आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीमंत लोक न्यूयॉर्कमधून निघून जात आहेत, परंतु शहरातील स्थानिक उच्चभ्रू लोक थोडेसे आत्मसंतुष्ट आहेत. त्यांना वाटते की, मॅनहॅटन अजूनही सांस्कृतिक जगाचे केंद्र आहे आणि नेहमीच असेल, त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. खरे तर - नुकतेच एका प्रोफेसरने मला एका चर्चेत सांगितले होते - न्यूयॉर्कचे धनकुबेर मियामीला कूच करत असतील तर यामुळे न्यूयॉर्कला काहीही फरक पडत नाही, उलट ते त्यांच्यासाठी चांगले आहे. पण, जगातील सर्वात मोठे शहर असले तरीही आत्मसंतुष्टता कोणासाठीही चांगली नाही. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत. महामारीने हे दाखवून दिले आहे की, रिमोट-ऑफिसचे काम पूर्णवेळ करता येते, त्यामुळे आपली जागा बदलणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. याला क्रॅक-मिरर-इफेक्ट म्हटले जात आहे. म्हणजेच, न्यूयॉर्कमधील उणिवा - उदा. उच्च कर दर, वाढती गुन्हेगारी, भांडवलदारांप्रती वाढती दुर्बुद्धी इ. - यामुळे मियामीकडे उड्डाणे होत आहेत, कारण मियामीला कराचा फारसा त्रास नाही आणि तिथले लोक तुमचे खुलेपणाने स्वागत करण्यासही तयार आहेत. असाच परिणाम मॉस्कोमध्येही दिसून येतो, तेथे युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर क्रेमलिनचा दबदबा आणि तीव्र जागतिक प्रतिक्रिया यामुळे श्रीमंत रशियन लोकांचे निर्गमन सुरू आहे. ते दुबईसारख्या ठिकाणांना प्राधान्य देत आहेत, तिथे ते अधिक आरामात राहू शकतात. त्याच वेळी बीजिंगमधील नियामक संस्थांच्या वाढत्या दबावाला कंटाळून तेथील उद्योगपतींनी आता सिंगापूरमध्ये तळ ठोकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये १२ टक्के, हाँगकाँगमध्ये १४ टक्के आणि मॉस्कोमध्ये १५ टक्के श्रीमंतांची लोकसंख्या घटली होती. हे सर्व श्रीमंत दुबई, सिंगापूर, मियामी या शहरांच्या दिशेने जात आहेत. या तिन्ही शहरांनी भांडवलदारांच्या मार्गात गालिचे अंथरले आहेत आणि त्यांना आपल्या स्वार्थासाठी धनदांडग्यांच्या निर्गमनाचा फायदा घ्यायचा आहे. ही जागतिक शहरे लक्षाधीशांना आकर्षित करण्यात आघाडीवर आहेत. यासह ते तीन लक्झरी प्रॉपर्टी मार्केटपैकी एक झाले आहेत, जिथे किमती यावर्षी सर्वात जलद दराने वाढण्याची अपेक्षा आहे. या शहरांच्या माझ्या नुकत्याच भेटीदरम्यान मला आढळले की, ते लोकांसाठी चुंबक ठरत आहेत. तेथील हवामान अनुकूल आहे, जीवनशैली आरामदायी आहे आणि तेथील सरकारे नीटनेटकी आहेत. नवीन रेस्टॉरंट्स व आलिशान मॉल्स सुरू झाल्याने आणि कला महोत्सवांचे आयोजन वाढत असल्याने श्रीमंतांचा ओघ वाढत आहे. सिंगापूर हे तिन्हींपैकी सर्वाधिक प्रस्थापित आहे. येथील करोडपतींची संख्या अडीच लाख आहे, ती दुबई आणि मियामीपेक्षा जास्त आहे. येथे तुम्हाला एक ऊर्जा जाणवू शकते. अलीकडे सिंगापूरने कौटुंबिक संपत्ती व्यवस्थापन संस्थांचे स्वागत करण्यासाठी एक एजन्सी उघडली आहे. आवक एवढी वाढली आहे की, सिंगापूरने आता टॅक्स-इन्सेंटिव्हसाठी कोणाला पात्र मानायचे आणि कोणाला नाही, याबद्दल अत्यंत सावध झाले आहे. ५०० दशलक्ष डाॅलर हे नवीन १०० दशलक्ष डाॅलर आहेत, असा सध्या एक विनोद आहे. वेलकम इन सिंगापूरसाठी आता तेवढ्याच रकमेची गरज आहे. हे शहर साधारणपणे साधे आहे, पण नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान त्यात दाखवलेली संपत्ती पाहून मी थक्क झालो. मी एका घराबाहेर आठ लाल फेरारी पार्क केलेल्या पाहिल्या. दुबईने आता गोल्डन व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे, याच्या मदतीने श्रीमंत लोक मालमत्ता खरेदी करू शकतात आणि तेथे राहू शकतात. यामुळे केवळ रशियातूनच नव्हे, तर दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतूनही स्थलांतरितांचा ओघ आहे. रिअल इस्टेटची तेजी जोमात आहे आणि सर्व खरेदी कोट्यवधीत केली जात आहे. ८० टक्के व्यवहार रोखीने होत असल्याने प्रॉपर्टी मार्केट स्थिर आहे. दुबई उच्च-संस्कृती तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला खूप महत्त्व देते. नवीन अटलांटिस द रॉयल हॉटेलच्या वैभवावर एक नजर टाका. यात ८०० खोल्या आणि १७ रेस्टॉरंट्स आहेत, यापैकी बहुतांश जगप्रसिद्ध शेफ चालवतात. न्यूयॉर्कपेक्षा आज तुम्हाला तिथे उत्तम जेवण मिळण्याची शक्यता जास्त आहे. मियामी हे एकेकाळी सनबाथर्सचे ठिकाण मानले जात असे. पण, आता कर टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीमंतांना तिथे ओढले जात आहे. भरभराट होत असलेल्या फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये नवीन सौदे केले जात आहेत आणि वालुकामय किनारे फिरल्यानंतर नवीन लक्झरी शॉपिंग नेबरहूडमध्ये खरेदी केली जात आहे. अमेरिकेत यासारखी दुसरी बाजारपेठ नाही. वेगळ्या शब्दांत, भांडवलशाही शहरे निःसंकोचपणे एकमेकांचा शोध घेत आहेत. मियामी-दुबई फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासच्या जागा भरल्या आहेत. मॅनहॅटनाइट्स गर्विष्ठपणा दाखवू शकतात आणि म्हणू शकतात की, या श्रीमंत लोकांच्या जाण्याने त्यांना काही फरक पडत नाही, उलट ते चांगल्यासाठी घडले आहे, परंतु हे निर्गमन त्यांच्यासाठी चांगले लक्षण नाही. अनेक वर्षांपासून तिथली लोकसंख्या फ्लोरिडाकडे जात आहे, जिथे अर्थव्यवस्था न्यूयॉर्कच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. तर तेथील सरकार न्यूयॉर्कच्या तुलनेत निम्माही खर्च करत नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर बेस्टसेलिंग रायटर ruchir13@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.