आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्यापैकी बरेच जण कामावर जाण्यासाठी अनेक तास आधी घर सोडतात. मोठ्या शहरांत कुठेही प्रवास करण्यासाठी ४५ मिनिटे ते एक तास सहज लागतो. पण, तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी अवघ्या १५ मिनिटांत पोहोचू शकलात तर तुम्हाला कसे वाटेल? मी येथे वाहतुकीच्या कोणत्याही नवीन पद्धतीबद्दल नव्हे, तर ‘१५ मिनिटांच्या शहरा’बद्दल बोलत आहे. हो, हा नवे शहर विकसित करण्याची नवी पद्धत आहे, तिथे प्रत्येक इच्छित स्थळी तुम्ही १५ मिनिटांत जाऊ शकाल. फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि स्पॅनिश शहर बार्सिलोना यांसारखी युरोपातील अनेक शहरे ही संकल्पना स्वीकारत आहेत. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे. उदा, कोणतेही मोठे शहर पाहा. लाखो लोक दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात, कारण त्यांची शाळा किंवा कामाचे ठिकाण घरापासून लांब आहे. फळे व भाजीपालाही येथे पिकत नाही. तो शेकडो किलोमीटर दूरच्या गावातून येतो. यामुळे जास्त कार्बन उत्सर्जन होते, ते पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. २०१६ मध्ये पॅरिस शहराने त्याच्या सीन नदीच्या बाजूच्या एका मोठ्या मार्गाचे उद्यानात रूपांतर केले. दररोज सुमारे ४० हजार वाहने ये-जा करत असल्याने तो रस्ता प्रदूषणाचे प्रमुख कारण झाला होता. या मार्गावर गर्दीच्या वेळी जाम होत होता आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या सीन नदीच्या काठाला अप्रिय बनवत होता. पॅरिसच्या पहिल्या महिला महापौर अॅनी हिडॅल्गो यांनी शहराला १५ मिनिटांचे शहर बनवण्याच्या प्रतिज्ञेचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलले. या ठरावांतर्गत पॅरिसमध्ये सायकलिंग आणि वॉकिंगला प्रोत्साहन दिले जात आहे, तर कारचा वापर कमी केला जात आहे. गाड्यांच्या वाढीमुळे शहरांना रहदारीच्या सोयीसाठी अनेक रुंद रस्ते बनवावे लागतात, त्यामुळे शहराला जमीन, रहिवाशांच्या गरजा उदा. उद्याने यांऐवजी रस्त्यांवर खर्च करावा लागतो. रस्ते बांधणीमुळे अनेकदा जमिनीची किंमत वाढते आणि सर्वसामान्यांना ती विकत घेता येत नाही. यामुळे लोकांना दूर जाऊन राहावे लागत आहे. मात्र, रोजगारासाठी त्यांना शहराच्या मध्यभागी बांधलेल्या दुकाने व कार्यालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे शहरांची त्रिज्या सहसा वाढते आणि अधिक लोकांना लांब अंतरावरून प्रवास करून यावे लागते. आता भारताबद्दल बोलूया. आपली छोटी शहरे आधीच १५ मिनिटांची शहरे आहेत, कारण तिथे कोणत्याही ठिकाणी १५ मिनिटांत पोहोचता येते. पण, वाढत्या विकासाबरोबर ही शहरेही हळूहळू गाड्यांच्या गराड्यात येऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा विकास करताना अधिक रस्ते बांधण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून समाजातील सर्व घटकांनाही त्याचा वापर करता येईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
पार्थ लोया, माजी विद्यार्थी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले loya.parth@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.