आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशकथा:एका चिवट झुंजीची गोष्ट...

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खरे तर कवेत मावेल एवढ्याच आभाळाची तिनं अपेक्षा केली होती. कारण तिला ठाऊक होतं अंथरूण पाहून पाय पसरावेत म्हणून. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या होतात आयुष्याच्या. ब्रेन ट्यूमरमुळे तिच्या न कळत्या वयातच आईचं छत्र तिने गमावलं. पण मोठ्या जिद्दीनं, ताकदीनं अवघ्या बाराव्या वर्षीच बापाचा संसार तोलून धरणारी ती आहे ज्योती चौधरी. मी त्या वेळी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. मला तिच्याविषयी फारशी माहिती नव्हती. पण एक मुलगी कॉलेजमध्ये शिकायला येते त्या वेळी तिची लहान बहीण तासिका संपेपर्यंत व्हरंड्यात खेळभांडी खेळते ही गोष्ट त्या विद्यार्थिनीची शिक्षणाबद्दलची भूक दर्शवणारी होती. विचारपूस केल्यानंतर ती ज्योती चौधरी आहे असे कळाले. धाकट्या भावंडांना सांभाळून ज्योती घरातलं सगळं काम करायच्या आणि अभ्यासही. खेळण्याच्या वयात त्यांनी संसार पेलला होता.

आई गेल्याच्या सहा महिन्यांतच एक दिवस बाप कुणालाच कल्पना न देता लग्न करून ज्योतीला सावत्र आई घेऊन आला. मात्र त्याही परिस्थितीत ज्योती यांनी नव्या आईचं मोठ्या मनानं स्वागत केलं. कालांतरानं नव्या आईला दिवस गेले. मात्र नव्या आईला सावत्र मुलं डोळ्यासमोर नको होती. धाकट्या भावंडांना सुखात ठेवायचं असेल तर ज्योतीने मरण पत्करावं असा पर्याय नव्या आईने ज्योतीसमोर ठेवला. भावंडांच्या सुखासाठी ज्योती मरण पत्करायलाही तयार झाली. आपल्या मरणाने आपल्या पाठीमागे भावंडांचं भलं होणार असेल, त्यांना सुख मिळणार असेल तर आपण जीव द्यायला काय हरकत आहे असा विचार ज्योतीच्या मनात सुरू होता. ज्योती यासाठी काही पाऊल उचलणार त्या अगोदरच सावत्र आईने सर्वात लहान मुलावर विषप्रयोग केला. ज्योतीने जिवावर उदार होऊन धाकट्या भावंडांचा जीव वाचवला. या घटनेनंतर ज्योतीचा सावत्र आईवरचा विश्वास पूर्णपणे उडाला. भांवंडांसाठी मरण पत्करणारी, स्वत:चा जीव द्यायला निघालेली मोठी बहीण आता वाघीण झाली. तिचं रौद्ररूप पाहून नव्या आईनं दुसऱ्या दिवशीच ज्योतीच्या घरातून आपला गाशा गुंडाळला. सावत्र आईने घर सोडल्यानंतर ज्योतीचा बाप मुलांशी व्यवस्थित वागत नव्हता. हे लक्षात आल्यानंतर ज्योती यांनी समाजातलीच एक विधवा बाई शोधली, तिला परिस्थिती समजून सांगितली, त्या बाईचा होकार मिळताच दवाखान्यात नेऊन तिचं ऑपरेशन केल्यानंतर मग वडिलांसोबत तिचं लग्न लावून दिलं. तुला मूल होऊ देता येणार नाही याच अटीवर ज्योतीनं त्या बाईचं लग्न आपल्या वडिलांसोबत लावून दिलं. अशा परिस्थितीतही ज्योती यांनी शिक्षण थांबवलं नाही. त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अवांतर वाचन-लेखन वाढवलं. त्या स्वत:ची भूमिका, मते आक्रमकपणे व्यक्त करू लागल्या. पण ज्योती यांच्यातला हा बदल बापाला सहन झाला नाही. त्यांनी ज्योतीपेक्षा कमी शिकलेल्या मुलासोबत त्यांचं लग्न लावून दिलं. ज्योती यांना इच्छेविरुद्ध बोहल्यावर चढावं लागलं. सासरी निमुटपणे सगळं सहन करत ज्योती यांनी त्यामधूनही वेगळा रस्ता शोधला. शेतात मोलमजुरी करत पिठाची गिरणी सुरू केली. शिकवण्या घेणे सुरू केले. ज्योतीच्या कमाईचा पैसा तिच्या सासूबाई घेऊन टाकत. कोणतंही काम हलकं नसतं असं मानून त्यांनी पडेल ते कामं केलं. नवऱ्याला कॉम्प्युटरचे शिक्षण दिले. स्वतःही घेतलं. आणि दोघांनी मिळून आधार कार्ड केंद्र सुरू केलं. कोविड काळात रुग्णांना जेवण पुरवण्याचं मोठं काम त्यांनी केलं. बचत गटांशी स्वतःला जोडून घेतलं. शेकडो बचत गट तयार केले. आज ज्योती बँकेमध्ये बचत गट ऑफिसर म्हणून काम करतात. पाचोरा गावात ज्योती हजारो बायकांचं नेतृत्व करतात. गावातील बेकार तरुण-तरुणींना मार्गदर्शन करतात. महिला सुरक्षेसाठी काम करतात. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जातात.

हे सगळं करताना ज्योती यांनी आपल्या धाकट्या भावंडांना स्वत:च्या पायावर उभं केलं. एके काळी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या ज्योती चौधरी आज दुसऱ्याचा बळकट आधार झाल्यात. उडणाऱ्या पंखात त्या बळ भरत आहेत. त्यांची ही चिवट झुंज इतर महिलांनाही खरेच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

रमेश रावळकर संपर्क : ८६६९०९३९९४