आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Purpose Of Education In A Free Country Is To Make Man | Article By Haravansh

दृष्टिकोन:माणूस घडवणे हाच स्वतंत्र देशातील शिक्षणाचा उद्देश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष (१५ ऑगस्ट) पूर्ण झाले. आता अमृत काळ आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधींनी एका महान आणि वेगळ्या भारताची कल्पना केली होती. त्यांचा एक निकष म्हणजे साधन आणि साध्य यांच्यातील एकता. स्वतंत्र होणे व नैतिक मूल्यांसह महान भारताची पुनर्स्थापना हे ध्येय होते. स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांनी ते अंगी बाणवले होते. ते समजून घेण्याचे अनेक मार्ग आहेत.

अनेक वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले महामहोपाध्याय मालवीय यांनी स्वतः अडचणीत शिक्षण घेतले, मात्र त्यांनी शिक्षणाच्या प्रकाशाने जग उजळून टाकले. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (बीएचयू) (१९१६) च्या स्थापनेच्या वेळी ते म्हणाले, स्वतंत्र देशात शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ टेक्नोक्रॅट-नोकरशहा निर्माण करणे नाही, तर मानवाला चारित्र्य, सचोटी आणि मूल्ये विकसित करणे हे आहे. मूल्यांशिवाय शिक्षण निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पण त्यांचा जीवन संदेश आज समाजाच्या लक्षात आहे का? मालवीयजी बीएचयूमध्येच राहत होते. त्यांच्या घरात दोन स्वयंपाकघरे होती. एकात कुटुंबीयांसाठी स्वयंपाक होत असे आणि दुसऱ्यामध्ये मालवीयजी व त्यांच्या पाहुण्यांसाठी. दोन्हींच्या खर्चाची व्यवस्था वेगळी होती. घरातील माणसे कष्टाने जे कमावत, त्यातून घरचे स्वयंपाकघर चालायचे. एकेदिवशी मालवीयजींच्या नातवाला सकाळी परीक्षेसाठी जायचे होते. घरच्या स्वयंपाकघरात नाष्टा तयार नव्हता. स्वयंपाक्याने त्यांना विचारले, मी तुमच्या स्वयंपाकघरातून नातवाला नाष्टा देऊ का? मालवीयजींनी नकार दिला. ते म्हणाले, माझ्या स्वयंपाकघरात दानातून अन्न येते. तुम्ही (घरची माणसे) देश किंवा समाजाच्या सेवेत नाही. म्हणून दानाचे (मोफत) रेशन तुमच्यासाठी निषिद्ध आहे. नातू नाष्टा न करता परीक्षेला गेला.

म्हणजे नैसर्गिक अर्थाने जो आपल्या पुरुषार्थाने, कष्टाने व घामाने कमावतो, त्यावरच त्याचा अधिकार असतो. हे नैतिक जीवन स्वातंत्र्याच्या वीरांचे स्वप्न होते. जीवनात उदात्त मूल्ये शोधण्याचे ध्येय (साध्य) चुकीच्या मार्गांचा अवलंब करून कधीच साध्य होत नाही. यासंदर्भात महाभारताचा एक प्रसंग आहे. भीष्म पितामह शरशय्येवर आहेत. ते रोज संध्याकाळी प्रवचन करतात. सगळे ऐकायला जातात, पण द्रौपदी जात नाही. एकेदिवशी कृष्ण द्रौपदीला म्हणाला, आज तूसुद्धा ये. ती अनिच्छेने गेली. त्या दिवशी पितामह सांगत होते, जिथे अन्याय, अत्याचार होत असेल तिथे लोक मूक प्रेक्षक झाले तर त्यांचे शौर्य, पुरुषत्व, व्यक्तिमत्त्व बोथट होते. अचानक द्रौपदी म्हणाली, “पितामह, परवानगी असेल तर काही विचारू?” द्रौपदी म्हणाली, पितामह, आज तुम्ही नीती-अनीती, पौरुष-पुरुषार्थ यांचा अर्थ सांगत आहात, पण माझे वस्त्रहरण झाले तेव्हा तुम्ही गप्प का राहिलात? पितामह म्हणाले, मुली, तू योग्य विचारलेस. याचे कारण मी आज समजू शकतो. मी शरशय्येवर आहे. माझ्या रक्तात आता कुणाच्या अन्नाचा प्रवाह नाही. अधर्मातून कमावलेले दुर्योधनाचे अन्न खात होतो. त्या अन्नापासून तयार झालेल्या रक्ताने माझे विचार, माझी विचार करण्याची पद्धत प्रदूषित केली होती.

महाभारतातील ‘अनुशासन पर्वा’त भीष्म युधिष्ठिराला संपत्ती, तपस्या, धर्म आणि दान याबद्दल सांगतात- ‘अधर्ममूलैर्हि धनैस्तैर्न धर्मोऽथ कश्चन।’ (चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या संपत्तीने केलेला धर्म फळ देत नाही.) यासंदर्भातच भीष्म इशारा देतात- ‘न वृथा साधयेद् धनम्।’ (व्यर्थ पैसे साठवू नका.) घाम गाळून केलेली कमाई किंवा शुद्ध व नैतिक मार्गाने मिळवलेली संपत्तीच माणसाच्या किंवा समाजाच्या हिताची असते. उपनिषदांच्या बाबतीतही असेच आहे. गांधीजींच्या साधनशुचितेचा हाच गाभा होता. मूल्यवान, सुसंस्कृत देश, व्यक्ती किंवा समाज चुकीच्या मार्गांचा (अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार) अवलंब करून महान मूल्ये (साध्य) प्राप्त करू शकत नाही. पूर्वी खेड्यापाड्यातील अशिक्षित समाज चुकीच्या पद्धतीने मिळणाऱ्या उत्पन्नाकडे द्वेषाने पाहत असे. कुटुंबीय या गोष्टींविरोधात आवाज उठवत असत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात मूल्ये, साधनशुचिता आणि महान उद्दिष्टे यांच्या कसोटीवर समाज कुठे उभा आहे? पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचाराच्या द्वेषाचा पुनरुच्चार केला आहे. तो घरोघरी घुमला पाहिजे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

हरिवंश राज्यसभेचे उपसभापती rsharivansh@gmail.com

बातम्या आणखी आहेत...