आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • This Country Should Be For Those Who Live ...| Article By Dr. Vrinda Deshaoande Joshi

मधुरिमा स्पेशल:हा देश जगणाऱ्यांचा व्हावा...

प्रा. डॉ. वृंदा देशपांडे-जोशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या औरंगाबादेतील ‘वैष्णवी’ने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येला नैराश्य, शिक्षणातील अपयश, अपेक्षांचं अवास्तव ओझं असे अनेक कंगोरे असले तरी वैष्णवीने आयुष्य संपवण्याचा निर्णय अत्यंत शांत मन:स्थितीत घेतला हे नाकारता येणार नाही. हे नेमके कशाचे निदर्शक आहे? घटनेच्या अनुषंगाने एक आई, समाजाचा एक घटक आणि शिक्षण क्षेत्रातील एक जबाबदार प्रतिनिधी या विविध दृष्टिकोनातून केलेले भाष्य...

२७ मार्चच्या दैनिक दिव्य मराठीमधील ‘वैष्णवी’च्या आत्महत्येची बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. माझ्यातला माणूस हळहळला, आई पार आतून कळवळली आणि माझ्यातला प्राध्यापक चिंताग्रस्त झाला. कारण हा प्रश्न होता शिक्षण क्षेत्रात तथाकथित अपयश आलेल्या एका मुलीने जाणीवपूर्वक स्वतःचे आयुष्य संपवण्याचा.

‘आत्महत्या’ हा आता तसा नवीन किंवा धक्कादायक बातमीचा प्रकार खरोखर राहिलेला नाही. दुर्दैवाने ‘आत्महत्येच्या बातम्या ऐकणे’ आपल्या सवयीचा भाग व्हायला लागलेला आहे. प्रेमभंग झाल्यामुळे, कर्ज वाढल्यामुळे, मुलीचं लग्न होत नाही म्हणून, संपत्तीच्या वाटणीमुळे, प्रतिष्ठा धुळीस मिळाल्यामुळे अशा अनेकविध कारणांनी माणूस स्वतःला संपवतो. कधी गळफास घेऊन, कधी विष पिऊन, कधी रेल्वेखाली स्वतःला लोटून देऊन किंवा अन्य काहीही प्रकाराने. इतक्या कारणांनी आणि इतक्या ठिकाणी आत्महत्या होतात की या माणसाला समजवावं कसं आणि सावरावं कसं, हा समाजापुढचा एक फार मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे. आत्महत्येची कारणे काहीही असोत, यामागचे सूत्र असते – नैराश्याचे, अपयशाचे, अविश्वासाचे, असंतुलितपणाचे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो कधी रागाच्या भरात, कधी नैराश्याच्या भरात हे निर्णय घेतले जातात. परंतु वैष्णवीने लिहिलेल्या पत्रावरून स्पष्टपणे लक्षात येते, तिने घेतलेला निर्णय अतिशय थंड डोक्याने, जाणीवपूर्वक, स्वतःच्या चुकीची आणि त्या चुकीच्या परिणामांची पूर्णपणे कल्पना असूनही हा निर्णय तिने घेतलेला होता. अर्थात वैष्णवी युवा पिढीचे एक प्रातिनिधिक रूप आहे. तिने उचललेले पाऊल टोकाचे आहे. मात्र इतक्या ठामपणाने कोवळ्या कळ्या स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेऊ शकत असतील तर आयुष्यातले ताण सहन करण्याची युवा पिढीची क्षमता उत्तरोत्तर कमकुवत होत चालल्याचे ते लक्षण आहे.

ताण सहन करण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे याची कारणं काय, हा विचार करायला लागलं तर स्वाभाविकरीत्या लक्षात येतं बदलती जीवनशैली, बदलता जीवन दृष्टिकोन. मुलांना काही कमी पडू नये, त्यांना कशाचा त्रास होऊ नये आणि आताच्या काळात तर त्यांच्याबरोबर आम्हालाही त्रास होऊ नये, अशी प्रवृत्ती वाढलेली दिसते. लहानपणापासून आपण मुलांना जे लसीकरण करतो त्या लसीकरणामध्ये ‘पेनलेस व्हॅक्सिन’ देण्याकडे आजकालच्या पालकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसतो. खरं म्हणजे निसर्गतः सामान्य पद्धतीने जन्म न होता सिझेरियन करून जी मुलं बाहेर काढली जातात त्या मुलांची निसर्गाशी टक्कर घेण्याची क्षमता आधीच कमी झालेली असते. त्यात पेनलेस जीवनाला प्राधान्य देऊन आपण त्रास सहन करण्याच्या या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी करत चाललेलो आहोत. एकत्र कुटुंब पद्धतीच्या अभावी, सुरक्षितता, समाधान, ताणतणाव, भांडण या साऱ्यांनाच पारखे होऊन आयुष्यातील निकोपता आपण हरवून बसलोय. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कोणीही कोणाची खिल्ली उडवत होतं, कोणी कोणाला नावं ठेवत होतं, कोणी घालून पाडून बोलत होतं आणि त्यामुळे समाजात या प्रवृत्तींना कसे सामोरे जावे याची आपसूक तयारी होत होती. आता मात्र बाहेर कोणी काही कारणाने इतकंसं जरी बोलला तरी तो ‘इगो इशू’ व्हायला लागतो आणि तो इगोला लागलेला धक्का सहन झाला नाही की माणूस आपल्या आयुष्याला धक्का द्यायला लागतो. कधी व्यसनाधीनतेच्या काठाव, तर कधी मृत्यूच्या गळ्यात गळा घालून. सगळ्यांमध्ये जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढत असतील तर आम्ही कुठेतरी मानवी आयुष्याचा मूलभूत नियम विसरत चाललो आहोत की काय असं वाटायला लागतं.

‘सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ हा मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. हे दुःख सहन करायला, पचवायला आणि दुःखावर मात करायला आम्ही शिकलं पाहिजे. पूर्वी अगदी कोणत्याही शाळेत न गेलेली माणसंसुद्धा त्यासाठी अत्यंत समर्थ होती. सुशिक्षित माणसे मात्र जेव्हा दु:खातून, संकटातून मार्ग काढून पुढे जाण्याऐवजी मृत्यूला कवटाळतात तेव्हा शिक्षणव्यवस्था ही स्वतःच फार मोठं प्रश्नचिन्ह बनून येते.

शिकलेली मुलं, शिकलेल्या मुली अस्थिरतेच्या अनेकविध कारणांनी बेचैन होतात, निराश होतात, वाममार्गाला लागतात, आत्महत्या करतात. आपल्या शिकण्याचा उपयोग काय, हा प्रश्न त्यांना पडायला लागतो. नोकरी आणि उद्योग-धंद्याअभावी येणारे आर्थिक परावलंबन त्यांना मानसिकदृष्ट्या पंगू करते. शिक्षणाने माणसाला स्वावलंबी करावे, स्वत:च्या पायावर त्याला उभे राहता यावे यात वादच नाही. मात्र शिक्षणाची बांधिलकी ही माणसाच्या मन – मनगट – मस्तकाच्या विकासाशी आहे. शिक्षणाने माणसाला शारीरिक – मानसिक – भावनिक – बौद्धिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. आणि या संपदेच्या आधारावर मग त्याला कोणत्याही परिस्थितीत आर्थिक स्वावलंबन कमावता आले पाहिजे, सन्मानाने जगता आले पाहिजे. मात्र, ‘इतकं शिकलो, आता पुढे काय करू?’ या रेडिमेड उत्तराच्या अपेक्षेत त्याची पुढची भटकंती सुरू होते. तिथे लक्षात यायला लागते, ‘हा पुस्तके शिकला, पण जीवन कसे जगायचे हे नाही शिकला’. ‘जीवन आणि शिक्षण’ यातले अंतर कमी करण्यासाठी ‘जीवन-शिक्षण’ देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आपण त्याला ‘कौशल्य विकास’ एवढा एकमेव पर्याय देतो. मग आमचे शिक्षण कामगार तयार करणारे होणार का, हा नवीन प्रश्न निर्माण होतो.

आमच्या प्रत्येक शिक्षण धोरणात ‘माणूस घडवणे’ हे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाचा तात्त्विक पातळीवर आम्ही पाठपुरावा करतो. ही तत्त्वे व्यवहारात आणायची असतात हे आम्हाला पटत नाही. मला वाटते, या प्रश्नाची खरी मेख इथे आहे. उरकून टाकल्यासारखा आम्ही शिक्षण काळात प्रत्येक गोष्टीला पर्याय देतो. आठवीपर्यंत परीक्षा नाही, परीक्षा नाही हे तत्त्व आम्ही ‘अभ्यास नाही’ या पद्धतीने राबवतो. मग पाल्य-पालक, विद्यार्थी-शिक्षक यांची नववी–दहावीत काय स्थिती होईल हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही.

शिक्षणाची ही दुर्दशा पाहता ‘न शिकलेलं बरं’ अशी मानसिकता पुन्हा येते की काय, निरक्षर समाजस्थितीचा पुन्हा एकदा पुरस्कार केला गेला तर काय, असा स्वतःलाच प्रचंड प्रमाणात दचकवून टाकणारा एक प्रश्नसुद्धा माझ्या मनाभोवती फेर धरून पिंगा घालायला लागतो. कारण तथाकथित सुशिक्षित लोकांच्या जगण्यातली हरवत चाललेली मूल्य पाहते आणि तुलनेनं कमी शिकलेली माणसं जेव्हा आपण कमी शिकलेलो आहोत हे स्वीकारून पारंपरिक मूल्यांना प्रमाण मानून जगताना पाहते तेव्हा हे प्रश्न माझ्यासमोर अगदी साहजिकपणाने उभे राहतात. ज्या वेळेला शाळा-शाळांमधून जाणीवपूर्वक मूल्यशिक्षण सुरू करावं लागलं, मला वाटतं ते प्रत्यंतर होतं समाजामधून मूल्य हरपत चालल्याचं. शिक्षणाचं क्षेत्र हे समाजापासून निराळं काढता येणार नाही. अर्थात कोणत्याच क्षेत्राचा समाजनिरपेक्ष विचार करता येत नाही. समाजातील माणसांचे गुण-दोष, समाजाच्या सर्वच क्षेत्रांत कमी-अधिक प्रमाणात दिसणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे तात्त्विक पातळीवर अतिउच्च विचार करायचा आणि प्रत्यक्ष व्यावहारिक पातळीवर हे तत्त्व आचरणात आणणे गैरसोयीचे आहे, असे जाहीर करून तत्त्वांचा बोजवारा उडवायचा, या प्रकारापेक्षा बदलत्या काळात प्रत्यक्षात काय करणे शक्य आहे, हे बघून तत्त्वांचा नवा, कालसुसंगत अर्थ प्रस्थापित करणे, अधिक सुयोग्य आहे. एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट हाती घ्यायची, आणि ती जमत नाही, म्हणून स्वत:ला दोष देत राहायचा, कुढत जीवन जगायचे, आणि वेळप्रसंगी ते स्वत:च्या हाताने संपवून टाकायचे, या प्रकाराला काय म्हणावे? कसे थांबवावे?

शिक्षण क्षेत्राला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. माझे शिक्षण मला स्वत:ची ओळख करून देऊ शकत नसेल तर जगभराची माहिती गोळा करून कचरा वाढवण्यात, मनाला अधिक गोंधळात टाकण्यात काय हशील आहे? मी काय करू शकतो, मला काय मिळवायचे आहे, त्यासाठी स्वत:ला कसे तयार करावे लागेल, स्वीकारशीलता विकसित करून परिस्थितीनुसार लवचिकता कशी बाळगावी, ठरवलेले ध्येय प्राप्त करता आले नाही, तर दुसऱ्या कोणत्या ठिकाणी पाय रोवून उभे राहता येईल, याचा स्व-शोध घेण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. अंतरीचा दिवा घासून-पुसून लख्ख ठेवता आला, तर दुसऱ्याने मार्ग दाखवावा आणि मी त्या उसन्या उजेडात चालावे, असे करण्यापेक्षा माझ्या मार्गावरचा प्रकाश मला होता आले पाहिजे. मृत्यूला कवटाळून सर्व मार्ग बंद करण्यापेक्षा मिणमिणत्या उजेडात सातत्याने चालणाऱ्याला आयुष्याचा सूर्य गवसल्याशिवाय राहत नाही, हा विश्वास शिक्षणाने जागवला पाहिजे. संपर्क : vrundavdeshpande@gmail.com

बातम्या आणखी आहेत...