आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझी आई जुन्या वळणाची. त्यामुळे टिकली न लावणं तिच्या गावीही नव्हतं. कुंकू/गंध/टिकली न लावणं म्हणजे, “अमुक एक संस्कृती नाकारणं आणि अमुक एका संस्कृतीला पाठिंबा दर्शवणं’ असं तिचं साधं सरळ गणित होतं. अर्थात लहानपणापासून मी कपडेलत्ते, राहणीमान याबाबतीत गबाळीच. त्यामुळे तेव्हा टिकली लावणं/न लावणं या दोन्ही गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत. पुढे काॅलेजमध्ये जाऊ लागल्यावर अनेक वर्ग मैत्रिणी वेस्टर्न आऊटफिटसोबत पैंजण, टिकली असा पेहराव करताना पाहिल्या तर काही जणी वेस्टर्न आऊटफिटसोबत टिकली, पैंजण नसण्याविषयी विशेष जागरूक असल्याच्या दिसू लागल्या.
काॅलेजलाच असताना एक परधर्मीय मैत्रीण टिकलीचं पाकीट घेऊन लेडिज रूममध्ये टिकली लावून आरशात बघत असे. कदाचित पाहण्याची सवय नसल्यामुळे असेल, पण एरवी साधारणच दिसणारी ती, टिकलीमुळे विशेष खुलून दिसायची. ती मैत्रीण कपाळावरची टिकली ५/१० मिनिटे ठेवत असे. त्या ५/१० मिनिटांत इवलीशी टिकली तिचा चेहराच नव्हे तर मनही उजळून टाकत असे. साधं, नेहमीचं टिकलीचं पाकीट कुणासाठी आनंदाचा स्रोत असू शकतं हे पहिल्या प्रथमच जाणवलं. कालांतराने शिक्षिका पेशात आले. सुरुवातीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करू लागले, पण पंजाबी ड्रेसमध्ये, बारीक चणीच्या, बारीक टिकली लावलेल्या मला कोणी शिक्षिकाच समजेनात. विशेषतः मागच्या बाकावरची मुलं टिंगलटवाळी करतात हे जाणवायला लागले. व्यवसायानुरूप थोडासा पोक्तपणा यायला हवा हे लक्षात आलं. मग साडी नेसून आणि ठळकपणे दिसून येणारी टिकली लावायला सुरुवात केली तशी आपसूकच विद्यार्थी आदरानं, अदबीनं बोलायला लागले. टिकली लावली नाही तर विनाकारण गैरसमज व चर्चांना निमंत्रण. म्हणून ती लावण्याची सवय लागली. एरवी सगळे लाड पुरवणारा, सगळ्या बाबतीत मुभा देणारा मोठा भाऊ, आजही अजूनही (वयाच्या पन्नाशीत) माहेरी गेल्यावर, बाहेर जाताना कपाळावर टिकली नाही अशी आठवण करून देतो. तेव्हा याचा संबंध स्त्रीमुक्तीशी न जोडण्याइतकी परिपक्वता आता आलीय. यात मला जाणवते ती फक्त बहीण म्हणून वाटणारी काळजी. हौसेने वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावणारी एक विद्यार्थिनी वेगळ्या समाजात हट्टाने प्रेमविवाह करून गेली. तेव्हा टिकली नसलेलं तिचं भकास कपाळ पाहून उदास वाटलं. “आता या कपाळावर कधीही टिकली दिसणार नाही.’ हे तिचं वाक्य का कोण जाणे खूप खोलवर रुतून बसलं. साधी टिकलीच ती, पण तिच्या नसल्याने विद्यार्थिनीचं आयुष्य मात्र पार बदलून गेलं. सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन, सुधा मूर्ती, मेधा पाटकर, मंदा आमटे यांच्या टिकल्या बुद्धिमत्ता व सुसंस्कृतता यांचा अनवट संगम अधोरेखित करतात. त्यांची व्यक्तिमत्त्वेच एवढ्या उंचीची आहेत की, कपाळावरच्या टिकलीचाच मान वाढलाय असं वाटत राहत.
मागे सासरे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेले त्या वेळी थोडे दिवस रिकाम्या कपाळाच्या सासूबाईंना पाहताना धस्सं व्हायचं. त्यांचा टिकलीचा आग्रह धरण्याची भूमिका वेगळ्या पद्धतीने समोर आली आणि मग मीच त्यांना टिकली लावण्याची सक्ती केली. अशी ही टिकली वेगवेगळी रूपं व अनेकविध संदर्भ घेऊन येत राहिली. त्यामुळे जेव्हा जेव्हा टिकली या संकल्पनेला हाताशी धरून एखादं विधान केलं जातं, तेव्हा सामाजिक वातावरण ढवळलं जातं. “हिजाब नहीं तो किताब नहीं’ म्हणणं किंवा कुंकवाची सक्ती करणं या दोन्ही विचारांतील साम्यानं मन सुन्न होतं. सर्व समाजसुधारकांनी हयातभर प्राणांतिक यातना सोसून सामान्यांना सन्मानाचा मार्ग दाखवला. अनेक जण निर्भयपणे आपापल्या वकुबानुसार, मर्यादांसहित त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अशा वादग्रस्त विधान/कृतीने त्याची दिशा तर बदलत नाहीत नं ? इवल्याशा टिकलीचा संबंध आपल्या संस्कृतीशी, भावविश्वाशी, व्यक्तिमत्त्वाशी असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा टिकली वादग्रस्त होते/केली जाते तेव्हा तेव्हा मानसिक कुचंबणा होते पण त्याच वेळेस घटनेने स्त्री ला व्यक्ती म्हणून दिलेले अधिकार हिरावून घेत असल्याची जाणीव ही ठसठसत राहते.
गौरी सरपोतदार संपर्क : gaurisarpothdar@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.