आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Tricolor Is Not Only A National Symbol, But Also A Symbol Of Moral Behavior Of Citizens \ Article By Nanditesh Nilay

दृष्टिकोन:तिरंगा हे केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर नागरिकांच्या नैतिक वर्तनाचेही प्रतीक

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी विवेकानंदांनी ध्वजाला त्यागाचे प्रतीक मानले. ते म्हणाले होते, त्यागच आहे, तो ध्वज, तो भारताचा ध्वज, जो एका अविनाशी विचाराच्या रूपात जगभर फडकत आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ध्वजाने एकत्र येण्यास आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यास मदत केली.

आज देश भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’सह या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज आहे, याअंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सुमारे १०० कोटी लोक राष्ट्रध्वज फडकवतील. केंद्राने ध्वज संहितेत दुरुस्ती केली असून आता तिरंगा दिवसा आणि रात्री सार्वजनिक ठिकाणे व वैयक्तिक घरे आणि इमारतींमध्ये प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. आधी ध्वज फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवता येत असे. जगातील प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा स्वतःचा ध्वज असतो, तो स्वतंत्र देश असल्याचे दर्शवतो. १९२१ मध्ये मसुलीपट्टणम येथील आंध्र काँग्रेसचे सदस्य पिंगली व्यंकय्या यांनी प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रध्वजाची गरज मांडली. भारताचा राष्ट्रध्वज असण्याची कल्पना महात्मा गांधींना आवडली. गांधीजी म्हणाले, ‘आपल्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि इतर सर्वांनी जगण्यासाठी आणि मरण्यासाठी समान ध्वज ओळखणे आवश्यक आहे.’ स्वातंत्र्याच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की, फडकणारा ध्वज सामूहिक एकात्मता दर्शवून सर्वांना एकमेकांशी जोडून ठेवत राहिला. राष्ट्रध्वज सन्मानाचे, देशभक्तीचे, शांततेचे आणि राष्ट्राच्या एकतेचे प्रतीकच आहे.

मार्कस केमेलमेयर, डेव्हिड जी. विंटर यांनी ‘अमेरिकन ध्वजाच्या संपर्कात येण्याचे परिणाम’ यावर अध्ययन केले. त्यांना आढळले की, अमेरिकन ध्वज हे युनायटेड स्टेट्समध्ये सर्वाधिक वारंवार प्रदर्शित केले जाणारे राष्ट्रीय प्रतीक आहे. ज्याची व्याख्या देशाप्रती प्रेम-बांधिलकी म्हणून केली जाते असा ध्वज देशभक्ती वाढवेल, अशी त्यांची कल्पना होती. अमेरिकन ध्वजाने राष्ट्रवाद वाढवला या कल्पनेला अध्ययनांनी बळकटी मिळाली.

लिंडा जे. स्किटका यांनी आणखी एक अध्ययन करून अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्या. या व्यापक वर्तनाला कारणीभूत अंतर्निहित प्रेरणा समजून घेणे हे या संशोधनाचे उद्दिष्ट होते. विशेषतः देशभक्ती (देशप्रेम व समूहातील एकता). ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ध्वज-प्रदर्शन हे देशभक्तीची अभिव्यक्ती असल्याचे दिसले.

‘हर घर तिरंगा’ ही भावना आपल्याला आणखी काही प्रश्न विचारते की, तिरंग्यापासून आपण काय शिकतो? आपण अधिक शिस्तबद्ध आणि निष्ठावान व्हावे, अशी अपेक्षा आपला तिरंगा आपल्याकडून करत नाही का? २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा स्वीकारला होता. आज आपण हे विसरू नये की, भगवा रंग आपल्यातील शक्ती आणि धैर्य दर्शवतो. मानवतेच्या कल्याणासाठी असावी अशी शक्ती. आणि आपल्या राष्ट्राच्या व कुटुंबाच्या सीमांचे रक्षण करणारे धैर्य. मध्यभागी पांढरा रंग आहे, तो प्रामाणिकपणा, पावित्र्य आणि शांतता दर्शवतो. भारताने कधीही कोणत्याही देशाच्या सीमेला अनावश्यक लक्ष्य केले नाही. ही अशोकाच्या धम्माची व शांततेची भूमी होती आणि प्रत्येक घरातील तिरंगा त्या शांततेची दिशा ठरवेल आणि समृद्धी, सुपीकता व विकास दर्शवणारा हिरवा रंग आपल्याला स्वावलंबनाकडे घेऊन जाईल, अशी आशा बाळगायला हवी. चक्रामध्ये समान अंतरावर २४ आऱ्या आहेत. अशोक चक्र हे कालचक्र म्हणूनही ओळखले जाते, त्यात २४ आऱ्या दिवसाच्या २४ तासांचे प्रतिनिधित्व करतात व काळाच्या गतीचे प्रतीक आहेत. चक्र म्हणजे गतीमध्ये जीवन आणि मृत्यूही आहे. हे शांततापूर्ण बदलाच्या गतिशीलतेचे प्रतिनिधित्व करते.

तिरंगा हे केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर नागरिकांच्या नैतिक वर्तनाचेही प्रतीक आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन म्हणाले होते, ज्याचा आपण आदर करतो व ज्याच्या छायेखाली सेवा करतो तो हा ध्वज राष्ट्र म्हणून आपल्या एकतेचे, सामर्थ्याचे, विचाराचे व उद्देशाचे प्रतीक आहे. तिरंगा हा देशाचे मस्तक आणि आपला अभिमान आहे. आणि याच भावनेने आपण फडकवावा ‘हर घर तिरंगा’.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) नंदितेश निलय लेखक आणि वक्ते nanditeshnilay@gmail.com

बातम्या आणखी आहेत...