आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाल मातीच्या मैदानात शड्डू ठोकले जातात. आखाड्यातले पैलवान खेळ दाखवू लागतात. पैलवानाच्या प्रत्येक चालीगणिक हलगीचा कडकडाट वाढू लागतो. प्रेक्षकांमधून टाळ्या अन् शिट्या वाजू लागतात. पैलवानाच्या खेळावर खुश होऊन फेटे उडवले जाऊ लागतात. नि सरतेशेवटी पैलवानानं कुस्ती मारली रे मारली की, त्याला खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांना भान उरत नाही.. विजयाच्या गुलालानं सारा आसमंत माखला जातो. गेली अनेक वर्षे पुरुषांच्या कुस्ती स्पर्धांमध्ये हे दृश्य सर्रास दिसते. मात्र, गेल्या पाच-दहा वर्षांत कुस्तीमधील महिलांच्या सहभागामुळे हे दृश्य, हे कौतुक आणि हे प्रोत्साहन तरुण महिला कुस्तीपटूंच्याही वाट्याला येते आहे. हलगीचा कडकडाटात तिच्याही विजयाचा गुलाल उधळला जातोय...
ऐतिहासिक परंपरा लाभलेली कुस्ती पूर्णपणे पुरुषप्रधान समजली जायची. मात्र, लाल माती आणि मॅटवरचे डावपेच शिकून प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड करण्यासाठी तरुणी पुढे सरसावल्या आणि कुस्तीमध्ये महिलांची संख्या वाढली. कुस्तीला खेळाचा दर्जा मिळाला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ गाजू लागला. मॅट आले तसे खेळाचा बाज बदलला. तरुणींनी बदलाचं हेही आव्हान स्वीकारलं आणि मातीतल्याप्रमाणेच मॅटवरही आपल्या सर्वोत्तम खेळाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं, नव्हे त्यात वर्चस्व प्रस्थापित केलं.
एक-दोन नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हजारो मुलींनी आता कुस्ती प्रशिक्षणाची वाट धरलीय. कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २०० च्या आसपास तरुणी कुस्ती प्रशिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत राज्याला मिळणाऱ्या पदकांपैकी अर्ध्याहून अधिक पदके कोल्हापूर जिल्ह्यातील मुली पटकावत आहेत. रेश्मा माने, स्वाती शिंदे, नेहा चौगुले, नंदिनी साळोखे या काही नावाजलेल्या कुस्तीपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचं नाव मोठं केलंय. ही बाब अभिमानास्पद असली, तरी या पदकामागे महिला कुस्तीगीर किती कठीण परिश्रम घेतात याबद्दलची आपल्यापैकी कुणालाच माहिती नसते. कोल्हापूर जिल्ह्यात, शहरासह ग्रामीण भागात म्हणजे मुरगुड, कळंबा, पाचगावसह अनेक ठिकाणी सध्या महिला कुस्तीगीर प्रशिक्षण घेत आहेत. दिवसातील किमान तीन तास आखाड्यांमध्ये तरुण मुली कुस्तीचा सराव करतात. पहाटे साडेपाचला त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळी सराव, त्यानंतर दिवसभरात शाळा, महाविद्यालय, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून पुन्हा संध्याकाळी कुस्त्यांचा सराव असा या मुलींचा दिनक्रम आहे. महिला असल्यानं सरावाला नैसर्गिक मर्यादा येत असतील? त्या चार दिवसांत त्या काय करत असतील? असे अनेक स्वाभाविक प्रश्न एक स्त्री म्हणून या मुलींना भेटल्यावर माझ्या मनात डोकावले. पण, या पैलवान तरुणींनी त्यावर दिलेलं उत्तर ऐकून एक स्त्री म्हणून माझा उर अभिमानाने भरून आला. या पैलवान तरुणींचा एकही दिवस सरावाशिवाय जात नाही, मुलांसारखाच कठीण सराव त्या करतात, इतकेच नव्हे तर मासिक धर्माच्या चार दिवसांतदेखील सराव कायम ठेवला जातो.
आखाड्यातल्या या पैलवान तरुणीही इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच स्वत:च्या वजनाबद्दल विशेष ‘कॉन्शस’ असतात. अर्थात हे ‘कॉन्शस’ असणं जरा वेगळं आहे. कारण या मुलींना आहारावर विशेष लक्ष द्यावं लागतं. ज्या वजन गटात कुस्ती लढवायची आहे, ते कायम ठेवणं किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दूध, ताजी फळं, सुकामेवा, अंडी, चिकन सूप हे सर्व आहारात आवर्जून घ्यावं लागतं. बऱ्याचदा हा खर्च आवाक्याबाहेर असतो. मात्र तरीही, आपली लेक या क्षेत्रात नाव कमावतेय म्हटल्यावर पालक खर्च सहन करतात. मुली कुस्तीत नाव काढताहेत म्हटल्यावर खेड्यापाड्यातले लोकदेखील आता मुलींवरच्या विश्वासानं त्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाठवत आहेत. या लेखाच्या निमित्ताने मुरगुड इथले कुस्ती प्रशिक्षक दादा लवटे यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवूनदेखील महिला कुस्तीगीर शासनाकडून बेदखल होत असल्याबद्दल ते खंत व्यक्त करतात. राज्य सरकार या मुलींना उपेक्षेची वागणूक देत आहे. हे असेच सुरू राहिले तर काही वर्षे सराव करून निराशेने मुली कुस्ती क्षेत्र सोडून देतील, अशी शक्यताही ते व्यक्त करतात. तर दुसरीकडे, कोल्हापूरमधील प्रशिक्षक राम सारंग या पैलवान तरुणींच्या आहाराबद्दल चिंता व्यक्त करतात. महिला कुस्तीपटूंना पुरेसा पौष्टिक आहार आपण देऊ शकत नाही, त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या मुलींसाठी शासनाने विशेष तरतुदीअंतर्गत प्रशिक्षण आणि सकस आहार देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा राम व्यक्त करतात. { संपर्क : Sarikar.priya@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.