आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Support Of The Family Is Important In The Oblivion | Artical By Vaishali Chavan

मधुरिमा विशेष:विस्मरणात कुटुंबीयांचा आधार महत्त्वाचा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अल्झायमर’ या आजारात जितका मोठा आधार तितकी चांगली काळजी, हे लक्षात घेऊन कुटुंबीयांना भक्कम पाठिंबा देणारे समाजभान अपेक्षित आहे. आजच्या घडीला जगात पाच कोटी लोक विस्मृतीग्रस्त आहेत. पुढील पन्नास वर्षांत ही संख्या तिप्पट होईल, असा अंदाज आहे. उद्याच्या (२१ सप्टेंबर) जागतिक अल्झायमर दिनानिमित्त हा आजार आणि त्याविषयीच्या जाणिवांचा हा जागर...

म्हा तारपणी विस्मरण होणारच, असे न म्हणता तशी लक्षणे दिसताच ताबडतोब पावले उचलायला हवीत. विस्मरण हे वृद्धापकाळातील दुखण्यांपैकी दुखणे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. तसेच या रुग्णांना सांभाळणाऱ्या त्यांच्या काळजीवाहकांना आधार दिल्याशिवाय रुग्णाची काळजी अशक्य आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जितका मोठा आधार तितकी चांगली काळजी हे लक्षात घेऊन कुटुंबीयांना भक्कम पाठिंबा देणारे समाजभान आपल्याकडून अपेक्षित आहे. आजमितीला जगात ५ कोटी लोक विस्मृतीग्रस्त आहेत. पुढील पन्नास वर्षांत ही संख्या तिप्पट होईल असा अंदाज आहे. २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच.

सदुसष्ट वर्षांच्या सौ. यामिनी यांना घेऊन त्यांचे पती आणि सूनबाई क्लिनिकमध्ये आल्या तेव्हा ते हबकले होते. कारण त्यांच्या लक्षात आलं की यामिनी यांनी गेला आठवडा अंघोळ केलीच नव्हती. त्या बाथरूममध्ये जात, मात्र अंघोळ न करताच बाहेर येत. सुरुवातीला घरच्यांच्या लक्षात आले नाही, पण अंगाचा वास येऊ लागल्यावर त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने यामिनी यांना मानसिक आजार झाला असेल या शंकेने दवाखान्यात आणले. एमआरआयनंतर त्यांच्या मेंदूची झीज झाल्याने त्यांना स्मृतिभ्रंश झाल्याचे निदान झाले. त्याआधी यामिनी स्वतःमध्येच गुंग असत. गेली दीड दोन वर्षे त्यांचे बोलण्याकडे लक्ष नसे, त्यांना एकेक गोष्ट दोन-तीनदा सांगावी लागे, काही वेळा त्या वस्तू ठेवलेल्या विसरत असत असे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते. पण त्याच्यामागे एवढे गंभीर कारण असेल अशी त्यांना सुतराम कल्पना आली नाही. त्यामुळे यामिनी यांचे लवकर निदान होऊ शकले नाही. ‘अल्झायमर्स डिसिज’ हे स्मृतिभ्रंशाचे सर्वात जास्त आढळणारे कारण आहे. वयाच्या ६०-६५ वर्षांनंतर याची लक्षणे दिसू लागतात. त्यात मेंदूमध्ये अमिलॉइड नावाच्या प्रोटीनच्या गाठी साठतात. त्या का साठतात याची कारणे अजून सापडली नाहीत. पण या गाठींमुळे मेंदूच्या स्मृती, विचार करणे, बोलणे, समज, अंदाज, वर्तन, भावना अशा अनेक गोष्टींवर विपरीत परिणाम होतो. अल्झायमर डिसिजला स्त्रियांचा आजार असे म्हटले जाते. कारण अल्झायमर झालेल्या रुग्णांपैकी जवळजवळ ७०% स्त्रिया असतात. याची आनुवंशिकता, स्त्रियांचे दीर्घायुष्य, स्त्रियांमधील उत्तम प्रतिकारशक्तीमुळे अल्झायमर डिसिजसाठी कारणीभूत असलेले अमिलॉईड्स प्रथिनांच्या गाठी मेंदूत साठण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता जास्त असते.

अल्झायमर संपूर्ण बरा होत नाही. त्याचे लवकर निदान झाले तर मेंदूच्या नुकसानीचा वेग काही प्रमाणात नियंत्रणात वा कमी करता येऊ शकतो. या आजाराचा त्या व्यक्तीच्या तसेच कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परीणाम होतो. कारण रुग्ण हळूहळू संपूर्ण परावलंबी होत जातो. अशा रुग्णांची घरी अथवा स्पेशल संस्थांमध्ये काळजी घेणे गरजेचे होऊन बसते. याचे मोठेच आर्थिक, सामाजिक, मानसिक ओझे रुग्ण आणि कुटुंबीयांवर पडते. या आजारामुळे आत्मविश्वास कमी होतो. समाजात वावरताना भीती वाटते. आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे अशी भावना निर्माण होते.दीर्घकालीन आजारांप्रमाणेच अल्झायमर डिसिज असलेल्या रुग्णांनासुद्धा प्रेम, सहृदयता, आपुलकी आणि सहसंवेदना (Empathy) यांची गरज असते.

अल्झायमर डिसिज असणाऱ्या रुग्णांची काळजी सोपी नसते. त्यांच्या नातेवाईक, नर्सिंग स्टाफ, सोशल वर्कर्स अशा सर्वांनाच हे काम ताणाचे असू शकते. त्यांच्यामध्ये चिंता, नैराश्याची भावना, आत्यंतिक दमछाक (बर्न आऊट), चिडचिड असे प्रश्न उद्भवू शकतात. त्यांचे वेळोवेळी समुपदेशन होणे गरजेचे असते. अशा वेळी समाजातील सुजाण लोक सामाजिक भावनेतून रुग्णांना सोबत/मदत करून समाज या केअर टेकर व्यक्तींचे काम काही प्रमाणात तरी हलके करू शकतात, परंतु यासाठी निव्वळ उदात्त सामाजिक जाणीव असणे पुरेसे नाही. अल्झायमर विकार असणाऱ्या व्यक्तींची किमान काळजी कशी घ्यावी, याचे या शास्त्रशुद्ध प्रशिक्षण निव्वळ कुटुंबीय किंवा नर्सिंग स्टाफ सोशल वर्कर्सबरोबरच अशा सामाजिक कार्यकर्त्यांना असणेही आवश्यक आहे. असे असेल तर आपण एक समाज म्हणून भविष्यात येऊ घातलेल्या एका महत्त्वाच्या आजाराचा सामना करू शकू.

डॉ. वैशाली चव्हाण संपर्क : ९८२३९८६२८०

बातम्या आणखी आहेत...