आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Story Of An Experience Given By A Sugar Daddy ...| Article By Ashok Gaikwad

चिंतन:एका साखरभ्रमाने दिलेल्या अनुभवाची गोष्ट...

अशोक गायकवाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोड वस्तूवर फारसा कोणी कडूपणाचा संशय घेत नाही. म्हणजे आपल्याला झालेला तो साखरभ्रमच की! खरं की नाही? तर शंभर टक्के खरंच. घरात चहा केला. त्या चहात दूध टाकल्यानंतर तो चहा फाटला. पुन्हा दुकानात जाऊन दुधाची पिशवी आणली. पुन्हा चहात टाकली. चहा फुटून गेला. नेमक्या याच वेळी फारसे कधी न येणारे स्नेही घरी आले. मग पुन्हा जाऊन दुधाची पिशवी घेऊन आलो. चहा केला. त्यात दूध टाकलं तर चहा पुन्हा फुटून गेला. आता कोरा कसा करायचा म्हणून शेजारून दूध घेतलं. ते पिशवीच नव्हतं. तरीही चहा फुटून गेला. शेवटी सरबत करून स्नेही वाटी लावले.

संध्याकाळी एकवेळ चहा करायचा दुधाचा, पण उपाय काय करू म्हणून पाणीच बदलले. कायमचे पाणी न वापरता नवीन पाणी वापरले. दुधाचा अंदाज घेतला. दूध बरं वाटलं. मग चहा केला. आता फुटणार नाही असं वाटलं, पण तरी फुटलाच.

चहाने दिवसभर घोर निराशा केली. उद्या सण आहे. सकाळी तरी चहा चांगला व्हावा म्हणून चहाची पावडर बदलायची असे ठरवले. मग काय, एकच मोठा चहाचा पुडा आणण्याऐवजी दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे चहापुडे आणले. ऐनवेळी फजिती नको म्हणून. सकाळ झाली. चहा ठेवला. दूध टाकलं. मनातली धास्ती. त्यात पुन्हा फुटला. आता?

माझ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. मग कोरा चहा पिणे हाच ‘पण’ केला. पण कोरा केल्यावरही त्याची काय चव कळली नाही. नेमकं होळी असल्याने पुरणपोळी आणि गुळणी असतेच. पोळ्यांनंतर गुळणी तयार झाली. मात्र ती गुळणीही फुटली. दुकान बदलले तरी तेच. शेवटी पाण्यात साखर उकळून गुळणी तयार केली. पण पुरणपोळ्या चवच देईनात. मग काय? स्वयंपाक करणारीवर तोंडसुख घेतलं गेलं. पण प्रश्न काही मिटला नव्हता. या सगळ्या ‘चहा-गुळणी आणि पुरणपोळी’ पुराणानंतर दोन-तीन दिवस चहा पिण्याची इच्छाच होत नव्हती. घरातील सगळेच चहाला नाकं मुरडायला लागले. प्रत्येकाने चहाची धास्तीच घेतली होती.

अशातच चतुर्थी आली आणि घरच्यांनी मोदक केले. आता मोदक खाऊन पाहिला तर तोही आंबूसच. असं कशामुळे झालं असेल हा प्रश्न मनात डोकावलाच. पण या वेळी मात्र जरा काखेतल्या कोळशावर म्हणजे साखरीवर संशय आला. मळीची साखर असेल. खराब साखर असेल म्हणून साखरेचा डबा पाहण्यासाठी सगळे घर धावले. डबा उघडला. साखर तोंडात टाकली तर भयानक आंबूस चव. साखर गोडच असते हा भ्रम डोक्यात पक्का बसलेला होता. तो पार तुटला. मग साखर चांगली पाहिली तर तिच्यात साखरेपेक्षा अधिक सफेद बारीक चौरस तुकडे दिसले. ते जिभेवर ठेवले तर ते चक्क लिंबूसत्त्व निघाले. आता सगळे बदलले. सगळ्यांनी एकमेकांवर आरोप केले, पण साखरेच्या गोडपणामुळे आणि डोक्यात साखरभ्रम असल्यामुळे साखरेवर मात्र आरोप झाले नाहीत आणि चौकशीही झाली नाही. किती भ्रमात जगतो आपण नाही का? असंच साखरभ्रमत्व माणसाच्या बाबतीतही असेलच कदाचित! गोड वस्तूवर फारसा कोणी कडूपणाचा संशय घेत नाही. म्हणजे आपल्याला झालेला तो साखरभ्रमच की! खरं की नाही? तर शंभर टक्के खरंच. संपर्क : ८२०८५७१४०६

बातम्या आणखी आहेत...