आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Post Covid Student: Growth And Development Stages | Article By Dwarkanath Joshi

शिक्षक दिन विशेष:कोविडोत्तर विद्यार्थी : वाढ आणि विकास अवस्था

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ आणि विकास यासंदर्भात संशोधन करून त्यांचे वर्गीकरण जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे केले आहे. हा संदर्भ देण्याचे कारण असे की, या वेळी आपले शैक्षणिक संदर्भ एका वेगळ्या मानसिकतेतून जात आहेत आणि म्हणूनच याला एका वेगळ्या धाटणीतून आपण कोरोनापूर्व आणि कोरोनात्तोर विद्यार्थी वाढ आणि विकास यांच्या विविध अवस्थांसंदर्भात कोरोनात्तोर काळाचा विचार करणार आहोत.. कोविडनंतर शाळा ही विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांसाठी अभूतपूर्व अशी आव्हाने घेऊन आली आहे. शैशवावस्था आणि कौमार्यावस्था यातील विद्यार्थी हा शाळांचा गाभा घटक आहे. ३ ते १५ वर्षे वयोगटातील आपले विद्यार्थी आजदेखील शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींना प्रचंड प्रमाणामध्ये सामोरे जात आहेत. त्या अडचणी समजावून घेऊन शिक्षक आणि पालक म्हणून त्या अडचणी जर आपण सोडवू शकलो तर खरोखरच आपण या विद्यार्थ्यांसाठी एका नव्या युगाचा प्रवेश सुकर करतो आहोत असे म्हणता येईल.

यातील काही महत्त्वाच्या अडचणी आपण समजावून घेऊयात.... शैशवावस्थेतील मुले आपल्या भावनांचा अाविष्कार शारीरिक कृतीच्या मदतीने करतात. उदाहरणार्थ- सुख व्यक्त करताना टाळ्या वाजवणे, उंच वा लहान उड्या मारणे तसेच क्रोध आल्यानंतर वस्तू फेकून देणे, वस्तू नष्ट करून टाकणे या पद्धतीच्या त्या असतात. कोविडच्या काळात विद्यार्थ्यांचे शाळांमधून होणारे सामाजीकरण अल्प प्रमाणात होते. हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. आनंद आणि दुःख या भावनांना दिशा देण्याचे काम कुटुंबानंतर शाळेत होते आणि नेमके तेच जवळपास दोन वर्षे काही प्रमाणात थांबल्यासारखे झाले. याचे परिणाम शाळा सुरू झाल्यानंतर अगदी तीव्रतेने म्हणता येणार नाही, परंतु एका विशिष्ट गतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याची नांदी ओळखणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पद्धतीची उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ऐकणे, वाचन, भाषण - संभाषण, लेखन या पायाभूत कौशल्यांना दुप्पट वेगाने गती देणे अगदी काळाचीच गरज झालेली आहे. शिक्षक आणि पालकांनी तसेच काही समाजघटकांनी एकत्र येऊन यासंदर्भात सविस्तर विचार करणे महत्त्वाचे आहे.

किशोरावस्थेतील मुले, जी साधारणपणे आपण ६ ते १२ या वयोगटातील ग्राह्य धरतो ती मुले प्राथमिक शाळेत जाऊ लागतात तेव्हा चालणे, पळणे, खेळणे, बोलणे या क्रियांबरोबर वस्तू, नाव, प्राणी काही प्रमाणात झाडेसुद्धा ओळखायचे शिकतात. हातात पेन्सिल धरून लिहिता येणे, कल्पना करता येणे, केलेल्या कल्पनांची पृच्छा करणे यासारखे प्रयोग काही प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये रुजत असतात. त्यांचे स्वतःच्या हातापायांवर नियंत्रण असते आणि आपल्या हातापायांचा उपयोग ते त्यांच्या इच्छेनुसार करू शकतात. कोणती ना कोणती कृती करण्यास ते नेहमीच तयार असतात. पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था यामध्ये हे सर्व काही ओघाने आलेच, परंतु वरील घटकांचा आपण विचार केल्यानंतर त्यांचे बोलणे, खेळणे, हसणे, पळणे, लिहिणे, पेन किंवा पेन्सिल हातात धरणे, चित्र काढणे, प्रसंगी त्यास रंगवणे या सर्व क्रिया आणि प्रक्रिया दोन वर्षांत शाळेत न घडता घरामध्ये घडलेल्या आहेत. याचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक आहे. खरे तर ही अशी परिस्थिती होती की लॉकअप की लॉकडाऊन? शरीर चार भिंतीत कोंबलेले.... खाण्यापिण्यावर नियंत्रण नाही ....तीनपेक्षा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळेस खाणे. व्यायाम राहिला बाजूला आणि शरीरामध्ये मेद आणि ऊर्जा साठवण्याची प्रक्रिया सुरू झाली, जी विद्यार्थ्यांना मुळीच हितावह नाही.

पाटी दूर झाली ! मोबाइल हातात आला ! मोबाइलची सवय झाली ! मुले स्क्रीन हाताळू लागली. एखाद्या व्यसनासारखी. आता हात देतो आहे, प्रतिसाद द्या. मुलांसाठी आणि सुदृढ समाजासाठी एकत्र होऊयात या अपेक्षेने आपण एकत्र व्हायलाच हवे. कोविडोत्तर शाळेतील घटकांच्या संदर्भाने होणारा विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर ‘पियाजे’यांची प्रकर्षाने आठवण होते. ते म्हणतात, “एखाद्या मुलाला प्रश्न समजला नाही तर बुद्धिमापन कसोटीला बरीच माहिती मिळू शकत नाही. याबाबतीत मुलांची उत्तरे जशी येतील त्या उत्तरांना अनुसरून पुढील प्रश्न विचारण्याची पद्धत स्वीकारायला हवी.’ कोविडोत्तर शाळांना आता प्रारंभ झालेला आहे. यात नर्सरी ते सीनियर केजी यांचा विचार होणे अगदी क्रमप्राप्त झाले आहे. कारण अगदी सुरुवातीच्या काळात शैशवावस्थेत आई ही बालकाच्या सामाजिक परिघात असते. आई म्हणजेच त्याच्या जीवनाचा सामाजिक प्रारंभ असतो. मुलांचा सामाजिक विकास त्यांच्या घरातील वयाने मोठ्या घटकांशी निगडित असतो. साधारणपणे त्यानंतर त्यांचा संबंध इतर मुलांशी येतो. त्या काळात मुले एकमेकांशी संपर्क ठेवत नाहीत. अगदी पटकन स्वतःचे नावदेखील दुसऱ्यास सांगत नाहीत. समवयस्क मुलांच्या वस्तू यांना हव्याहव्याशा वाटतात. स्वतःच्या वस्तू मात्र ते इतरांना देण्यास तयार नसतात. काळ बदलतो आणि ही मुले मात्र इतरांना हळूहळू स्वीकारायला लागतात. ती एकमेकांशी सहकार्याने वागू लागतात. त्यातील एखादे मूल तर कधी कधी त्यांचा ‘बॉसही’ बनते. एखाद्या वेळी अगदी उलट घडते. मुले जराशी आक्रमकसुद्धा होऊ शकतात. या वयात मुले चांगले संस्कार जोपासू शकतात. वागण्याचे, बोलण्याचे, सामाजिक साहचर्याचे चांगले संस्कार या अवस्थेत बालकांवर होतात आणि ते खूप काळ टिकतात. या संदर्भाने न भरून येणारे नुकसान कोविडने या मुलांचे गेल्या काळात केलेले आहे. आपण या वयात मुलांना जे अनौपचारिक शिक्षण द्यायचे आहे त्याचा विचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिशुशाळेमध्ये शैशवावस्थेतील शारीरिक व मानसिक विकास लक्षात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करणे हेदेखील या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून अनेक कृती करून घेणे जसे बुटांना लेस लावणे, चित्र रंगवणे, स्वतःच्या शर्टला-पँटला बटणे लावता येणे, खेळ खेळणे अशा कृतींवर येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त भर दिल्यास कदाचित कोविडोत्तर काळाची भर आपण योग्य पद्धतीने पूर्ण करू शकू असे मला वाटते. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांनी स्वच्छतेवर भर द्यावा, एकमेकांशी सहकार्य करणे शिकावे तसेच सांघिक खेळांत, वैयक्तिक गीते म्हणण्याची भरपूर व्यवस्था जर कधी आपण केली तर मला वाटतं की आपण या काळावर थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु मात नक्की करू.

जसे नर्सरी ते सीनियर केजीचे तसेच तसेच किशोरावस्थेचे ६ ते १२ या शारीरिक वयातील बालकांचा साधारणपणे या अवस्थेत समावेश होतो. मुले प्राथमिक शाळेत जाऊ लागतात. त्यांचा मेंदू विकास जवळजवळ पूर्ण झालेला असल्यामुळे शाळेत जाऊन शिकण्यासाठी ही मुले तयार झालेली असतात. त्यांचे अनुभव आणि माहिती क्षेत्रही विस्तारलेले असते.त्यांची प्रश्न विचारण्याची आणि एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा जागृत झालेली असल्यामुळे ते निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न सतत विचारत असतात. त्यांची शब्दसंपत्ती वाढल्यामुळे आकलनशक्ती, अभिव्यक्ती तसेच विवेकक्षमता विकसित झालेल्या असतात. याच काळामध्ये त्यांच्यात निरसता अजिबात जाणवत नाही. एखादे काम शिकण्यासाठी व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक वेळ अभ्यास करण्यास वयातील मुले नेहमी तयार असतात. या वयात मुलांची ग्रहणशक्ती चांगली विकसित झालेली असते. तर्क करणे, मागोवा काढणे, नवनिर्माण या क्षमतेपर्यंत काही विद्यार्थी अगदी छान पद्धतीने पोहोचतात. या सगळ्या क्रिया आणि प्रक्रियांमध्ये आपण मागील दोन वर्षे अक्षरशा घालवून बसलेलो आहोत असे म्हटले तरीही चालेल. शाळेमध्ये या क्रिया-प्रतिक्रिया घडल्याच नाहीत, याची जर कधी उणीव आपल्याला भरून काढता आली नाही तर आपल्याला एका वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागेल.

ही धोक्याची घंटा वेळीच ओळखणे आपल्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे. ती ओळखूनच पुढची पावलं टाकणं हेसुद्धा क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचा सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक विकास आणि त्या विकासासंदर्भाच्या या सगळ्या पायऱ्या आपल्याला एकच सांगून जातात - जे राहिले आहे ते आता पूर्णत्वाकडे आपण नेले पाहिजे. वेळोवेळी उपाययोजना केल्या पाहिजेत. हे तेव्हाच घडू शकेल ज्या वेळी तुम्ही, मी, आपण सर्वजण एकत्र येऊन शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज हा चौकोन साधला जाईल...

द्वारकानाथ जोशी संपर्क : ८३२९२७६२५२

बातम्या आणखी आहेत...