आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:कहाणी स्तनपानाच्या कवचकुंडलांची

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. स्तनपानाचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि दीर्घकालीन लाभ यावर प्रकाश टाकणारा लेख.

कर्णाला जन्मतः असणारी कवचकुंडले इंद्राने धूर्तपणे मागून नेली वगैरे पौराणिक कथा आपल्याला माहीत आहे. मात्र जन्मल्यावर प्रत्येकाला मिळणारी आईच्या दुधातली आरोग्यदायी पोषक कवचकुंडले मात्र आजन्म सोबत राहतात. दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा कालावधी ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. बाळ जन्मल्यावर पहिल्या एका तासात जर स्तनपान सुरू केले तर बालमृत्यू दर २२% ने कमी होतो, यावरूनच स्तनपानाचे महत्त्व किती जास्त आहे, याची कल्पना येईल.

एक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि स्तनपान विशेषज्ञ सल्लागार म्हणून काम करताना स्तनदा मातांच्या विविध शंका आणि समस्यांबाबत मार्गदर्शन करावे लागते. त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे इथे मला आवर्जून नमूद करावेसे वाटतात. गरोदरपणापासूनच स्तनांची स्वच्छता, स्तनपानाचे महत्त्व आणि योग्य पद्धत याबाबत समुपदेशन केले जाते.

अगदी आरंभीचा मुद्दा म्हणजे प्रसूती झाल्यावर सुरुवातीला आईला दूध येण्याआधी पिवळा चिकट द्राव येतो. त्याला चीक दूध म्हणतात. ते अनेक आजारांपासून बाळाला संरक्षण देते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवनसत्त्वेही देते. म्हणूनच त्याला Golden Welcome Drink असे संबोधले जाते. त्याआधी किंवा नंतरही बाळाला मध, साखरपाणी वगैरे काहीही देऊ नये. जन्मल्यापासून पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपानच द्यावे. सहा महिन्यांनंतर पुढे स्तनपानासोबत पूरक आहार द्यावा. बाळाची स्तनांवर पकड (Latch) चांगली असली म्हणजे त्याला दूध सहज मिळते आणि आईलाही कोणता त्रास होत नाही.

माता कधी विचारतात की दूध कमी येत असेल तर आहार कसा असावा? याचे उत्तर असे की, चौरस आहार घ्यावा, ज्यात भाज्या, फळे, डाळी असाव्यात. दोन वेळा न्याहरी आणि दोन वेळा पोटभर जेवण करावे. चहा-कॉफी कमी आणि पाणी भरपूर प्यावे. नेहमीच्या आहारापेक्षा ५०० कॅलरी आहार अधिक घ्यावा. मात्र जास्त तूप, गोड पदार्थ न खाता डॉक्टरांनी दिलेल्या कॅल्शियम आणि रक्तवाढीच्या गोळ्या मात्र घ्याव्यात. काही मातांना प्रसूतीनंतर बेचैन होणे, निराश वाटणे असे होऊ शकते. सध्याच्या ताणतणावाच्या काळात हे सामान्य आहे. अशा वेळी कुटुंबाने मानसिक आधार द्यावा. आईने स्तनपान व्यवस्थित सुरू ठेवावे. त्याने नैराश्य कमी करणारी संप्रेरके शरीरात स्रवतात आणि ही समस्या आपोआप बरी होते. अनेकदा आईला असे वाटते की दूध कमी येते आहे का, बाळाचे पोट भरते का? तर हे ओळखण्यासाठी साध्या गोष्टी म्हणजे बाळ २४ तासांत ७ ते ८ वेळा सू करत असेल आणि पहिले चार महिने बाळाचे वजन महिन्याला किमान ६०० – ८०० ग्रॅम वाढत असेल तर सगळे योग्य असल्याचे समजावे. रात्रीच्या स्तनपानाने दूध वाढते, त्यामुळे सोयीचे जाते म्हणून रात्री बाळाला वरचे दूध देऊ नये. बाळाला आईने नेहमी स्वतःजवळच ठेवावे आणि आपला स्पर्श होऊ द्यावा. नोकरी करणाऱ्या आईने कामावर जाण्याआधी आणि आल्यावर बाळाला पाजावे. जाण्याआधी आपले दूध स्वच्छ वाटीत काढून नीट झाकून ठेवावे. ते साध्या वातावरणात ४ तास आणि फ्रिजमध्ये २४ तासांपर्यंत चांगले राहते.

स्तनपान दिल्याने शरीर बेढब न होता उलट अतिरिक्त चरबी कमी होते. दोघांच्या आरोग्यासाठी ते आवश्यक व लाभदायी आहे. स्तनपानाने आईला स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता खूप कमी होते. जुळी बाळे असणाऱ्या मातांसाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे दोन्ही बाळांना आपलेच दूध द्यावे. आईच्या दुधानेच बाळांचा बुद्ध्यांक (IQ) वाढतो. त्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही बाळाला वरचे दूध देऊ नये. दोघांना दोन्हीकडे एकाच वेळी पाजावे. त्याने दोन्ही बाळांना समप्रमाणात दूध मिळेल आणि आईचा वेळ वाचून तिलाही आराम मिळेल. कधी-कधी आई विचारते की मला औषध सुरू आहे, मग स्तनपान द्यावे का? तर सर्दी, ताप वगैरे आजार असतानाही स्तनपान देत राहावे, खंड पडू देऊ नये.

एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दत्तक बाळालाही स्तनपान देता येते. त्याने आई आणि बाळात भावनिक बंध निर्माण होण्यास मदत होते. ते कसे करावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. सर्व स्तनदा मातांनी आपल्या डॉक्टरांशी नियमित संपर्क ठेवून शंकांचे निरसन करावे, स्वत:च्या मनाने निर्णय घेऊ नये.

डॉ. अपूर्वा देशपांडे संपर्क : ९८२२५४३७३१