आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:महिलांच्या मानसिक आरोग्याचे वास्तव

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या मते स्त्री व पुरुष यांच्या मानसिक अनारोग्य व मनोविकार यांच्या पॅटर्नमध्ये फरक असतो. हा फरक बहुतांशी त्यांच्या जैविक, मानसिक व सामाजिक फरकाशी संबंधित असू शकतो. उदा. स्त्रियांना मासिक पाळी येणे, गर्भधारणा, प्रसूती व रजोनिवृत्ती अशा वेळी हार्मोन्स बदलांना सामोरे जावे लागते. तितके पुरुषांना जावे लागत नाही. स्त्री व पुरुषांच्या आयुष्यातील विविध तणाव, नातेसंबंधांंकडे बघण्याचा दृष्टीकोन, संवादाची, भावना व्यक्त करण्याची पद्धत यात फरक असतो. त्याचप्रमाणे स्त्री व पुरुष यांच्या सामाजिक, आर्थिक स्थानातील फरक स्त्री मानसिक आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वामुळे स्त्रियांवर असणारे मल्टी टास्किंगचे ओझे, कष्टाच्या तुलनेने कमी मिळकत, गरिबी, शिक्षण व कमाईच्या साधनांची कमतरता, निर्णय स्वातंत्राचा संकोच व विविध कौटुंबिक, सामाजिक भूमिकांचे संस्कृतीने दिलेले व स्त्रियांनी घेतलेले दडपण, देशोदेशी वा प्रांतोप्रांती करावे लागणारे स्थलांतर, युद्धातील हिंसाचार या सामजिक बाबीसुद्धा स्त्री मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात, असं जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. नवऱ्याचे व्यसन, घरगुती व लैंगिक हिंसा, वैधव्य, घटस्फोट, अपुरा कौटुंबिक आधार या गोष्टी स्त्रियांच्या नैराश्य विकारात हार्मोन बदलांव्यतिरिक्त स्वतंत्ररीत्या जबाबदार असतात, परंतु या फरकामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी दर्जाच्या असतात किंवा त्या उलटही सिद्ध होत नाही. मानसिक आरोग्याबद्दल समजून घेताना आपण मानसिक स्वास्थ्य, मानसिक समस्या आणि मानसिक आजार या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मानसिक स्वास्थ्याच्या नव्या व्यापक व्याख्येतील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये, (१) व्यक्तीला प्रसंगानुरूप भावना व्यक्त करता येणे. (२) स्वतःच्या व इतरांच्या भावना समजणे, गरजेनुसार सुधारणे याचे मूलभूत आकलन व सामाजिक क्षमता असणे. (३) इतरांविषयी सहसंवेदना असणे. (४) आयुष्यातील ताणतणावांना तोंड देण्याचे आकलन, अडचणी सोडवण्याची क्षमता व लवचिकता असणे. (५) शरीर व मनामधे सुसंवाद असणे आणि या सर्वांमुळे आयुष्यातील वेगवेगळया टप्प्यांवर आंतरिक समतोल साधला जाणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य! मानसिक समस्या म्हणजे जगातील कोणत्याही व्यक्तीला दैनंदिन जीवनात येणाऱ्या ताणतणावाला वास्तववादी व उपयुक्त पद्धतीने तोंड देता न आल्याने येणाऱ्या समस्या. यात चिंता, नैराश्य, संताप, अपराधीभाव, दुखावले जाणे अनेक नकारात्मक भावना व त्यानुसार केले जाणारे घातक वर्तन उदा. कुढत राहणे, स्वतःला समाजापासून तोडून घेणे, हिंसक वर्तन, अमली पदार्थांचे सेवन करणे इ. गोष्टी असतात. या समस्या प्रासंगिक वा वारंवार असू शकतात व त्याने व्यक्तीच्या दैनंदिन वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सौम्य अडचणी येतात. मानसिक आजारांमध्ये व्यक्तीच्या संवेदना, विचार, भावना, वर्तन यामध्ये बिघाड होतात ज्यामुळे व्यक्तीचे दैनंदिन, वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात मध्यम ते तीव्र प्रमाणात अडचणी येतात. उदा. चिंता व नैराश्य विकार, स्किझोफ्रेनिया, भ्रम-भासविकार, व्यसनाधीनता. जीवनात अपरिहार्य असणाऱ्या काही एखाद्या अनुचित प्रसंगांत चिंता, संताप, निराशा इ. नकारात्मक भावना अनुभवणे हे अजिबात अयोग्य नाही; परंतु त्या भावनांची वारंवारता, तीव्रता व कालावधी प्रमाणापेक्षा जास्त असेल व त्यांचा आपल्या दैनंदिन कामकाजावर, इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधांवर, आरोग्यावर विपरित परिणाम होत असेल तर मात्र आपल्याला या भावनांचे व्यवस्थापन करणे गरजेचे होते. नाहीतर मग मानसिक समस्या या मानसिक आजारांमध्ये बदलू शकतात. एवढ्या प्रस्तावनेनंतर आपण स्त्री मानसिक आरोग्याचा लेखाजोखा समजून घेऊ या.

मानसिक स्वास्थ्य व मानसिक आजार यामध्ये स्त्री-पुरुषांमधील वेगळेपण हा खूप कळीचा मुद्दा आहे. चिंता व नैराश्य विकार, मनो शारिरीक विकार (त्रास शारिरीक पण त्याचे कारण मानसिक अस्वास्थ्यामध्ये), खोलवर आघातानंतरचे ताणाचे विकार, या नेहमी आढळणाऱ्या मनोविकारांचे (Common Mental Disorders) प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जवळजवळ दोन ते तीन पटीने जास्त असते. स्मृतिभ्रंश व अन्नसेवनविषयक मनोविकारांचे (Eating disorders) प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. तर व्यसनाधीनता, अमली पदार्थांमुळे होणारे मनोविकार, समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकार हे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड, डिसऑर्डर (उन्माद व नैराश्य या दोन टोकांमध्ये असणारी मनोवस्था) या गंभीर मनोविकारांत स्त्री-पुरुष असा फरक फारसा दिसत नाही. भारतात दरवर्षी आत्महत्येने होणाऱ्या सुमारे दोन लाख मृत्यूंपैकी सुमारे ७०% मृत्यू पुरुषांचे व ३०% स्त्रियांचे असतात. वरील मनोविकार हे मेंदूतील रासायनिक बदलांमुळे होतात. त्यामध्ये वर उल्लेखलेले जैविक, मानसिक व सामाजिक घटक कार्यरत असतात मनोविकार म्हणजे त्या व्यक्तीचा दुबळेपणा, आडमुठेपणा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतातील मानसिक आरोग्याची अवस्था बिकट आहे. त्यात कोरोना जगाबरोबर भारतात पण मानसिक अनारोग्याचा सुनामी घेऊन आलाय. कोरोना महासाथीतील अनिश्चितता व आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक हानीने भारतीय स्त्रियांचे आयुष्य ढवळून काढले आहे. सुमारे ४२% भारतीय स्त्रियांनी लॉकडाऊनमध्ये त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवल्याचे नमूद केले आहे. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातील नोंदी धक्कादायक आहेत. २०१९ या कोरोनापूर्व काळापेक्षा २०२० मध्ये स्त्रियांच्या नैराश्य विकारात ३८%, दमछाक होण्यात ( Burn out) ७३% तर चिंतेत ४४% वाढ झाली होती! ‘लॅन्सेट’ या विख्यात मेडिकल जर्नलमधील २०१९ मधील एका अहवालानुसार महाराष्ट्र, प बंगाल, हिमाचल प्रदेश व दक्षिण भारतातील राज्यांमध्ये इतर राज्यांपेक्षा मानसिक आरोग्याचे ओझे जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. या देशाला १३,५०० मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर्स (सायकिएट्रिस्टस) आणि २०२५० मानसतज्ज्ञांची आवश्यक असताना अवघे ३८०० सायकिएट्रिस्टस् व ९०० सायकॉलॉजिस्टस् उपलब्ध आहेत! मानसिक अनारोग्याचा हिमालयाएवढा प्रश्न व त्यासाठीची ही अशी अत्यंत व्यस्त प्रमाणातील आरोग्यसेवा यातील दरी भरून काढण्याचे शिवधनुष्य उचलणे अतिशय गरजेचे आहे. याबरोबरच मानसिक अनारोग्य आणि मनोविकार याबाबत खुद्द त्या व्यक्तीच्या व समाजाच्या मनात असणारा कलंक आणि भेदभाव यामुळे मानसिक समस्या आणि मनोविकार यासाठी वेळीच मदत घेणे, उपचारात सातत्य ठेवणे, स्किझोफ्रेनीया, व्यसनाधीनतासारख्या गंभीर मनोविकारांसाठी अत्यंत आवश्यक असलेले पुनर्वसन उपचार घेणे, मनोविकार बरे झालेल्या/ नियंत्रित असलेल्या व्यक्तींना समाजातील मुख्य प्रवाहात सामावून घेणे या सर्वातच कमालीच्या अडचणी येतात. यात अजूनच वाईट गोष्ट ही की, स्त्रियांना या उपाचारांपर्यंत पोहोचण्यात त्यांच्या आजाराबद्दलच्या कलंक व भेदभावाइतकेच त्यांच्या कनिष्ठ सामाजिक, आर्थिक स्थानामुळे अडथळा असतो. याचा परिणाम म्हणून मानसिक अनारोग्य व विकारांचे समाजावरील ओझे अजूनच वाढत जाण्याचे दुष्टचक्र निर्माण होते. चिंता, नैराश्य, अपराधीभाव- यासारख्या मानसिक समस्या सौम्य प्रमाणात असतील तर त्या बऱ्याच वेळा स्वतःच्या, आपल्या विश्वासू व्यक्तीच्या अथवा आपल्या फॅमिली डॉक्टरच्या मदतीने सुटू शकतात, परंतु या समस्या आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत असतील तर प्रशिक्षित समुपदेशकाची अथवा मनोविकारतज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. नैराश्यविकार, चिंताविकार भ्रमविकार, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता, बायपोलर मूड डिसऑर्डर सारख्या मानसिक आजारांना प्रथम मनोविकारतज्ज्ञांच्या औषधांची गरज असते. मनोविकारांवर अतिशय उत्तम औषधे उपलब्ध असतात. मनोविकारांचे उपचार सुरू करण्यात जेवढा उशीर होतो तेवढे ते आजार जुनाट व औषधांना दाद न देणारे होतात. बहुतांश मनोविकारांत औषधांबरोबर मानसोपचार आणि मनोसामाजिक पुनर्वसन उपचार उपयुक्त ठरतात. कोणत्याही आजारांसारखेच मानसिक समस्या आणि मनोविकार यांचा यशस्वी सामना करण्यासाठी पुढे उल्लेखलेल्या काही गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये, निरोगी जीवनशैलीचा अंगीकार. अमली पदार्थांचे सेवन बंद करणे. नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी संवाद साधणे. ज्या गोष्टींनी आनंद वाटतो ती गोष्ट दिवसातून किमान एकदा तरी अर्धा तास करणे. नकारात्मक भावना वेळीच ओळखून त्यांचे समायोजन करणे. स्वतः केलेल्या उपायांनी बरे वाटत नसेल तर सायकॉलोजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टना भेटण्यात संकोच न करणे. आयुष्याबद्दल कृतज्ञ राहणे. पैसा व वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे. मानसिक आरोग्याबद्दल शास्त्रीय माहिती घेणे. मानसिक आजारांबाबत स्व मदत गट/ सपोर्ट ग्रुपशी जोडून घेणे.

मानसिक आरोग्य ही चैन नाही; ती गरज आहे! कोणताही समाज मानसिक आरोग्याच्या उपचारासाठी एक डॉलर खर्च करतो तेव्हा तो पाच डॉलर्स मिळवतो; पण जेव्हा मानसिक अनारोग्य प्रतिबंधासाठी एक डॉलर खर्च करतो तेव्हा तो पस्तीस डॉलर्स मिळवतो! म्हणूनच prevention is better than cure! एकूणच समाजात मानसिक आरोग्याचे महत्त्व समजून त्या दिशेने आपण एकेक पाऊल पुढे जात राहिलो तर या लेखाचा उद्देश सफल होईल!

डॉ. वैशाली चव्हाण संपर्क : 9823986280

बातम्या आणखी आहेत...