आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:खरी दिवाळी अद्याप बाकी आहे..!

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बघता बघता दिवाळी संपली. आकाशदिव्यांनी, फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर उजळला. शुभेच्छा, भेटीगाठींनी जुन्या आठवणींना पालवी फुटली, दुरावलेली नाती पुन्हा बहरली. थोडा खोडकर रुसवाफुगवाही झाला. सगळे क्षण एका क्लिकमध्ये छान सजले. प्रत्येकाला स्वअस्तित्वाची जाणीव झाली. गोडधोड खाऊन वजन वाढलं का, याची चिंता पण लागून राहिली. कुणी माहेरी जाण्यासाठी आतुर होती तर कुणाचं माहेर दुरावलं होतं, तर कुणाचं कोरोनात उद्ध्वस्त झालेलं माहेर अश्रूंमध्ये न्हाऊन गेलं होतं. आप्तेष्टांच्या देहाला दिलेला अग्नी डोळ्यामध्ये धगधगत राहिला. कुणाच्या घरी मेजवानीचा अास्वाद तर कुणाच्या घरी दिव्याला वात मिळाली नाही. रानावनात पावसाने थैमान घातले. गुडघाभर पाण्यात वाया गेलेल्या पिकाचं करायचं काय, या विचारात शेतकऱ्याची रात्र सरली. लेकरांच्या कपड्यासाठीचा हट्ट पुरवायचा कसा? हाताशी आलेलं पीक गेल्यानंतर उरल्यासुरल्यात दिवाळी साजरी करणं शक्यच नव्हतं तरी वर्षाच्या मोठ्या सणाला नाट लावायचा नाही म्हणत उसनवारी करून दिव्याची वात पेटवणारा शेतकरी कसा विसराळी पडू द्यायचा आपण? एकीकडे पोटचा गोळा ज्याला लहानाचं मोठं केलं, तो आजच्या शुभदिनी तरी भेटायला येईल का? या आशेने गेटकडे पाणावलेले डोळे लावून सतत वाट पाहणाऱ्या त्या वृद्धाश्रमातल्या आईबापाला दिवाळी कशी झाली म्हणून कसं विचारायचं आपण? तिथे वाटल्या गेलेल्या मिठाईची गोडी त्यांच्या जिभेला आवडली असेल तरी का? त्याला आपलेपणाची सर येते का? अनाथाश्रमात मोठं होणारं बालपण दिवाळीचा आनंद कसा घेत असेल? कल्पना केली की आतडी पिळवटून जावीत इतक्या वेदना आहेत त्या, हे भीषण चित्र कटुसत्य नव्हे काय? ही वास्तविकता हेच सिद्ध करते की प्रत्येकाची दिवाळी वेगळी आहे. प्रत्येकाच्या नशिबी हा सगळा आनंद मिळेलच असं नाही. पण आपल्या आनंदात इतरांना सामावून घेता येणं, इतरांच्या वेदना आपल्या नजरेनी वेचता येणं, कुणाच्या तरी मनात आशेची पणती पेटवता येणं, एखाद्याच्या अश्रूंचा अर्थ समजून घेता येणं, कुणाला आपलंसं करून गच्च मिठी मारणं आणि कायम सोबत देणं म्हणजे दिवाळी नव्हे का? झगमगाटी जगण्याला बळी न पडता छान, सरळ, सुंदर आयुष्य जगता येणं म्हणजे खरी दिवाळी नव्हे काय? पण हे तत्त्वज्ञान किती जणांना कळलं आहे, कळणार आहे की पटणार आहे? नाहीच कळलं तर मग आयुष्याची हीच दिवाळी अद्याप बाकी आहे हे कुणाला उमजलंच नाही, असं म्हणावं का?

प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा संपर्क : 9970948873

बातम्या आणखी आहेत...