आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परग्रहा’वरून पत्र:टिकली आणि बुरखा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, संध्याकाळच्या सावल्या आयुष्यावर पसरत जातात, तेव्हा तर पुरुषाला एकटेपण असह्य होते, याचा विचार आपण मागच्या लेखात केला. पण स्त्रियांचे काय? शरीर-मनाच्या गरजा फक्त पुरुषांना असतात का? कोणत्याही वयातील एकटेपण फक्त पुरुषांना खायला उठते का? ऐन तारुण्यात पुरुषाने एखाद्या स्त्रीवर अत्याचार केला तर आपले नेते, आपला समाज ‘चालायचेच’ म्हणून त्याचे समर्थन करतात. (पुरुषाकडून म्हातारपणी असे घडले तरी त्यालाही सोयीस्कर समर्थन शोधले जाते.) मात्र, ऐन तारुण्यात स्त्रीच्या हातून एखादा ‘प्रमाद घडला’, म्हणजे नवऱ्याशिवाय अन्य पुरुषाशी तिचा संबंध आला, तर किती गदारोळ उठतो! कधी ती असमंजस, अपरिपक्व वयातील किशोरी असते, जिचा फायदा जाणत्या वयातील पुरुषाने घेतला असतो. कधी नवरा दूर आहे, तो लैंगिकदृष्ट्‍या अक्षम आहे, दोघांमध्ये बेबनाव आहे किंवा ती विधवा आहे, अशा वेळी तिने स्वेच्छेने किंवा दडपणाखाली कोणाशी शारीरिक संबंध ठेवला, तर तिला कुलटा मानले जाते. पन्नाशी-साठीत लग्न करण्याचा किंवा लिव्ह-इन मध्ये राहण्याचा एकाकी पुरुषाचा निर्णय कठीण असला, तरी तो कुटुंबात आणि समाजात स्वीकारला जातो. मात्र, असा निर्णय घेणाऱ्या स्त्रियांना दीर्घकाळ समाजाचा विरोध सहन करावा लागतो. या वयात अशी साथ लाभणे, हे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना अधिक सुलभही असते, असे का घडते?

साधा विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न घ्या. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील तथाकथित उच्च जातीत विधवा, बालविधवा यांची परिस्थिती किती अमानुष होती, हे त्या काळाच्या कथा-कादंबऱ्या, चरित्रे-आत्मचरित्रे आणि वृत्तपत्रांतील सुधारक-सनातनी वाद यातून समजून येते. ज्योतिबा-सावित्रीबाई असोत की आगरकर-कर्वे, त्यांच्या चळवळीचा लाभ उच्च वर्गातील स्त्रियांना मिळाला आणि त्यांची परिस्थिती पार बदलली. मात्र, महाराष्ट्रात आिण अन्य राज्यांत अनेक मध्यम जातीतील विधवा स्त्रियांची परिस्थिती आजही दारुण आहे. त्यांना पुनर्विवाहाचा हक्क सोडाच, स्वतंत्रपणे जगण्याचाही हक्क नाही. सासरी किंवा माहेरी, आश्रिताचे जीवन त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना जगावे लागते. वृंदावनसारख्या धार्मिक स्थळी गेले तर या प्रश्नाचे विराट रूप आपल्या ध्यानात येऊ शकते. स्त्रीने नेहमी देवी बनूनच राहायचे, आपल्या शारीरिक वासनांचे दमन करायचे, छळ सहन करायचा, पण हुंदका उंबरठ्याबाहेर जाऊ द्यायचा नाही, ही आपली शिकवण. तिने तसे केले नाही, तर ती लगेच ‘घरबुडवी’ ठरते. हे चित्र आज बदलत असले तरी खेड्यापाड्यांत, स्वतःला खानदानी समजणाऱ्या जातीमध्ये ही समस्या अजूनही तीव्र आहे. कारण या जातीचे खानदानीपण, इतरांपेक्षा उच्च असण्याचा दावा स्त्रियांच्या दमनावर आधारलेला आहे. ‘पाट’ लावतात, ते खालचे, आमच्यात मात्र बाईचा चेहराही बाहेरच्यांना दिसत नाही’.. हा सर्वच ‘पुढारलेल्या’ मध्यम जातीच्या अभिमानाचा विषय असतो. याच मानसिकतेतून लेकीच्या सोयरिकीसाठी इतरांपुढे झुकावे लागते, म्हणून अक्कडबाज मिशांच्या काही राजपुतांनी मुलीला जन्मच द्यायचा नाही, असे ठरवले. राजस्थानमधील कित्येक गावांतून अनेक दशके वरात बाहेर गेली नाही, फक्त आत आली, हा इतिहास आहे. आपल्या नैतिकतेच्या कल्पना एकांगी आहेत, स्त्रीचे माणूसपण नाकारून तिच्यावर सर्व भार टाकणाऱ्या आहेत, दुटप्पी आहेत, निसर्गविरोधी आहेत. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली आपण त्यांचे जितके समर्थन करू, तितके आपण मागे जाऊ, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

आपला आदर्श तालिबान? मध्यपूर्वेतील अनेक राष्ट्रे, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या ‘मुस्लिम’ देशांत स्त्रियांची परिस्थिती काही दशकांपूर्वी तुलनेने बरी होती. स्त्री-पुरुष विषमता होती, पण ती अभिमानाची बाब नव्हती. स्त्रिया शिकत होत्या, विविध व्यवसायांत स्थान निर्माण करीत होत्या. बुरख्याचे प्रमाण खूप कमी होते. पण, धार्मिक पुनरुज्जीवनाचे वादळ आले आणि धर्मनिष्ठा ठळक करण्यासाठी स्त्रियांवरील बंधने कडक करण्यात आली. अफगाणिस्तानात तालिबानने मुलींच्या शाळा बंद केल्या. इराण सरकारने स्त्रिया बुरखा किंवा हिजाब वापरतात की नाही, यावर पाळत ठेवण्यासाठी नैतिक पोलिस दलाची निर्मिती केली. पण, हे सारे निसर्गक्रमाच्या विरोधात आहे, ते फार काळ तग धरून राहू शकत नाही.

या सगळ्यातून आपण काही शिकणार आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरे तर स्त्री-पुरुष समतेचा प्रश्न महाराष्ट्रात तरी इतका पुढे गेला होता की त्यावर काही चर्चा करण्याची गरज उरली नव्हती. प्रत्यक्ष कृती अधिक जोमाने कशी करता येईल, एवढाच प्रश्न उरला होता. इतर राज्ये महाराष्ट्राचा आदर्श मानत होती. अगदी उदरनिर्वाहासाठी इथे आलेल्या उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबातील स्त्रिया सारे काही स्थिरस्थावर झाल्यावर ‘आम्ही आपल्या गावी परत जाणार नाही. आम्ही आणि आमच्या मुलीबाळी इथे मोकळ्या वातावरणात वावरलो आहोत. आता आम्हाला परत जाऊन घुंघट आणि रीतीरिवाज यांचे कैदी व्हायचे नाही,’ असे सांगत असत. आता मात्र सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या स्त्रीने टिकली लावली आहे का, तिचा वेश ‘हिंदू’ आहे का, या बाबींची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे; नव्हे त्यावरून स्त्रियांना लक्ष्य करण्यात येत आहे. बरे, ज्या पुरुषांना धर्मरक्षणाची एवढी आस आहे, ते स्वतः मात्र नेहमीच परकीय वेश परिधान करून असतात. एखाद्या स्त्रीच्या टिकली न लावण्याने किंवा साडी न नेसण्याने जर एखादा धर्म किंवा संस्कृती लयाला जात असेल, तर त्या धर्म किंवा संस्कृतीत किती जोम असेल, याचा विचार करायला हवा... खऱ्या परंपरेचा पाईक, तुमचा मित्र

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...