आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक-संचित:काळ जवळिच उभा...

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं कसं होऊ शकतं? आत्ता काही वेळापूर्वी आमच्याशी बोललेला माणूस असा कसा लगेचच या जगातून निघून जाऊ शकतो? काय असतो हा प्रकार नक्की? कधी तरी लवकरच आपणही याच वाटेवरून चालत जाणार आहोत, हेही मला माहीत आहे. स्वप्नांत तर ते आणि नंतर घडणारं मी आधीच अनुभवलं आहे. त्याविषयी आता काहीच वाटेनासं झालं आहे. आपल्या आयुष्याची अनिश्चितता आणि मृत्यूचं थंड क्रौर्य आता अंगवळणी पडलं आहे. पण, तरीही...

आ पल्याच मृत्यूची स्वप्ने अनेकदा पडतात. मनातलं स्वप्नात दिसतं म्हणतात, ते खरंही असावं. बारीकसारीक गोष्टींतून जगण्याची अशाश्वतता, क्षणभंगुरत्व सतत जाणवत राहतं. तोच विचार सतत डोक्यात रुंजी घालत असतो. त्यामुळेही असेल, स्वप्नात थेट बाकीचे सगळे तपशील टाळून आपणच मरून गेल्याचं दिसत असावं. पण असंही होतं की, काहीच हासभास नसताना अनपेक्षितच एखाद्या जवळच्या सुहृदाच्या मृत्यूची बातमी धाडकन् कानांवर येऊन आदळते. आपण सुन्न होऊन जातो. विश्वासच बसत नाही. असं कसं होऊ शकतं? इतकी अनिश्चितता कशी काय असू शकते आपल्या जगण्याविषयी? आत्ता काही क्षणांपूर्वी जिवंत होता, आपल्यापासून दूर अंतरावर कुठे तरी असला, तरी अस्तित्वात होता. या पृथ्वीवर श्वास घेत होता. बोलत-चालत होता. आपल्याशी आणि आपल्यासारख्या अनेकांशी या त्या माध्यमातून संपर्कात होता. आणि लगेचच आता त्याच माध्यमांतून कळतंय की, तो आता या क्षणी जिवंत नाहीय. संपून गेलंय त्याचं अस्तित्व. शून्य होऊन गेलंय सगळं. वर्तमानातलं असणं संपून भूतकाळ होऊन गेलाय तो. ‘आहे’ नाही, ‘होता’ म्हणावं लागतंय आता...

किती भयंकर आहे हे सगळं पचवणं. मनाला समजावणं. पण, अलीकडं असं सातत्यानं होताना दिसतंय. कदाचित या अशाश्वततेचं एक छुपं भय किंवा त्या भयाचं एक अदृश्य गडद सावट आपल्याही मनाला वेढून असावं. तेच स्वप्नात दिसत असावं. आपण मेल्यावर कुणाकुणाच्या काय काय प्रतिक्रिया येतील, सोशल मीडियावर लोक कसे रिॲक्ट होतील वगैरे सगळं जणू काही आधीच आपल्याला दिसलेलं असतं. हे असं आता कधीही घडून येऊ शकतं, आपण कितीही अनिश्चितता वगैरे म्हणत असलो, तरी हे असंच घडणार आहे, हेही आपण जाणून असतो.

मृत्यूविषयी एक प्रकारचं ‘लव्ह अँड हेट’ प्रकारातलं नातं माझ्या तरी मनात आहे. फारसं काही कळत नव्हतं त्या वयापासूनच अगदी जवळच्या नात्यागोत्यातले किंवा गावातले, शेजारपाजारचे, ओळखीच्या घरांतले मृत्यू पाहत आलो आहे. त्यातले काही मृत्यू खरोखरच धक्कादायक होते. तो माणूस आता जिवंत नाहीय, यावर विश्वास ठेवणं जड जावं असे होते. थोडीफार समज आल्यानंतरच्या वयातला मी पाहिलेला एक मृत्यू अशा प्रकारांतलाच होता. आजही तो अनुभव विसरू म्हणताही विसरता येत नाहीय.

मला आठवतंय, आम्ही राहत होतो त्या भागात एक जुनापुराणा, भला मोठा वाडा होता. शाळकरी दिवसांत गोष्टीच्या पुस्तकांतून वाचलेला असतो ना, अगदी तसाच. ‘भुताटकीचा वाडा’ वगैरे म्हणता येईल असा. वाड्याच्या आसपास अनेक प्रकारची दाटीवाटीनं वाढलेली भलीमोठी झाडं. आम्हा मुलांचं ते लपाछपीसारखे खेळ खेळण्याचं ठरलेलं ठिकाण. बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी तर आमचा मुक्काम अक्षरशः दिवसभर तिथं असायचा. तिथला राखणदार बाज्याकाका बाकी लोकांना मज्जाव करत असला, तरी आम्हा मुलांना मात्र तिथं धुडगूस घालायलाही कधी अडवत नव्हता. उलट जीव लावला होता त्यानं आम्हाला. तिथं गेल्यावर नेहमीच आम्हाला चिकू, पेरू, चिंचा, आंबे, जांभळं असं जे काही आढीत वा झाडांवर असेल, ते काढून खायलाही तो देत असे. एका रविवारी नेहमीप्रमाणे आम्ही तिथं हुंदडत होतो. इतक्यात त्याच्या काय मनात आलं ते? तो म्हणाला, ‘आज नारळ पाडूचे आसत रे पोरांनुं! चला, तुमकां आडसारां (शहाळी) काडून दितंय.’ बोलता बोलताच तो वाड्याच्या मागेच असलेल्या परड्यांतल्या एका माडावर चढला. वरून काही जून झालेले नारळ आणि काही कोवळे नारळ – शहाळी त्याने खाली टाकली. मग तिथल्या एकेका माडांवर चढून तो नारळ पाडत राहिला. उंचावरून पाडलेले नारळ इकडे-तिकडे विखुरलेले जात. ते एकत्र करायचं काम आम्ही करत होतो. नारळ पाडण्याचं काम संपल्यावर तो हातातल्या कोयत्याने शहाळी फोडून देणार आहे, हे माहीत होतं. त्यामुळे पाडप संपवून तो येण्याची वाट बघत आम्ही बसलो होतो.

इतक्यातच आमच्यापैकी एकाचं लक्ष बाज्याकाकाकडं गेलं. नारळाच्या झाडावर उतरून तो माडाच्या खोडालाच टेकून बसला होता. तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानकच तो भुईवर कलंडला. ‘अरे, अरे, बाज्याकाका बघा, कसो करतां..’ माझा मित्र ओरडला. सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलं. बाज्याकाका जमिनीवर गडाबडा लोळत, विव्हळत होता. आम्ही धावतच त्याच्याजवळ गेलो. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अंग थरथरत होतं. डोळे विचित्र दिसत होते. त्याची ती अवस्था बघून आम्ही सगळेच घाबरलो होतो. कुणालाच काही सुचत नव्हतं. एक जण गावाच्या दिशेने ओरडत धावत गेला, ‘बाज्याकाका कसां तरी करतंत. त्येंका काय तरी व्हता. जिवाक बरां दिसनां नाय...’ दुसऱ्या एकाने परड्यातल्या विहिरीतून कळशीभर पाणी काढून ती कळशी लगबगीनं बाज्याकाकाच्या तोंडावर, डोक्यावर ओतली. ज्याला जे सुचेल ते प्रत्येक जण करत होता. पण, बाज्याकाकाचं विव्हळणं थांबलं नाही. पुढच्या काही क्षणांतच त्याने डोळे फिरवले. हात-पाय ताठ केले. आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही घाबरून त्याला हाका मारत राहिलो होतो, ‘बाज्याकाका.. बाज्याकाका.. तुका काय होतां? उठ ना रे, असो काय करतंस, बाज्याकाका?’ काही वेळातच गावातले जाणते लोक तिथं येऊन पोचले. त्यांच्या बोलण्यातून कळलं, बाज्याकाका आता जिवंत राहिला नव्हता! असं कसं होऊ शकतं? आत्ता काही वेळापूर्वी आमच्याशी बोललेला माणूस असा कसा लगेचच या जगातून निघून जाऊ शकतो? काय असतो हा प्रकार नक्की? काहीच कळेनासं झालं होतं.

आत्येचं, वडिलांचं, आणखी काही नातेवाइकांचं, सहकाऱ्यांचं, अगदी जवळच्या काही मित्रांचं, अनेकांची मरणं आजवरच्या आयुष्यात पचवत आलो. कधी तरी लवकरच आपणही याच वाटेवरून चालत जाणार आहोत, हेही मला माहीत आहे. स्वप्नांत तर ते आणि नंतर घडणारं मी आधीच अनुभवलं आहे. त्याविषयी आता काहीच वाटेनासं झालं आहे. आपल्या आयुष्याची अनिश्चितता आणि मृत्यूचं थंड क्रौर्य आता अंगवळणी पडलं आहे. तरीही एखाद्या कविता महाजनची, गणेश वसईकरची, राहुल बनसोडेची, आणखी कुणा कुणा तरुण मित्रांची बातमी अनपेक्षित कानी येते आणि मन चरकतं. अस्वस्थता टाळत येत नाही. तुकोबांचे शब्द कानामनात वाजत राहतात... काळ जवळिच उभा पाहीं। नेदि कोणांसि देऊं कांहीं...खरंच आहे रे, काहीच टाळता येत नाही.. हे अस्तित्व गिळंकृत करायला टपलेला हा काळ तर नाहीच नाही!

प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com