून वास करणारा मी, अहं गळून पडण्यास मदत होईल.

ईश्वरप्राप्ती हेच जर आपण आपले ध्येय मानले, त्या साध्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली तर “विविधतेतून एकता’ या प्रकृतीच्या नियमानुसार आपण ते साध्य निश्चित गाठू शकतो. मात्र त्यासाठी वर वर्णन केल्याप्रमाणे सर्व आचरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार आचरण करू लागल्यावर “मी’ तर गळून पडेलच; परंतु आपल्या आचरणातून सहजतेने विश्वबंधुत्वाची कल्पना साकारू लागेल, आचरणात येऊ लागेल. एवढेच काय, पण आपण आपल्या मनातला “विश्वबंधुत्व” हा शब्द, त्याचा अर्थ, वगैरेसुद्धा गळून पडेल. तेव्हा समस्त बंधुभगिनींनो, स्वामी विवेकानंदांच्या वेळचा काळ, त्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात वरकरणी जरी महदंतर दिसत असले तरीदेखील आजची सामाजिक परिस्थिती, समाजाची मानसिकता लक्षात घेता स्वामी विवेकानंदांच्या त्या वेळच्या भाषणावर आज पुनश्च एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रांजली कुलकर्णी संपर्क : ८९९९७०३७५७

बातम्या आणखी आहेत...