आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातलं काही:आनंदाच्या बीजाला हवी रुजव्याची माती...

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सु खाच्या आणि आनंदाच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष असतात. कुणाचा आनंद कसा, तो कशात मोजावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. आनंदाची व्याख्या करताना बहुतांश वेळा गफलत होते ती आनंद, सुख आणि समाधान यात. सुख अनेकदा भौतिक / अभौतिक बाबींशी निगडित असतं. ते तुम्हाला लावून घेता आलं तर मिळतो तो आनंद. या आनंदात न मिळालेल्या, न जगलेल्या, राहून गेलेल्या, वजा झालेल्या क्षणांची आठवण येऊनही त्याची खंत न करता तो उपभोगता आला, त्यात कुठलाही गिल्ट नसला तर गाठीशी मिळतं ते समाधान. मला भौतिक सुखातून मिळणारा आनंद कमअस्सल असतो, असं कधीही वाटत नाही. कारण तो मिळवता येतो आणि वाटता देखील येतो. हातात, समोर आलेल्या सुखाची तुलना गतकाळातील सुखाशी करण्याचं प्रयोजन मला कळत नाही. आपण ज्या वयात एकेक सुख किंवा आनंद उपभोगलेला असतो तेव्हाचा आपला बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक परीघ वेगळा असतो. पुढे अनुभवसंपन्न होत जाताना आपली जीवनदृष्टी बदलते आणि तो परीघ देखील. या परिघानुसार सुखाच्या कल्पना बदलणं मला गैर वाटत नाही. कदाचित नॉस्टॅल्जिक होण्यासारखं बालपण वाटेला न आल्यानेही असेल, पण मला कुणाच्या बोलण्यात बालपणीच्या सुखाचे वारंवार संदर्भ आले की रिलेट करता येत नाही (ही माझ्या आकलनाची मर्यादा असू शकेल, पण त्या व्यक्तीविषयी जराही हेवा वाटत नाही) आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून असता कामा नये, हेही वाक्य फार फसवं वाटतं. स्पर्श, गंध, रस, रंग याच्या आठवणी एकट्या येतात का कधी? त्यावेळी मिळालेला आनंद काय फक्त त्या वस्तूचा, चवीचा, रंगाचा, स्पर्शाचा असतो? त्या क्षणात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीत मनाचा तळ ढवळून टाकण्याची ताकद असते. तरीही माणसं आयुष्यातून वजा होत जातात, क्षण निसटून जातात. त्यामुळे हा आनंद अत्तराच्या कुपीसारखा मनात घट्ट जपून ठेवावा, अधूनमधून त्यांचा सुगंध आयुष्यात दरवळू द्यावा. मात्र, फक्त यावरच तो अवलंबून असू नये, हेही नक्की. स्वतःसाठी आनंदाची राखीव बेटं असू द्यावीत हे उत्तम. असलेली सुखं बोचायला लागली की मग माणूस पुन्हा पुन्हा मागे फिरतो. ‘आहे मनोहर तरी मन गमते उदास’ अशी अवस्था सामान्य माणसाच्या आयुष्यात आली की, दुःखाचा हायवे खुला झालाच! त्यामुळे लहानपणी पन्नास पैशाची पेप्सी खाण्यातलं सुख मग बास्किन अँड रॉबिन्सच्या महागड्या आईस्क्रीमशेजारी बसून वाकुल्या दाखवतं. आता समोरचं सुख लावून घ्यावं, हे तारतम्य विसरून आपण त्या पन्नास पैशाच्या सुखाला कुरवाळत बसतो. मला होता येत नाही म्हणून नॉस्टॅल्जिक होणं वाईट, असं मी चुकूनही म्हणणार नाही. पण, त्याचा प्रवास होऊ द्यायचा की थांबा हे आपण आपलं ठरवावं. हॅपिनेस कोशंट काय मला माहीत नाही. आपलं सुख शोधताना दुसऱ्याचं सुख ओरबाडून घेऊ नये, त्यामागे दुसऱ्याला कधीही हे सुख न मिळो अशी भावना असू नये आणि जिथे दुःखाचा काळोख असेल तिथे गुपचूप, त्याही व्यक्तीला कळू नये इतक्या शांतपणे एक छोटीशी आनंदाची पणती लावता यायला हवी, इतकी माफक अपेक्षा आहे. वयानुसार आनंदही प्रगल्भ व्हावा. तो तसा असण्यातच शहाणपण आहे. न जगता आलेलं, गेलेलं आयुष्य भोगलेलं सुख आणि दुःख देखील याची एक किंचित कडक किनार त्याला असावी... रेशमी पैठणीला किंचित कडक जरतारी काठ असतो तशी. स्वतःत एकदा आनंदाचं बी रुजवून घेता आलं तर त्याला कुठली न कुठली जमीन स्वीकारतेच आणि आनंदाचं झाड बहरतं. ते बीज रुजवायचं की करपू द्यायचं हे मात्र ज्याच्या त्याच्या हातात. गौरी साळवेकर संपर्क : 744748892

बातम्या आणखी आहेत...