आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचावे असे काही:शैलीदार आणि ओघवतं ‘दुसरं वादळ’

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाखाली असून काटे, असतो हासत जात कोणी फुलासारखी उचलून घेतो, अंधाराची रात कोणी संकटांना धैर्याने तोंड देताना ते हसत स्वीकारणाऱ्या माणसाचे हे वर्णन कुणा कवीने केले आहे, त्यात चपखल बसणारी एक व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे. आपल्या अभिनयकौशल्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा हा कलावंत वास्तविक आयुष्यातल्या अनुभवांचे कथन करताना उत्तम लेखकही झाला आहे. दु:ख, संघर्ष यांचे दुसरे नाव म्हणजे आयुष्यातले वादळ! पोंक्षे यांच्या आयुष्यातले पहिले वादळ म्हणजे ‘मी नथुराम बोलतोय’ हे नाटक, ज्याने त्यांचे जीवन ढवळून काढले. त्यावर त्यांनी ‘मी आणि नथुराम’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या आयुष्यात नुकतेच येऊन गेलेले एक संकट म्हणजे त्यांना झालेला कर्करोग! जिद्द, श्रद्धा आणि योग्य उपचारांनी सुदैवाने ते पूर्ण बरे झाले आहेत. मात्र, त्या अत्यंत संघर्षमय काळाची आठवण त्यांनी शब्दबद्ध केलीय ती ‘दुसरं वादळ’ या पुस्तकाच्या रूपाने. हे वादळ त्यांच्या शरीरातच शिरले होते. शब्दामृत प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन औरंगाबाद इथे १७ जुलै रोजी झाले. त्या दिवशी हे पुस्तक हातात आले आणि ते पूर्ण वाचूनच खाली ठेवले.

नाव काढताच घाबरून जावे असा शब्द म्हणजे कॅन्सर! त्याला शरद पोंक्षे अकल्पित आलेला पाहुणा म्हणतात. त्याला आवडणारा किमोथेरपीचा पाहुणचार दिला अशा वाक्यातून संकटाला सहज सामोरे जात एक निकोप मानसिकता दर्शवणारा लेखकाचा चेहरा दिसतो. सावरकरप्रेमी असणारे पोंक्षे या विचाराने पुस्तक लिहिते झाले की सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक आपल्या व्यथा मांडण्यासाठी नव्हे तर भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी लिहिले, त्याच धर्तीवर कॅन्सर रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ज्येष्ठ अभिनेता असूनही सामान्य आर्थिक स्थिती आणि कुटुंबातली एकमेव कमावती व्यक्ती जेव्हा या आजाराच्या विळख्यात सापडते तेव्हा काय स्थिती होत असेल? पत्नी, दोन अपत्ये आणि वयोवृद्ध आई! हे माझ्याच वाट्याला का, असा विचार न करता, त्रासदायक, खर्चिक आणि वेदनादायी उपचार सुरू करणे आणि मुख्य म्हणजे सगळे स्वीकारणे हे फार धैर्याचे आहे. अशा अनेक घटना आणि प्रसंग पुस्तकात वर्णन केले आहेत. त्यांच्या आईची गणपतीवरील श्रद्धा, पत्नीची शिवानंदांवरील श्रद्धा, स्नेह आणि सिद्धी या दोन्ही अपत्यांचा समंजसपणा हा पोंक्षे यांचा आधार आहे. पैसा या आजारात महत्त्वाचा असला तरीही हा आधार अमूल्य आहे.

पेरले ते उगवते या न्यायाने पोंक्षे यांच्या चांगुलपणाने त्यांनी जोडलेली माणसे वेळोवेळी त्यांच्या मदतीला आली. पुस्तकाचे प्रकाशक पार्थ बाविस्कर प्रस्तावनेत म्हणतात की हे पुस्तक दिवाणखान्यातील कपाटात न राहता आयुष्यात प्रेरणा म्हणून उपयोगी पडावे. पुस्तकाची भाषा शैलीदार आणि ओघवती आहे. मुख्य म्हणजे कोणताही आव न आणता, जे जसे घडले तसे दिलखुलासपणे लिहिले आहे. या आजाराबाबत मार्गदर्शन म्हणूनही अनेक गोष्टी यात नमूद आहेत. पोंक्षे यांनी कधीही आजाराचा बाऊ न करता नेहमीसारखी जीवनशैली ठेवली, येणाऱ्याचे हसत स्वागत केले त्याच निखळपणाने त्यांनी सगळे अनुभव मांडले आहेत. माणसाला आणि कुटुंबालाही आध्यात्मिक अधिष्ठान असले तर कोणत्याही वादळाला समर्थपणे तोंड देता येते हे आपल्याला पुस्तक वाचताना जाणवते. आपल्या आईप्रमाणे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सहज वाचता यावे म्हणून अक्षरांचा टाइप मोठा ठेवला आहे, ही संवेदनशीलता भावते. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.

- पुस्तकाचे नाव : दुसरे वादळ - लेखक : शरद पोंक्षे - प्रकाशन : शब्दामृत प्रकाशन - किंमत : ४०० - संपर्क : ९८८१४७२५६०

वसुधा देशपांडे

बातम्या आणखी आहेत...