आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृदिन विशेष:कहाणी अनाथांच्या पितृत्त्वाची

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१६ मध्ये प्रदर्शित ‘सैराट’ सिनेमा अनेकार्थांनी चर्चेत राहिला. कधी सिनेमाचा विषय, कधी त्यातले नवखे कलाकार, तर कधी उडत्या चालीची गाणी आणि अर्थातच आंतरजातीय विवाहाला नसलेली समाजमान्यता अशा अनेकांगाने त्यावर चर्चा झाल्या. मात्र सिनेमाच्या शेवटी नायक-नायिकेच्या हत्येनंतर पाठीमागे राहिलेल्या त्या मुलाचं काय झालं किंवा अशा मुलांचं काय होतं यावर गेल्या इतक्या वर्षांत कधीच चर्चा होताना दिसल्या नाहीत. कुठल्याही कारणाने अशा अनाथ झालेल्या मुलांना अनाथालयात ठेवलं जातं. नियमानुसार अशा मुलांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या सुविधा पुरवल्या जातात. मात्र अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथ मुलांना अनाथालयाची दारं बंद होतात. हे सर्व नियमाला धरून असलं तरी अशा मुलांच्या भविष्याबद्दल फारसा विचार समाजातून होताना दिसत नाही. सरकार दरबारी तर आनंदी आनंदच आहे. या सर्वांचा विचार करून आपल्या वाट्याला जे अनाथाचं आयुष्य आलं ते निदान इतर मुला-मुलींच्या वाट्याला येऊ नये या भावनेने मी प्रयत्न केले आणि आज सांगायला आनंद आणि समाधान वाटते की, हजारो मुला-मुलींना पित्याचं छत्र देण्यात मी खारीचा वाटा उचलू शकलो.

मी मूळचा आंध्र प्रदेशचा. माझ्या आई-वडिलांचा आंतरजातीय विवाह होता. मात्र काही समाजकंटकांना हे अमान्य असल्यामुळे त्यांनी माझ्या आई-वडिलांची हत्या केली. त्या वेळी मी केवळ अडीच वर्षांचा होतो. माझ्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून माझ्या आजोबांनी मला लोणावळ्याच्या अनाथाश्रमात ठेवलं. मात्र वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला तिथून बाहेर पडावं लागलं. पुढे काय, हा प्रश्न माझ्यासमोर ‘आ’ वासून उभा होता. शिकण्याची खूप इच्छा होती, मात्र दोन वेळच्या अन्नाची जिथे भ्रांत होती तिथे शिक्षणाचा तर विचारही करू शकत नव्हतो. पण मी जिद्द सोडली नाही. त्या वेळी मुंबईमध्ये केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याचं काम सुरू होतं. ते काम मी दोन वर्षे केलं. त्याव्यतिरिक्तही मिळतील ती कामं करून पैसे मिळवले. शिकलो. त्याचदरम्यान मुंबईत मला एक सभ्य गृहस्थ भेटले. त्यांनी मला उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य केले. माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. मला चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. मात्र आपल्यासारखी कितीतरी अनाथ मुलं असतील, ज्यांच्या नशिबात असं शिक्षण नसेल, असं सुरक्षित जगणं नसेल हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. हाताशी उत्पन्नाचं साधन नसलेली, शिक्षण नसलेली अशी अनाथ मुलं भविष्यात गुन्हेगारीकडे वळतात हे मी बघितलं होतं. या सर्वांचा माझ्या मनावर परिणाम झाला आणि त्याच कळकळीतून मी अनाथ मुलांना हक्काचा आसरा मिळावा, त्यांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी या हेतूने २०१० मध्ये एकता निराधार संघ नावाची संस्था स्थापन केली. १८ वर्षांवरील सज्ञान मुला-मुलींच्या पुनर्वसनाचं काम मी या माध्यमातून सुरू केलं. संस्थेतल्या मुलांना तांत्रिक, व्यावसायाभिमुख शिक्षण देणं, उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं आणि मुख्य म्हणजे तरुण निराधाराचं आयुष्य भरकटणार नाही याकडे लक्ष देणं ही महत्त्वाची कामं मी सध्या संस्थेच्या माध्यमातून करतो आहे. २०१० पासून आजपर्यंत १२८८ पेक्षाही अधिक मुलांचं पितृत्व मी निभावलं आहे. त्यापैकी अनेक मुलं आज मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरी करत आहेत. अनेक मुली त्यांच्या सासरी सुखाने नांदत आहेत हे सांगायला मला खूप आनंद वाटतो आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशात पसरलेल्या माझ्या संस्थेच्या कामाने आजवर अनेक तरुणांना योग्य दिशा दाखवण्याची संधी मिळाल्याचं समाधान मोठं आहे. मधुरिमाच्या माध्यमातून सर्व वाचकांना मी आवाहन करू इच्छितो की, तुम्हालाही ऐन तारुण्यात दिशाहीन झालेली अनाथ मुलं-मुली दिसल्यास कृपया माझ्या संस्थेशी संपर्क साधा. तुमच्या पुढाकारामुळे कदाचित वाईट दिशेला जाऊ पाहणारं एखादं आयुष्य योग्य मार्गावर येऊ शकेल.

सागर रेड्डी संपर्क : ९७६८११७४७७

बातम्या आणखी आहेत...