आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृदिन विशेष:‘डोळस’ आयांच्या गोष्टी...

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसंग पहिला :
‘मिशन मंगल’ चित्रपटाच्या सुरुवातीला काही दृश्यं आहेत. नोकरीवर जाण्यापूर्वी नायिका अंगणातल्या तुळशीची पूजा करण्यापासून ते स्वयंपाकाच्या बाईला सूचना देण्याचं काम करतेय. दुसरीकडे मुलीच्या प्रश्नांची उत्तरं देतेय. सासऱ्यांनाही हवं-नको बघतेय. नायिका हे सर्व करत असताना तिचा कॉलेजवयीन मुलगा अजून अंथरुणातच आहे. नवरोबा वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसलाय.

प्रसंग दुसरा :
आमच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये वॉचमनचे कुटुंब राहते. दुपारी ऑफिसला निघताना वॉचमनची ८-९ वर्षांची मुलगी भांडे घासताना दिसली. तिच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा असलेला तिचा भाऊ बाजूच्याच कॉटवर आडवा पडून मोबाइलमध्ये गेम खेळत बसला होता.

प्रसंग तिसरा :
दुधात घालून पिण्याच्या एका एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीमधले शब्द - ‘अच्छी आदतों की अहमियत सिर्फ एक माँ ही जानती है...’
केवळ विरंगुळा म्हणून या प्रसंगांकडे बघितल्यास त्यामध्ये काही वावगं वाटत नाही, मात्र थोडा विचार केला तर या तिन्हींमधलं एक साम्य लक्षात येईल. चित्रपटाचा दिग्दर्शक असो, वॉचमनचा मुलगा असो किंवा जाहिरातीची संहिता लिहिणारी व्यक्ती...हे तिघेही पितृसत्तेचे वाहक आहेत. अशा एकांगी पद्धतीने विचारांची अभिव्यक्ती हा त्यांचा दोष नाहीच. स्वत:च्या बालपणापासून त्यांनी जे बघितलं त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या कृतीतून दिसलं. या तिघांनी घरातल्या पुरुषांना कधीही आई, बहीण, पत्नीची मदत करताना बघितलेले नसणार...परिणामी,‘आज खाने मे क्या हैं...’पुरताच यांचा स्वयंपाकघराशी संबंध आलेला असणार. घरातल्या महिलेला स्वयंपाकात मदत करणं, स्वत: स्वयंपाक करणं तर दूरचीच गोष्ट...

भारतात कितीतरी उत्तम शेफ हे पुरुष आहेत, अनेक ठिकाणी महिलांच्या पाळीच्या चार दिवसांत पुरुषच स्वयंपाक करतात, मोलकरीण ठेवायची ऐपत असेल तर? अशी मखलाशी यावर करणार असाल तर थांबा...अर्थार्जनासाठी पुरुषांनी स्वयंपाक करणं, ‘चार दिवस’ पर्याय नाही म्हणून स्वयंपाक घर सांभाळणं वेगळं आणि कुटुंब सदस्य म्हणून जबाबदारीने स्त्रीला मदत करणं,स्वयंपाक बनवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. स्वयंपाकासाठी मावशी ठेवून सगळेच प्रश्न आपोआप सुटत नसतात. कर्तव्यभावनेने घरकामात योगदान देणारे पुरुष किती असतात? घरकामातल्या पुरुषांच्या सहभागावर आधारित एक सर्वेक्षण असे सांगते की, भारतातील पुरुष घरकामासाठी दिवसातून सरासरी फक्त १३ मिनिटे देतात. कोरोनाकाळात म्हणजेच २०२१ मध्ये याच सरासरी वेळेत वाढ (?) होऊन ती १५ मिनिटे इतकी नोंदली गेली. त्याउलट सामान्य स्थितीत अर्थार्जन करून घरकाम-स्वयंपाकासाठी प्रत्येक महिला दररोज सरासरी ४ ते ५ तास खर्ची घालते. कोरोनाकाळातल्या वर्क फ्रॉम होममध्ये तर कौटूंबिक ‘आप की पसंद’ मुळे या वेळेत वाढच झाली. याला सर्वस्वी जबाबदार ठरल्या त्या घरकामाबद्दलच्या पारंपरिक खुळचट धारणा. ‘घर दोघांचं असतं. एकानं पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं...’ या साहित्यिक ओळी वाचायला अत्यंत रोमँटिक वाटतात. मात्र वास्तव अतिशय उद्विग्न करणारं आहे. अडचण ही आहे की, पुरुषांना घरात पैसा आणणारी बायको हवी अाहे, मात्र त्यासाठी घरकामाचा वाटा उचलण्याची, तडजोड करण्याची त्यांची मानसिकता नाही.कारण एखादी स्त्री मशिन दुरुस्त करू शकते हे आम्ही स्विकारलं मात्र पुरूषाने स्वयंपाकात मदत करावी हे अजूनही आमच्या पचनी पडलं नाही. वास्तविक अपत्याला जन्म देणे आणि त्याला स्तन्य देणे या दोनच गोष्टी वगळता अशी कुठलीच कामं नाहीत, जी स्त्री करू शकते पण पुरुष करू शकत नाहीत. मात्र लिंगभाव विषमतेच्या पितृकेंद्रित समाजाच्या धारणा इतक्या खोलवर मुरलेल्या आहेत की स्वयंपाकात, घरकामात पुरुषांनी वाटा उचलायला हवा असं पुरुषांना जन्म देणाऱ्या स्त्रियांनाच जिथे वाटत नाही तिथे पुरुषांना ही जाणीव होईल ही अपेक्षाच निरर्थक ठरते. त्यामुळेच की काय गेल्या वर्षभरापासून, सासरच्या मंडळींच्या मनासारखा स्वयंपाक जमत नाही म्हणून महिलांचा बळी घेतला जातोय.

त्यांना शारीरिक इजा पोहचवली जातेय. महिलांवरील हिंसाचाराच्या आजवरच्या प्रकारांमध्ये या नव्याच प्रकाराची भर पडलेली दिसतेय. अर्थात, सगळंच काही अंधकारमय नाहीये. गेल्या काही वर्षांत स्त्रीवादी चळवळीच्या विचारांमुळे म्हणा किंवा नाइलाज म्हणून का होईना पुरुष घरकामात काही अंशी वाटा उचलत आहेत. ज्यांना मुलं आहेत अशा महिलांनीही आपल्या मुलांना स्वयंपाकाची, घरकामाची सवय लावण्यासाठी सुरुवात केलीय. मुलांनी स्वत:ची कामं स्वत: करण्याचा, घरातल्या कामांबद्दलचा पूर्वग्रहदूषित लिंगाधारित दृष्टिकोन बदलण्याचा, घर सर्वांचे तर घरकामही सर्वांचे अशा जाणिवा मुलांमध्ये रुजवण्याचा संस्कार काही ‘डोळस’ आया करत आहेत. आजच्या मधुरिमामध्ये अशाच काही ‘डोळस’ आयांचे अनुभव, त्यांचा प्रवास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आयांच्या कालसुसंगत प्रयत्नांमुळे पुरुषांची भविष्यातली पिढी तरी समंजस, संतुलित विचारांची, हक्कांसोबतच कर्तव्याचं भान असणारी, स्वातंत्र्य उपभोगताना जबाबदारीबद्दल दक्ष असणारी, स्त्रियांच्या घरकामाच्या श्रमाचं ‘मोल’ जाणणारी असेल अशी आशा करायला बराच वाव आहे. किमान इथून पुढच्या काळातले पुरुष तरी अंघोळीनंतर स्वत:चा टॉवेल खुर्ची-पलंगावर फेकणार नाहीत, पेपर वाचल्यानंतर त्यांची व्यवस्थित घडी घालून जागच्या जागी ठेवतील, चहा घेतल्यावर स्वत:ची कपबशी विसळून ठेवतील, ऑफिसमधून आल्यानंतर घामेजलेले मोजे उघड्यावर फेकणार नाहीत, कपडे वाळत घालून वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायला शिकतील, ड्रॉइंग हॉल ते टॉयलेटपर्यंतची स्वच्छता करणं त्यांना कमीपणाचं वाटणार नाही, ते बाजारातून भाज्या पारखून आणतील, ‘मॅगी’ व्यतिरिक्त कुकर लावणं, पोळ्या लाटणं, भाजी फोडणीला टाकणंही शिकून घेतील, केवळ स्वयंपाकच नाही तर स्वयंपाकाआधीची तयारी आणि त्यानंतरची आवरासावरही शिकतील आणि ही सर्व कामं केवळ नाइलाज म्हणून नाही तर कर्तव्यभावनेने करतील अशी धूसर का होईना अपेक्षा करायला हरकत नाही, कारण ही ‘फेमिनिझम’ ची नाही तर ‘ह्युमॅनिझम’ची गरज आहे...

आई म्हणजे केवळ ममत्व या चौकटीतल्या प्रतिमेपलिकडे जाऊन, काळाची पावलं ओळखून कधी कुटुंबाच्या साथीने तर कधी विरोधात जाऊन मुलांना शिस्त लावणाऱ्या,आशादायी भविष्याची पायाभरणी करणाऱ्या या आयांना मधुरिमाचा मदर्स डे निमित्त ‘दिल से सलाम’...हे अनुभव वाचून एखाद्या कुटुंबात जरी असं पुरोगामी पाऊल उचललं गेलं तर ते मधुरिमाचं यश असेल...

वंदना धनेश्वर संपर्क : ८४२१३१७६८२

बातम्या आणखी आहेत...