आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:एका भाभीची गोष्ट

प्रणव सखदेव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखाचं शीर्षक वाचल्यावर मनात ‘वेगळ्या’ प्रतिक्रिया उमटणाऱ्या, स्वत:च्या कामजीवनाबद्दल बढाया मारताना भाभी, आंटी हे विषय चवीने बोलणाऱ्या, या स्त्रीगटाबद्दल अचकटविचकट बोलून कमेंट्स करणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ‘भाभी’ची गोष्ट...

का मानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होतो. स्वयंपाक करायला आवडत असल्यामुळे मी रोज सकाळी लवकर उठून डब्यासाठी पोळी-भाजी वगैरे करायचो. सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रीणींना घरी बोलावून जेवू घालायचो. त्यामुळे स्वयंपाकघरात माझा वावर बराच असायचा. त्या फ्लॅटच्या स्वयंपाकघरातल्या ओट्याला लागून मध्यम आकाराची, चौकोनी खिडकी होती. त्या खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमधल्या एका फ्लॅटची स्लायडिंग विंडो असलेली मोठी खिडकी दिसायची. एरवी माझं कधी तिथे तितकं लक्ष गेलं नव्हतं, पण मी राहायला जाऊन २-३ आठवडे झाल्यानंतर, समोरच्या खिडकीतून रोज आपल्याकडे कुणीतरी पाहतंय हे माझ्या लक्षात आलं. सुरूवातीला मी दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्र तसं करता येईना. कारण समोर जी व्यक्ती होती ती मी कधी एकदा तिच्याकडे पाहतो याची वाट पहातच जणू खिडकीत उभी असायची. ती व्यक्ती एक बाई असल्याने काही दिवस तरी आपली खिडकी उघडायला नको, या फंदात पडायला नको असं मी ठरवलं. पण स्वयंपाक करताना तयार होणारी वाफ, फोडणीचा वास, धूर वगैरे खिडकीतून बाहेर जाणं गरजेचं होतं. त्यामुळे खिडकी उघडणं भाग होतं. एका रविवारी मी ती खिडकी उघडली, हळूच समोर पाहिलं आणि हुश्श केलं. तिथे कुणीही नव्हतं! पण थोडा वेळ गेला आणि पुन्हा तिथे ती बाई आलीच!

आता एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावूया, असं म्हणत मी समोर थेट पाहिलं. मूर्तिमंत देखणेपण ज्याला म्हणतात तशी ती होती. एखाद्या निष्णात, कल्पक शिल्पकाराच्या शिल्पासारखी. नीटस, सरळ नाक, गव्हाळ वर्ण, तरतरीत उंचपणा, बोलके डोळे, बदामाच्या आकाराची चेहरेपट्टी. कपाळापासून वर डोक्यांपर्यंत भांगेत लालजर्द कुंकू भरलेलं. डोक्यावरून पदर घेतलेला. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी – पस्तीस एक वर्षांची तरी असावी.

मी तिच्याकडे पाहताच, तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं. तिने खुणेनेच मला तुझ्याशी बोलायचंय असं सांगितलं. खाणाखुणा करत ती काहीतरी सांगू पाहत होती. सगळं काही मला समजलं नसलं, तरी तिला मला घरी भेटायला यायचं असावं, अशी अटकळ मी बांधली. मला भेटायला काही हरकत नव्हती, पण शेजारीपाजारी, तिच्या घरचे यांची मला भीती वाटली. कारण तिची वेशभूषा पाहता तिच्या घरचे कर्मठ असावेत असं वाटत होतं. म्हणून मी सरळ खिडकी बंद करून टाकली. तासभर झाला असेल-नसेल, दारावरची बेल वाजली. पाहतो तर समोरची ती बाई. मला काय बोलायचं हे सुचेना. ती म्हणाली, प्लीज, मला आत येऊ दे. फार महत्त्वाचं बोलायचंय, प्लीज.

मी सेफ्टी डोअर उघडून तिला आत घेतलं. आत आल्या आल्या तिने डोक्यावरचा पदर काढून टाकला. हॉलमधल्या खुर्चीत बसली. मी विचारलं, बोला. काय काम?

तिने हळूच तिच्या पदराआडून एक पुस्तक काढून माझ्यासमोर ठेवलं. ती म्हणाली, एका लेखात तुम्ही या पुस्तकाबद्दल लिहिलं होतंत ना, मी नेहमी तुमचे सगळे लेख वाचते, त्यात फोटो असतो ना तुमचा, त्यामुळे ओळखलं, मला लहानपणासून वाचायला आवडतं, पण काय सांगू, आमच्या समाजात वाचणं वगैरे चालत नाही, ये रद्दी असं म्हणत टर उडवली जाते, दुकान टाकायचं, धंदा करायचा, पैसा कमवायचा, आणि आम्ही बायड्यांनी पोरं काढायची, वाढवायची, त्यांनी पुन्हा धंदा करायचा असंच चालतं, मला शिकायचं होतं, वाचायचं होतं, पण लग्न करून दिलं नि पाठोपाठ मुलं झाली दोन, तरी मी चोरून वाचते, माझ्या मिस्टरांचा बांधकामाचा धंदाय, त्यांना पटवून पेपर लावून घेतलाय, आत्तापण घरचे सगळे देवाला गेलेत, दोन-तीन तास तरी येणार नाही म्हणून म्हटलं, तुम्हाला भेटू. तिने एका दमात सगळं सांगितलं. मी वर्तमानपत्रात पुस्तकांची परीक्षणं, लेख लिहायचो. त्याचा संदर्भ देऊन ती बोलत होती. मी ते पुस्तक हातात घेऊन विचारलं, तुम्ही हे पुस्तक कसं काय मिळवलं? माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं, ऑर्डर करायला, ती फार गोड हसली. अंधारात लख्खकन कवडसा पडावा तशी.

मी म्हटलं, वाचलं का हे पुस्तक तुम्ही? ती म्हणाली, मला तूच म्हण ना. जरा बरं वाटतं, आपल्यात फार अंतर नसेल. नि असलं तरी आमच्या घरी सारखा इतका मानपान पाहावा लागतो ना, कंटाळा येतो. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, मी वाचलं, पण मला जरा चर्चा करायचीय त्याबद्दल. म्हणूनच तर तुला भेटायला आले, नाय तर नसते आले. तू या पुस्तकाला फार चांगलं म्हटलेलं, पण मला काय चांगलं हे नीट समजलं नाही. ते समजून घ्यायला आले. खरं तर एवढी रिस्क नसती घेतली, पण समजून घ्यायची इच्छा शांत बसू देईना.

मी अचंबित झालो, तिच्या त्या कृतीने थक्क झालो आणि कौतुकाने मन भरूनही आलं. कुठला तरी एक लेख वाचून, त्यातलं एक पुस्तक तिने वाचलं होतं. एवढंच नाही, तर ते तिला नीट समजलं नाही, म्हणून ते समजावं, यासाठी धडपड करत चर्चा करायला ती आली होती. मी तिला मला त्या पुस्तकात काय आवडलं, हे सविस्तर सांगितलं. तिने ते ऐकून घेतलं, मध्येमध्ये प्रश्नही विचारले. त्यावरून तिने ते पुस्तक नीट वाचलं होतं हे समजत होतं. शेवटी ती म्हणाली, तू सांगतोएस ते इंटरप्रिटेशन चांगलंय, पण तरी तितकं काही हे पुस्तक मला चांगलं वाटत नाहीये! चल, निघते मी आता. पुन्हा एकदा मी चकित – तिच्या मतामुळे.

एका भेटीत मी तिला एक पुस्तक भेट दिलं. तेव्हा ती जरा गोंधळली. आधी म्हणाली नको, मग अचानक तिला काय वाटलं काय माहीत. म्हणाली, घेते मी. दोन-चार दिवस चांगले जातील माझे!

आणि त्यानंतर ती मला कधी दिसलीदेखील नाही. माझ्या स्वयंपाकघराच्या समोरची तिची खिडकी कायमस्वरूपी बंद करण्यात आली. मला फार वाईट वाटलं. एक छोटीशी खिडकी किलकिली होत, जरासा प्रकाश आत येऊ पाहत होता, तो बंद झाला होता. नंतर एकदा माझ्या फ्लॅटच्या मालकाने सांगितलं की, ती घर सोडून गेली ती गेली म्हणे. मग तो जे हसत म्हणाला, ते ऐकून मला त्याला दोन ठेवून द्याव्यात असं वाटलं. तो म्हणाला, गेली असेल पळून कुणाच्या तरी बरोबर... भाभीच ती! भाभी, तू हा लेख वाचशील अशी मला आशा आहे! संपर्क : ७६२०८८१४६३

बातम्या आणखी आहेत...