आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी..? फोटोसाठी !:दोन फुलांना ओवते जशी धाग्यासंगे सुई...

प्रियंका सातपुते2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टे बलवर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सुईने पांढऱ्या धाग्यात गुलाबी फुलांचा अर्धवट गुंफलेला हार मी पाहिला. सुई, दोरा, फुलांच्या एकत्रीकरणाचा मानवी जीवनाशी असलेल्या संबंधाविषयी माझ्या मनात विचार आला आणि मी फोटो क्लिक केला. फुलांची गुंफण मानवी जीवनात जन्माअगोदरपासून मृत्यूपर्यंतची नाती सांगणारी आहे. कोणताही समारंभ फुलांनीच साजरा केला जातो. त्यामध्ये सण-वार, उत्सव-सोहळे साजरे करताना सुख-दु:ख, हार-जीत, शौर्य, एखाद्या कामाची सुरुवात-शेवट ज्या प्रसंगांनी होते, त्याची साक्ष हार-तुरे, गुच्छ-तोरण, गजरा, आकर्षक बुके इ. असतात. आपल्याकडे वेगवेगळ्या निमित्ताने फुलांच्या साथीने अनेक कार्यक्रम होतात. डोहाळेजेवणाच्या प्रसंगी गर्भवतीला पूर्णपणे फुलांनी सजवले जाते. बारशाच्या वेळी पाळण्याची फुलांनी सजावट करतात. विवाहप्रसंगी वधू-वर परस्परांना हार घालूनच सर्वांच्या साक्षीने नवजीवनाची सुरुवात करतात. कोणत्याही चांगल्या कामाची पावती हार-तुऱ्यांनीच मिळते. आयुष्यात विविध क्षेत्रांतील कामगिरीचे मोल हार घातल्याशिवाय होत नाही. थोरा-मोठ्यांचे सत्कार हे हार घालणाऱ्यांना मानसिक समाधान देणारे असते. आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती सर्वांसमक्ष घातलेल्या हारानेच प्राप्त होते. आयुष्याचा शेवटही तसा फुलांशिवाय अधुराच.. कारण जवळच्या व्यक्तीने हार घातल्याशिवाय अंत्ययात्राही पुढे जात नाही. सुई,दोरा, फुलं यांचा एकत्रित हार म्हणजे मानवी जीवनाच्या हळुवार नात्याची गुंफण होय आणि ही गुंफण आपणास माहीत आहे... दोन फुलांना ओवते जशी धाग्यासंगे सुई । दोन कुळांना गुंफते, नांदणारी माय बाई ॥ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या या ओळींनी तर सुई, दोरा, फुलं यांच्या नात्याला, स्त्रीजीवनाला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलंय. {संपर्क :priyankasatpute45@gmail.com