आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Third World War To Be Fought Between Rajasthan And Vidarbha ..! Nitin Thorat Write Article On Divya Marathi

अनलॉक:राजस्थान अन् विदर्भामधीच होणार तिसरं महायुद्ध..!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘युक्रेन आणि रशियामधी सुरूहे ते युद्ध नाय.. ती फकस्त रंगीत तालीमहे. कारण तिसरं महायुद्ध पाण्यावरनं होणार, असं कुठल्या तरी शास्त्रज्ञानी म्हणून ठेवलंय. मी सांगतो, खरं तर तिसरं महायुद्ध राजस्थान अन् विदर्भामधीच होणार. लिहून ठेव माझा शब्द..’ असं म्हणत राजाभाऊ मागं सरकले. राजाभाऊ वजनानं एेंशी किलो होते. ते जरा माझ्या आवाक्यात असते ना, तर या पाराखालीच गाडलं असतं, असा विचार करत मी बळजबरी, कसनुसं हसत त्यांच्याकडं पाहू लागलो... ब ऱ्याच दिवसांनी पिंपळगावला गेलो होतो. शेतातली जरा कामं होती. ती निपटली अन् पोलिस पाटलाची वाट बघत ग्रामदैवताच्या देवळापुढच्या वडाखाली बसलो. ‘काय नितीनराव, लय दिवसांनी येणं केलं?’ असं म्हणत राजाभाऊ ढेकर देत पाराखाली सावलीला बसले.

‘हां.. ते जरा विहिरीच्या मोटरीनी काम काढलं होतं म्हणून आलो होतो.’ तसे राजाभाऊ म्हणाले, ‘एवढं नका घाबरू नितीनराव. तिसऱ्या महायुद्धाचा आपल्या गावावं काय परिणाम होणार नाय.’ तसा मी नीट बसत म्हणालो, ‘असा कसा होणार नाय राजाभाऊ? तेल महाग होणार, गहू महाग होणार, अशा बातम्या दाखवत्यात की..’ राजाभाऊंनी माझ्याकडं पाहत हसत हसत नकारार्थी मुंडी हलवली आणि खिशातून मोबाइल काढत ढवळेमामा आणि गिरणीवाल्या शंकऱ्याला बोलावून घेतलं.

राजाभाऊंनी बोलावलं म्हणून दोघंही पाच मिनिटांत पाराखाली हजर. तसे राजाभाऊ ढवळेमामाकडं बघत बोलू लागले, ‘हे नितीनराव. लेखकहेत. हे म्हणत्यात की त्या युक्रांत अन् रशियाच्या युद्धामुळं तेलाची दरवाढ होणारंय.’ तशी मी दुरुस्ती करत म्हणालो, ‘राजाभाऊ, युक्रांत नाही, युक्रेन नाव आहे त्या देशाचं.’ ‘आवं गपाहो तुमी. पुण्यात राह्यला गेले की लागल्या दुसऱ्यांच्या चुका काढायला. युक्रांत म्हणलं काय अन् युक्रेन म्हणलं काय, तुमच्या घरावर नाय ना बॉम्ब टाकणार ते?’ मी गप बसलो. राजाभाऊंनी तोंडात तंबाखूचा बार भरला आणि म्हणाले, ‘तुम्हाला सांगू का नितीनराव, मुळात हे युद्ध नाहीच. हा दुनियेला यड्यात काढायचा डाव आहे..’

मला त्यांच्या बोलण्याचं कुतूहल वाटलं. तसे ते पुढं बोलू लागले, ‘२०२३ च्या उन्हाळ्यात रशियात ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागणारहेत. शिवाय, दिवाळीच्या टायमाला कारखान्यातल्या पोटनिवडणुका लागणारेत. त्यासाठी हे सारं गौडबंगाल रचलयं.’

पायताण काढून राजाभाऊचं थोबाड सडकावं, असं वाटत होतं. पण, राजाभाऊंच्या हातातलं दहा तोळ्याचं ब्रेसलेट आणि वडाच्या सावलीला लावलेली त्यांची बुलेट पाहून मी शांत झालो. तसाच शांत सुरात म्हणालो, ‘चेष्टा करताय ना तुम्ही माझी राजाभाऊ?’ तशी लांब पिचकारी मारत राजाभाऊ म्हणाले, ‘आरं बाबा, नॉलेज दिल्यानं वाढतं, म्हणून तुला आतल्या खबरा देतोय. आता मला सांग, तिसरं महायुद्ध पाण्यावरून होणारंय हे तर तू ऐकलं असंलच ना?’ मी होकारार्थी मान डुलवली. तसे राजाभाऊ बोलू लागले, ‘मग त्या दोन्ही देशांची पाण्याची कुठं अडचण हाये का? रशियातली लोकं यात्रेच्या टायमाला पाणीपट्टी भरत्यात. प्रत्येकाच्या घरात ग्रामपंचायतीचं नळ कनेक्शनय. युक्रेनमधीपण जलसंधारणाची कामं झाल्यात. तसंच तिथल्या कोरडवाहू जागेत ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ प्रकल्प जोरात सुरुहे. मग पाण्याचा प्रश्नच नाय तर ते युद्ध कशापायी करत्यान?’

राजाभाऊंच्या लॉजिकचं मला नवल वाटलं. ढवळेमामा आणि गिरणीवाला शंकऱ्या तर राजाभाऊंनी काहीतरी अगाध ज्ञान सांगितल्यासारखं कमालीच्या भक्तिभावानं त्याच्याकडं पाहत होते. मी म्हणालो, ‘अहो, पण ते एकमेकांवर बॉम्ब टाकताहेत. माणसं मरताहेत. शहरं उद्ध्वस्त होतायेत. टीव्हीवर बातम्या येताहेत युद्धाच्या, ते काय तुम्हाला दिसत नाय का?’ तसे राजाभाऊ समजावण्याच्या भाषेत बोलू लागले, ‘तुम्हाला काय वाटलं नितीनराव, ग्रामपंचायत इलेक्शन एवढं सोपं असतंय व्हय? हितं घरटी माणूस कुणाला मतदान करतोय तपास लागतो. तुमच्यासारख्या विधानसभा, लोकसभेसारखा खेळ नसतोय ग्रामपंचायतीत..’

‘म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, युक्रेन आणि रशियामध्ये ग्रामपंचायतीच्या इलेक्शनवरून युद्ध सुरू आहे?’ माझ्या या प्रश्नावर राजाभाऊंनी ढवळेमामाच्या पाठीवर थाप मारली अन् म्हणाले, ‘आत्ताशी याला आपला मुद्दा समजला मामा. मगाचपासून सांगतोय की, युक्रेनच्या हद्दीतले दोन वार्ड रशियाला त्यांच्या हद्दीत पाहिजेत. कारण तिथं झालीया प्रभागरचना. अन् त्या प्रभागरचनेमुळं पंतप्रधान बादलीभर पुतीनच्या प्यानेलच्या मतावर परिणाम होतोय. म्हणून आमचा वार्ड आम्हाला द्या म्हणून त्याच्यात भांडणं लागल्यात, तर हा म्हणतोय ते युद्धहे..’

पोलिस पाटील कधी येणार आणि राजाभाऊच्या तावडीतून कधी सुटणार, असा विचार करत मी घड्याळाकडं पाहिलं. तसे राजाभाऊ म्हणाले, ‘नितीनराव, तुम्हाला सांगू का.. पाण्यावरून युद्ध कधी होणार अन् कुठं होणार?’ राजाभाऊंनी ढवळेमामा अन् गिरणीवाल्या शंकऱ्याकडं पाहिलं. शंकऱ्या म्हणाला, ‘राजाभाऊ, तेबी सिक्रेट सांगून टाका ह्याला. कव्हर आपल्या तिघांतच ठेवायचं?’ तसे राजाभाऊ हळूच पुढं सरकले अन् इकडं तिकडं पाहू लागले. ‘आरबीआयचं नोटा छापायचं मशीन माझ्या घरात आहे..’ असं काही सांगतात की काय, असं मला वाटायला लागलं. तसे राजाभाऊ हळुवार आवाजात एकदम गुपचूप म्हणाले,

‘२०२९ ला तिसरं महायुद्ध होणार अन् तेबी विदर्भ अन् राजास्थानात होणार. लिहून ठेव माझा शब्द,’ असं म्हणत राजाभाऊ मागं सरकले. राजाभाऊ वजनानं एेंशी किलो होते. ते जरा माझ्या आवाक्यात असते ना तर या पाराखालीच गाडलं असतं, असा विचार करत मी बळजबरी, कसनुसं हसत त्यांच्याकडं पाहू लागलो. तसे ढवळेमामा म्हणाले, ‘बघा नुसतं ऐकून शांत झाले हे लेखक. २०२९ ला तिसरं महायुद्ध कसं काय होणार अन् विदर्भात नि राजस्थानातंच का होणार विचारा की..’ आता मी मनातल्या मनात पोलिस पाटलाच्याही नावानं शिव्या देऊ लागलो होतो. पण, हाती काही पर्याय नसल्यानं नाइलाजास्तव म्हणालो, ‘सांगा की राजाभाऊ, युद्धाचं हे टायमिंग कसं काय?’ तसे राजाभाऊ भाव खात इकडं तिकडं पाहू लागले. मग म्हणाले, ‘२०२९ ला पृथ्वीचं तापमान दोन डिग्रीनी वाढणारंय. त्यामुळं विदर्भ अन् राजस्थान दोन्हीही भाग होरपळून निघणार..’ तसं त्यांना थांबवत म्हणालो, ‘अच्छा, म्हणजे त्या दोन्ही ठिकाणचं पाणी संपणार म्हणून ते भांडणार का?’ तसे राजाभाऊ चिडून म्हणाले, ‘जरा सगळं ऐकत जा की हो. दोन्ही ठिकाणचं पाणी संपल्यावर ते एकमेकांशी कशाला भांडतील? ज्यांच्याकडं पाणीय त्याच्याशी भांडतील ना? थोडा तरी डोक्याचा वापर करत जा की.. देवानं डोकं फकस्त टोपी घालायला दिलयं का?’

राजाभाऊ उचकले तसा मी शांत बसलो. ढवळेमामा म्हणाले, ‘समोरचा माणूस आपल्यापेक्षा जास्त हुशार असला की आपण ऐकायचं काम करायचं असतं लेखकराव.’ मी होकारार्थी मुंडी हलवली. तसा गिरणीवाला शंकऱ्या म्हणाला, ‘सांगा राजाभाऊ, तुम्ही सांगा. अशी अडाणी लोकं आपल्याला काय आज भेटल्यात व्हय तवा?’ पोलिस पाटलानं येताना बंदूक आणावी. नाय या तिघांना गोळ्या घातल्या, तर नावाचा नितीन थोरात नाय असं मनात येत होतं. पण, आवंढ्याबरोबर रागही गिळत होतो. राजाभाऊ बोलू लागले, ‘पृथ्वीचं तापमान वाढल्यानं विदर्भात नि राजस्थानातबी लय उन्हाळा पडणार. पण, राजस्थानाचा प्लस प्वाइंट हा असतोय की त्यांच्याकडं रात्रीची थंडी पडती. कारण त्यांच्याकडं वाळू असती. तर ती वाळू चोरण्यासाठी विदर्भ राजस्थानवर हल्ला करंल. म्हणजे विदर्भानी वाळू चोरून आणली, तर तो बाकीच्या राज्यांकडनं वाळूच्या बदल्यात पाणी घेऊ शकतो..’

राजाभाऊ असं म्हणाले आणि एक भुवई वर करत माझ्याकडं बघू लागले. मी शांतच होतो. ‘म्हणून २०२९ मध्ये राजस्थान अन् विदर्भात युद्ध होणार नि त्याचं कारण पाणी असणार! आता समजलं का?’ राजाभाऊंचं वाक्य संपलं तसा एक शब्द न बोलता मी तिथून उठलो आणि भरउन्हात पोलिस पाटलाच्या घराकडं तडातडा चालत निघालो. ह्या उन्हाच्या झळया परवडल्या, पण अजून थोडा वेळ राजाभाऊंचं लॉजिक ऐकत बसलो तर आपला मेंदूही भाजून निघायचा या भीतीनंच मी तिथून पळ काढला.

नितीन थोरात nitin.thrt@gmail.com संपर्क : 8888849567

बातम्या आणखी आहेत...