आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:ते, ती, तो आणि आपला समाज... ( भाग २)

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन भिन्नलिंगी व्यक्तींमधली स्त्री ही हजारो वर्षांपासून पुरुषाच्या सत्तेचे भक्ष्य ठरली. पुरुषाने स्वतःच्या सोयीसाठी सत्तेचा वापर करुन तिचा उपभोग घेतला. कुटुंबाची सेवा, अपत्य संगोपन आणि पुरुषांची शारीरिक, लैंगिक गरज भागवणे एवढीच तिची कर्तव्ये ठरवली गेली. त्याचबरोबर पुरुषांची केवळ लैंगिक गरज भागवणाऱ्या एका विशिष्ट स्त्री समुहाचीही पुरुषांनी व्यवस्था केली आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या संपूर्ण समाजानेच या समुहाला ‘वेश्या’ म्हणत व्यवस्थेपासून दूर ठेवलं. गृहिणी, बाहेरख्याली, वेश्या, विधवा, परितक्त्या, हिजडा या सगळ्या स्त्रिया या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या शोषित आहेत. लिंगाधारित भेदभावाचा बळी ठरलेल्या एलजीबीटीक्यू व्यक्ती समूहातल्या पारलिंगी व्यक्तींना तर ‘तृतीयपंथी’, ‘किन्नर’ नावांनी ओळखले आणि हिणवले गेले. मग साहाजिकच अशा समुहाचा, व्यक्तीचा उल्लेख हा साहित्यात कुणाला तरी अपमानित करण्यासाठी आणि कर्तबगार नसलेला, नामर्द, नपुंसक, षंढ अशा अवहेलनात्मक शब्दांमधून केला गेला. आत्ता परवाच सोशल मीडियावर एक लेख वाचला. त्यात काही वाक्ये, ‘आम्हाला माफ करा. आमचे रक्त सळसळत नाही, आम्ही षंढ झालो आहोत’.. अशा आशयाची होती. युद्ध मारामारी म्हणजे मर्दुमकी. नाकर्तेपणा म्हणजे षंढ असणं ही संकल्पना वापरताना ज्या समुहाविषयी आपण बोलतो त्यांच्या व्यक्ती असण्याचंच अवमूल्यन आपण करतो आहोत, ही जाणीव समाज म्हणून आपल्या लक्षात येत नाही. राजकारण, समाजकारण आणि साहित्यात स्त्रीविषयक बोलताना सन्मानाची भाषा वापरली पाहिजे तशीच ती LGBTQ समुहातल्या प्रत्येक व्यक्तीविषयीसुद्धा वापरली पाहिजे. सामान्यपणे स्त्री-पुरुष आकर्षणाची जी भावना नैसर्गिक म्हणून सहजमान्य आणि सहजसुंदर असते त्याच सहजतेने LGBTQ समुहातील व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक भावनाही सहज, नैसर्गिक असतात हेसुद्धा मान्य करता यायला हवं. हिंदी कवी धर्मेश ‘देह’ या आपल्या कवितेत म्हणतात... मुझे नहीं मालूम देह किसी भाषा का सबसे सुंदर शब्द है या नहीं। हाँ मुझे इतना मालूम है कि तुम्हारी देह मेरी भाषा का सबसे सुंदर शब्द है । तुम्हारी देह जिसमें बसी हैं मेरी इच्छाएँ, वासनाएँ, कल्पनाएँ । मैं इस देह में समा जाना चाहता हूँ । ये देह जिसके नमक का सुवाद मेरी ज़ुबान पे हमेशा के लिए चढ़ गया है । जिसकी बू मेरी आत्मा में जा बसी है। त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. भीक मागावी लागली. त्यांना सर्वसामान्य माणसांसारखं हाताला काम न मिळाल्यामुळे उपेक्षेचं, अवहेलनेचं आणि वेदनेचं वंचितांसारखं जगणं आजही जगावं लागतं. त्यातूनच त्यांचा एक स्वतंत्र समूह उदयाला आला. मग पोट भरण्यासाठी रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी टाळी वाजवून भीक मागणं, लग्न, बारसं अशा प्रसंगी नृत्य करून चार पैसे मिळवणं हेच त्यांचं जीवन बनलं. त्यांना मन आहे, भावना आहेत, त्यांचेही स्वतंत्र जीवन आहे ही जाणीव समाजातल्या फार कमी स्त्री-पुरुषांना असते. या समूहालाही मन आहे, भावना आहेत, त्यांचेही स्वतंत्र जीवन आहे या जाणिवेतून त्यांच्या हक्कांची, स्वातंत्र्याची चळवळ देशात उभी राहिली. मी हिजडा बसत नाही तुमच्या साच्यात...! मला फळता येत नाही व मला झडता येत नाही, तुमच्या दंडेलशाही सडक्या साच्यात म्हणून मी नाही सामावत. म्हणून माझं बंड पुकारते तुम्ही थोपटा दंड, मी माझी टाळी तुमच्या तोंडावर वाजवून तुमच्या बेगडीपणाला झुगारते... - शमिभा स्त्री आणि पुरुषाच्या वयात येतानाच्या हळूवारपणे उलगडत जाणाऱ्या प्रेमभावना मुख्य प्रवाही कवितेत जागोजागी व्यक्त झालेल्या दिसतात. परंतु LGBTQ समुहातल्या व्यक्ती, त्यांच्या भावना, त्यांचे शारीरिक संबंध अनैसर्गिक, अनैतिक, लाजिरवाणे आहेत, अशी समाजधारणा असल्यामुळे त्यांच्या भावना समजून घ्याव्या एवढेही कुणाला वाटले नाही. साहित्यातली वर्णने तर दूरची गोष्ट. भारतात विविध कारणांवरून समाजात भेदभाव आहेत. हे भेदभाव मिटवण्यासाठी दलित, आदिवासी, स्त्रीवादी, शेतकरी, कष्टकरी अशा विविध समूहांच्या चळवळी निर्माण झाल्या. तशाच पारलिंगी समूहाच्या चळवळींचा जन्म झाला. मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या वंचित समूहाच्या प्रश्नांना वाचा फोडली. न्याय मागितला. न्यायालयानेही या वर्गाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं आणि स्त्री, पुरुष या लिंगांबरोबरच पारलिंगी हे एक लिंग अस्तित्वात असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अनेक चळवळी पुढे आल्या. त्यातूनच स्त्रीवादी, वंचित, भटक्या समुहाविषयी लिहिणारे साहित्यिक पुढे आले. ट्रान्सजेंडर वर्गातल्या स्त्रिया वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षापर्यंत पुरुष म्हणूनच आपल्या घरात आणि समाजात वावरतात. नैसर्गिक लिंग वाढीच्या काळात त्यांच्यामध्ये हा बदल जाणवतो आणि पुरुषाची स्त्री झाल्याचा वरकरणी भास होतो. यालाच इंग्रजीत ‘ट्रान्सजेंडर’ आणि मराठीत पारलिंगी असा शब्द वापरला जातो. शरीरात होणाऱ्या बदलासोबतच भयंकर मानसिक गोंधळ आणि बाहेरच्या जगात होणाऱ्या कुचंबणेसोबत त्या लढत असतात, परंतु त्यांचा हा भावनिक कल्लोळ आणि कुटुंब-शाळा-समाज यांच्याकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीने होणारा मनस्ताप, आत्मक्लेश आतापर्यंत कधीच कुठल्या कवितेतून वा गीतातून व्यक्त झाला नव्हता किंवा घर, कुटुंब, मित्र-मैत्रिणींकडून अपवादाने मिळालेली सामंजस्याची वागणूक असेल तर ती सुध्दा सामाजिक विलगीकरणामुळे त्यांना कधी, कुठे व्यक्त करता आली नव्हती, परंतु आता हळूहळू ही परिस्थिती बदलते आहे. शिक्षणामुळे येणारी प्रगल्भता, कौटुंबिक सामंजस्य यामुळे येणारी आत्मसन्मानाची जाणीव लेखनातून व्यक्त होऊ लागली आहे.

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...