आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Tendency To Win In Any Situation Is Dangerous | Aricle By Rajdeep Sardesai

दृष्टिकोन:कोणत्याही परिस्थितीत विजय प्राप्त करण्याची प्रवृत्ती घातक

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या ५० वर्षांत सुनील गावस्कर यांच्यापेक्षा प्रभावशाली आवाज कोणीही नाही. त्यामुळेच ते भारतीय खेळपट्ट्यांच्या दयनीय अवस्थेवर भाष्य करतात - ज्यामुळे सलग तीन कसोटी सामने तीन दिवसांत संपले - तेव्हा ते तुम्हाला ऐकावे लागते. ते म्हणाले की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताकडे फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्या बनवण्याशिवाय पर्याय नव्हता. गावस्कर यांनी जे सांगितले ते आज केवळ क्रिकेटचाच नाही, तर जीवनाचाही मंत्र झाला आहे की, काहीही करून यश मिळवा. साध्य महत्त्वाचे आहे, साधन नव्हे. या टिप्पण्यांचा संदर्भ असा आहे की, भारतीय क्रिकेटला या खेळातील महासत्ता म्हणून पाहण्यात अभिमान वाटतो. त्याचे खेळाडू जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू मानले जातात आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला मायदेशात कसोटी मालिकेत दोनदा पराभूत केले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत याची कल्पनाही नव्हती. सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षक असलेल्या या संघाला कोणती असुरक्षितता सतावत होती, ज्यामुळे त्यांना घरच्या परिस्थितीत मालिका जिंकण्यासाठी अनुकूल खेळपट्ट्या बनवायला भाग पडले? लक्षात ठेवा की इतके असूनही भारतीय संघाने २०१३ पासून कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या प्रसंगी अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र न होणे बीसीसीआयला परवडणारे नाही. याच कारणामुळे क्युरेटर्सवर अशा खेळपट्ट्या बनवण्याचा दबाव होता, ज्यावर चेंडू पहिल्या दिवसापासून वळू लागेल. इंदूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्याला आयसीसी मॅच रेफ्रीने वाईट रेटिंग दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्याचा हा मंत्र अनैतिक आहे, कारण तो समान संधींच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. बॉल आणि बॅटमध्ये समान स्पर्धा असली पाहिजे. पण, आज लवकरात लवकर वीस विकेट्स घेऊन कसोटी जिंकणे आवश्यक मानले जात आहे. निवडणुकीच्या वेळीही असाच नारा दिला जातो की, ‘जो जीता वो ही सिकंदर.’ इथेही निवडणूक जिंकणाऱ्याने अवलंबलेल्या पद्धतींनी काही फरक पडत नाही, मग ती द्वेषपूर्ण भाषणातून किंवा पैशाच्या बळावर किंवा संस्थांचे अन्यायकारक शोषण करून केलेली असली तरी. आज विजेत्याचे गौरव करण्याची प्रवृत्ती विकसित झाली आहे, ज्याला सर्व नैतिक मानकांपासून मुक्त मानले जाते. असो, क्रिकेटमध्ये राजकारण चालत नाही, पण कौशल्यावर आधारित खेळ अनुकूल खेळपट्ट्यांच्या मदतीने लॉटरीत रूपांतरित केला गेला तर यामुळे खेळभावना नष्ट होते. खेळपट्टीच्या वादावरही बरीच ‘व्हॉटअबाउटरी’ आहे, ती म्हणजे जर-तरचे वाद. असे म्हटलं जाते की, परदेशात हिरव्यागार आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळावे लागते तेव्हा काय? हे खरे आहे की, परदेशातील परिस्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे परदेशी संघांना घरचा फायदा मिळतो, पण मुद्दाम आपल्याला अनुकूल खेळपट्ट्या तयार करून ते न्यायोचित ठरवता येईल का? त्यामुळेच इंदूरच्या अत्यंत वाईट खेळपट्टीवर भारत ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामना हरला तेव्हा त्यात एक काव्यात्मक न्याय होता. तुम्हाला घरच्या परिस्थितीत तुमच्या अजिंक्यतेची खात्री असते तेव्हा तुम्ही अनपेक्षित अपेक्षा करत नाही. यात जीवनासाठी एक महत्त्वाचा धडादेखील आहे की, कोणत्याही गोष्टीला तुच्छ लेखू नका. पुनश्च : इंदूरमधील कसोटी सामना फक्त दोन दिवस आणि एका सत्राच्या खेळानंतर संपला, तेव्हा एका क्रिकेट वेबसाइटने एक स्पष्ट मुलाखत दाखवली. ही मुलाखत भारतीय संघाच्या जर्सी विकणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्याची होती. त्याने पाच दिवस विकण्यासाठी शर्ट खरेदी केले, पण दोनच दिवसांनी त्याला दुकान बंद करावे लागले. त्याचे झालेले नुकसान कोण भरून काढणार? कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हा मंत्र बनला असताना अशा गोष्टींची कोण पर्वा करते? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...