आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरक:अचेतन मनाची शक्ती

प्रदीप शेटे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए केकाळी कॅन्सरचं नाव ऐकताच व्यक्ती खचत असे. पुढे कॅन्सरवर आधुनिक औषधोपचार पद्धती आली. त्यातून बरे होण्याची शक्यता निर्माण झाली. पण तरीसुद्धा आजदेखील कॅन्सरचं नाव ऐकताच छातीत धडकी भरते. एका नावाजलेल्या मराठी दैनिकात ३० वर्षे जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या वंदना अत्रे यांच्या जीवनात कॅन्सरने सर्वप्रथम २००८ मध्ये प्रवेश केला. उपचार म्हणून सर्वप्रथम शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सहा वेळा किमोथेरपी, रेडिएशन आणि औषधांचा मारा या सर्वातून त्यांना जावे लागले. सर्व ठीक झालं आहे, असं वाटत असतानाच २०१४ आणि २०१७ मध्ये कॅन्सरने त्यांच्या शरीरात पुन्हा प्रवेश केला. प्रत्येक वेळी कॅन्सरने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर हल्ला केला होता. प्रत्येक वेळा ऑपरेशन, सहा वेळा किमोथेरपी, रेडिएशन आणि औषधांचा मारा यामधून त्यांना जावे लागले. आतापर्यंत त्यांना एकूण १८ वेळा किमोथेरपीला सामोरे जावे लागले. मानसिक, शारीरिक त्रास तर होताच, पण कधी-कधी आजार परवडला, पण उपचार नको, असे वाटायचे. कौतुकास्पद म्हणजे तिन्ही वेळा कॅन्सरवर मात करून त्या आज आनंदी जीवन जगत आहेत. शिवाय, कॅन्सर रुग्णांचे मनोबल वाढवून, त्यावर कशी मात करायची याविषयी मार्गदर्शनही करत आहेत. एखाद्या आजारामुळे सामान्यतः व्यक्तीमध्ये नकारात्मकता वाढीस लागते. आता सारे संपले आहे, मी आता काहीच करू शकणार नाही, आता माझ्यात लढण्याची क्षमता नाही. ईश्वराने माझ्यावर अन्याय केला आहे, अशा प्रकारची भावना वाढीस लागते. पण, हार मानेल ती पत्रकार कसली? हाडाची पत्रकारिता करणाऱ्या वंदना यांना त्यांच्यात असलेली अंगभूत लढाऊ वृत्ती येथे कामी आली. कॅन्सरमुळे जीवनात पसरलेल्या अंधकारातून प्रकाशाचा किरण शोधण्याचे काम सुरू झाले. शत्रू असलेल्या कॅन्सरसोबत प्रवास करताना तो शत्रूचा सोबती कसा झाला, हे समजलं नाही. त्याचे आपल्या जीवनात येणे म्हणजे नियतीची काहीतरी योजना असावी, असं वाटू लागलं. स्वतःशी संवाद कसे करायचे, हे त्या काळात त्यांनी अनुभवलं. स्वतःवर त्याचे प्रयोग केले. या सर्व प्रवासात राज्याचे निवृत्त पोलिस उपमहासंचालक भीष्मराज बाम यांची मदत झाली. शारीरिक पातळीवर डॉक्टरांचे उपचार सुरू होते. इच्छाशक्तीवर आधारित तत्त्वज्ञानाचा वापर करून अचेतन मनाच्या अमर्याद शक्तीचा वापर करून उपचाराचा तो प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. ध्यान, सकारात्मक स्वयंसूचना आणि सकारात्मक काल्पनिक चित्र उभे करण्याचा अभ्यास नियमित केल्यास; अचेतन मनाच्या अमर्याद शक्तीचा वापर स्वप्रतिमा रिप्रोग्रामिंग करून मानसिक पातळीवर आजारावर मात करण्याचे बळ अंगी येते. येथे सर्वात महत्त्वाचे असते, ते म्हणजे त्याला प्रयत्नांची जोड देणे. इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी रोजच्या रोज आपला स्वतःशी होणारा संवाद आणि आपण आपल्या भविष्याकडे कसे पाहतो, यावर लक्ष देऊन या दोन्ही गोष्टी सुधारण्यावर भर देणे गरजेचे असते. ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, त्या संबंधीच्या सकारात्मक स्वयंसूचना अचेतन मनाला द्यायच्या असतात. कुठल्याही आजारपणात स्वतःशी होणारा संवाद आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. त्यामुळे व्यक्ती मानसिक पातळीवर लढण्याची क्षमता हरवून बसते. त्याचा परिणाम शरीराच्या कार्यावर होतो. येथे महत्त्वाचे असते ते म्हणजे, आपल्याकडे काय नाही त्यापेक्षा काय आहे, याकडे लक्ष देणे. सकारात्मक दृष्टिकोनाने मानसिक पातळीवर विजय मिळवल्यास शारीरिक पातळीवर डॉक्टरांनी केलेल्या उपचार पद्धतीची परिणामकारकता वाढते आणि आपण लढा जिंकतो. { संपर्क : ९४२३५५३९९८