आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:पर्यावरण संरक्षणात खारीचा वाटा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ पल्या दैनंदिन वापरातल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कॉफीचे कप,पेपर नॅपकिन्स, प्लास्टिकच्या पाऊच मधले खाद्यपदार्थच्या रिकाम्या पिशव्या...यासारख्या अनेक गोष्टी आपण सर्वजण पर्यावरणाचे गुन्हेगार आहोत हे दर्शवणाऱ्या आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण निसर्गाची हानी करतोय. आपल्या सवयींमध्ये काही बदल करून पर्यावरण संरक्षणात खारीचा वाटा उचलू शकतो.

प्लास्टिक
गेल्या काही दशकांपासून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर खूप वाढलाय. प्लास्टिक मातीत एकरूप होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. प्लॅस्टिकला ‘डिस्पोझेबल’ म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांची पूर्ण विल्हेवाट शक्य नसते. ते ‘सिंगल यूज’ म्हणजेच एकदाच वापरण्याचे असतात. प्लास्टिकचे डबे, चमचे, ग्लास, बाटल्या आदी सर्वत्र सहज उपलब्ध होतात. प्रवासाला जाताना घरातून पाण्याची बाटली घेऊन जाण्याऐवजी प्रत्येकवेळी प्रवासात नवीन प्लास्टिक बाटली खरेदी केली जाते. जगभरात दर मिनिटाला दहा लाख प्लाटिस्कच्या बाटल्या विकत घेतल्या जातात. म्हणजेच एका दिवसात १.५ अब्ज प्लास्टिक बाटल्यांचा वापर होतो. प्लास्टिकच्या बाटलीचे विघटन होण्यासाठी ४५० ते १००० वर्षे लागू शकतात. तसेच जगभरात दरवर्षी ५०० अब्ज प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. म्हणजेच दर मिनिटाला दहा लाखांपेक्षा अधिक प्लास्टिक बॅग वापरल्या जातात. या पिशव्या कचरा होऊन माती दूषित करतात,प्राणी आणि पक्ष्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. प्रतिव्यक्ती दररोज ३ पिशव्यांचा जरी वापर करत असतील तर वर्षाचे एक हजारपेक्षा जास्त होतात. प्रत्येकाने या पिशव्या वापरणे नाकारले तर पर्यावरण रक्षणात योगदान मिळेल.

प्लास्टिक कसे टाळाल? खरेदीसाठी कापडी पिशवी सोबत ठेवा. आजकाल प्रत्येक खाद्यपदार्थ जाड प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केला जातो. या मोठ्या जाड प्लास्टिकच्या पिशव्या टाळण्यासाठी, धान्य इत्यादींसाठी वेगवेगळ्या आकाराच्या सुती कापडाच्या पिशव्या सोबत ठेवा. प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या वस्तु विकत घेणे टाळा. त्यावर पर्याय शोधा.

टिश्यू पेपर :
टेबल साफ करणे, हात पुसणे यासाठी टिश्यू वापरला जातो. जगातील बहुतेक देश टॉयलेटमध्ये टिश्यू पेपर वापरतात. हॉटेलात हात पुसण्याच्या निमित्ताने ३-४ टिश्यू वापरणे ही सामान्य बाब झालीय. जो टिश्यू पेपर खूप जास्त मऊ असतो त्यात झाडाची साल मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. पुनर्वापर (रिसायकल) केलेला कागद जास्त जाड असल्यामुळे तो लोकांना आवडत नाही. हात पुसण्यासाठी रुमाल आणि टेबल पुसण्यासाठी एखादे जुने कापड वापरून पर्यावरणासाठी हातभार लावू शकतो.

टिश्यू पेपर वापरण्यापूर्वी याचा विचार करा
जागतिक स्तरावर एक टन टिश्यू पेपर तयार करण्यासाठी दररोज सुमारे १७ झाडे तोडली जातात, ज्यामुळे ७५,००० लिटर पाणी दूषित होते. म्हणजेच २०-२५ वर्षांपासून पृथ्वीवर असलेली झाडे तोडली जातात आणि ते एखाद्या कारखान्यात घेऊन जाऊन त्याचे कागदाच्या तुकड्यात रूपांतर केले जाते, ज्याचा वापर ग्राहक फक्त पाच सेकंदच करत असतात. यासाठी किती झाडे आणि किती पाणी वाया गेले याचा हिशेब आपण करू शकता.

पेपर कप
घराबाहेर, प्रवासादरम्यानं, कार्यालयात चहा-कॉफी साठी पेपर कप वापरले जातात. या कपाच्या निर्मितीसाठी झाडांची आहुती दिली जाते. दररोज ४ कप म्हणजे दोन वर्षांत एका झाडाचा बळी

-कार्यालयातील कर्मचारी दिवसातून किमान तीन ते चार कप वापरतात. महिन्यातील २६ दिवसांत चारच्या हिशेबाने १०४ कप होतात. म्हणजेच एका वर्षात १२४८, दोन वर्षांत २४९६ कप वापरले जातात. २४६१ कप तयार करण्यासाठी एका झाडाला आपला जीव गमवावा लागतो. यानुसार दर दोन वर्षांनी रोज चार कप वापरणाऱ्यांमुळे पृथ्वीवर एक झाड कमी होते. भारतात दररोज १ कोटी पेपर कप वापरले जातात. जागतिक स्तरावर दरवर्षी किमान ५८ अब्ज पेपर कप वापरले जातात.

कॉफी किंवा चहा गरम ठेवण्यासाठी किंवा थंड पेये थंड ठेवण्यासाठी कपाच्या आतील थर पॉलिथीनचा बनलेला असतो. त्यामुळे हे कप मातीत वितळत नाहीत. त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी अतिरिक्त पाणी आणि ऊर्जेचा वापर करावा लागतो.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...