आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Story Of Kashmiri Pandits Needs To Be Heard| Artical By Makarand Paranjape

चर्चा:काश्मिरी पंडितांची कहाणी ऐकवणे-ऐकणे गरजेचे आहे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वच समुदायांनी दु:ख भोगले आहे. त्यामुळेच आपण सारे मानव सारखे आहोत. तरीही काही समुदायांच्या वाट्याला जास्त यातना आल्या, असे वाटते. बहुधा हे विधिलिखितच असावे. यहुदींनी मानवी इतिहासातील सर्वात भयंकर नरसंहार सोसला आहे. जग त्याला होलोकॉस्ट नावाने ओळखते. सरस्वती संस्कृतीच्या वंशजांपैकी एक काश्मिरी पंडितांनीही अशीच शोकांतिका सहन केली. त्यांची मातृभूमी असलेल्या भारतात त्यांना सात वेळा पलायन करावे लागले. त्यांचे वंशज आजही सारस्वत ब्राह्मण म्हणून ओळखले जातात. उत्तर ते दक्षिणेपासून देशाच्या कानाकोपऱ्यात ते आढळतात. आपण देवाची विशेष मुले असल्याचे जसे यहुदींना वाटते, तसेच हिमालयाच्या कुशीत राहणारे काश्मिरी पंडित स्वत:ला शंकराचे प्रिय असलेले मानतात.

१९९० मधील गोष्ट. काश्मिरी पंडितांचे विस्थापन हा इतिहासातील एक नवा अध्याय होता. त्यांनी भोगलेला अन्याय, रक्तपात आणि नरसंहार स्तब्ध करणारा आहे. ते दुसऱ्या देशांमधून आलेले निर्वासित नव्हते, तर आपल्याच देशात झालेले बेघर होते. त्यांचा दोष काय होता? तर ते इस्लामिक कट्टरवाद्यांकडून सत्तेसाठी प्रयत्न केले जात असलेल्या एका राज्यात राहत होते. स्वातंत्र्याचा नारा ते कुणासाठी बुलंद करत होते? कुणापासून स्वातंत्र्य हवे? तर हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतापासून. राज्यसत्तेने त्यांची फसवणूक केली, मग ते केंद्र असो की राज्य सरकार. काही वेळा त्यांच्या शेजाऱ्यांनीही दगाफटका केला. ते काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्य होते. मात्र, त्यांच्यावर देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक समुदायाने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या दहशवाद्यांच्या इशाऱ्यावर हल्ला केला, त्यांना मारले, आपल्या घरातून बाहेर फेकले.

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी त्यांची कथा आपल्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचे धाडस केले आहे. अग्निहोत्री चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. वस्तुस्थिती आणि पुराव्यांवर आधारित हा चित्रपट असल्याचे ते सांगतात. पीडितांच्या ५ हजारहून अधिक तासांच्या लाइव्ह रेकॉर्डिंग्जवर आधारित आहे. चित्रपट असूनही त्यात वृत्तचित्ताचा भास होतो. अग्निहोत्री यांनी कोणताही प्रचार पुढे रेटलेला नाही, तर एक मानवी कथा ऐकवली आहे. त्यात वास्तवातील लोकांच्या वास्तव भावना आहेत. ही गोष्ट ऐकवणे अतिशय गरजेचे होते, कारण काश्मीर आणि भारताबाबत अधिकृतपणे जे ऐकवले जाते, त्याचे हे प्रत्युत्तर आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करणे आणि तो प्रदर्शित करणे हे एक मोठे आव्हान होते. अग्निहोत्रींना काश्मीरमध्ये चित्रीकरणाची परवानगी नव्हती, तर त्यांना विरोध आणि अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना ठार मारण्याचीही धमकी मिळाली होती. चित्रपटावर बंदी आणण्याचेही प्रयत्न झाले. न्यायालयात जनहित याचिका दाखल करून प्रदर्शन रोखण्याचे प्रयत्नही झाले. दुसरे कोणी असते तर त्याने चित्रपटच बनवला नसता.

आपल्या राजकीय वर्गासाठी असा चित्रपट सहन करणे महाकठीण आहे, त्यातील काही जण याला मूक सहमत असले तरी. चित्रपटातील क्रूर सत्यावर कुठेही मुलामा चढवलेला नाही. कोणाचे नाव घेण्यात संकोच केलेला नाही. धार्मिक ओळख आणि विचारसरणीच्या आधारावर कोणालाही सूट दिलेली नाही. चित्रपट आपल्याला विचलित करतो. त्याचा आशय सांगतो की, आपले असत्य हे लपवलेल्या सत्याइतके निंदनीय नाही. विवेक अग्निहोत्रींना सत्य सांगायचे होते आणि त्यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले. आपण त्याचा सामना करू शकलो नाही तर तो आपल्या सामूहिक चेतनेचा पराभव ठरेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मकरंद परांजपे जेएनयूमधील प्राध्यापक makarandblog@gmail.com

बातम्या आणखी आहेत...