आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Times Have Changed; But 'this' Question Remains... | Article By Dr. Savita Bahirat

फोर्थ डायमेन्शन:काळ बदलला; पण ‘हा’ प्रश्न कायम...

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये भरपूर कामाच्या व्यापात असताना दुपारच्या वेळी अचानकपणे मोठा पाऊस सुरू झाला आणि मनात पहिला विचार आला, तो घरी वाळू घातलेल्या कपड्यांचा...! सकाळी सकाळी घरी दोरीवर धुतलेले कपडे वाळू घातलेले होते. ते एव्हाना वाळले असतील व आता मोठा पाऊस आला, असे म्हणत घरी गेल्यावर पुन्हा तेच काम करावे लागणार या गोष्टीने जरा चीडच आली. ऑफिसमध्ये पावसाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या होत्या. पुरुष कर्मचारी या भागात एवढा पाऊस झाला, त्या भागात तेवढा पाऊस झाला. तिकडे अमुक भागात तर पाऊसच नाही. अगदी पार शेजारच्या राष्ट्रातील पुराचा आढावा घेईपर्यंत त्यांच्या चर्चा सुरू होत्या. पण त्या चर्चांमध्ये स्त्री-पुरुषांचे दोन भिन्न विचारांचे गट ढळढळीतपणे दिसून आले. एक गट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पावसासंदर्भात चर्चा करणारा आहे, तर दुसरा स्त्रियांचा गट माझ्याचप्रमाणे विचार करणारा होता. कुणाचे कपडे बाहेर वाळू घातलेले होते, कुणाचा काहीतरी वाळवणाचा पदार्थ सहज ऊन पडलं म्हणून बाहेर सुकवण्यासाठी ठेवलेला होता व त्या चिंतेमध्ये त्या होत्या. त्या वेळी सहजपणे विचार आला की पुरुष कर्मचाऱ्यांना किंवा इतर पुरुषांनाही कधी असं सहज का होईना, पण पावसाने बाहेरील कपडे ओले होतील, असा विचार आला असेल का? प्रचंड कामाचा व्याप असतानाही आम्हा बायकांना का म्हणून अशी आठवण यावी, असा प्रश्न पडला. खरं तर आमच्या जाणिवा व जाणिवांच्या सातत्यीकरणामुळे आमच्या नेणिवांचाही तो भाग बनून गेला आहे. त्यामुळे आम्ही कितीही कामात असलो तरीदेखील पडणारा पाऊस आणि घरी वाळू घातलेले कपडे ही आमच्या नेणिवेत पार खोलपर्यंत रुजलेली बाब अगदी वेळेवर जागृत होते व पुन्हा त्याच जाणिवा आम्ही वारंवार जगतो. तसं पाहिलं तर आपल्या संस्कृतीनुसार अगदीच ‘नॉर्मल’ असणारी बाब मनाला बोचत होती.

कालपरवाच सहकारी मैत्रिणीच्या हातावर स्वयंपाक करताना नकळतपणे तेल उडालं. तिला चांगलाच चटका बसला होता. जेवणाच्या सुट्टीच्या दरम्यान तिने ते दाखवलं. अगदी सहजपणे “काळजी घे’ असा सल्ला मी तिला दिला. कारण मागच्याच महिन्यात माझ्याही हातावर अशाच पद्धतीने गरम तेल उडाले होते. कितीतरी मैत्रिणींच्या, सहकाऱ्यांच्या व इतर स्त्रियांच्या हातावर उडालेले तेल, तव्याचा लागलेला चटका आजपर्यंत मी पाहत आलेले होते.

हा सल्लादेखील आता बोथटपणाची झालर लावल्यासारखा वाटतो. कारण प्रत्येकीने त्या वारंवार झालेल्या जखमा सहन केल्या आहेत. त्या सहन करून दुसरीलाही त्या जखमा सहन करण्यासाठी काळजी घे, हळू करत जा, असा दिलेला सल्ला चांगला वाटण्याऐवजी बोथट वाटतो. कारण या जखमा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीपर्यंत अशाच पद्धतीने जिवंत आहेत व ही परंपराच जणू अशाच पद्धतीने पुढे जाताना दिसते. अगदीच स्पष्ट बोलायचं म्हटलं तर आपली आजी, आई आणि आपण स्वतःदेखील याच अनुभवातून गेलो आहोत व जात आहोत. या ठिकाणी बहिणाबाईंची एक कविता आठवते. बहिणाबाईंच्या कवितेतल्याप्रमाणे भाकरीचे चटके आम्हालाच का? संसार तर स्त्री-पुरुष अशा दोघांचाही असतो. त्यांचीही अशी जबाबदारी पाहिजेच ना. येथे स्त्रियांना चटका बसणे किंवा तेल उडणे, एवढाच उथळ अर्थ गृहीत नाही. अनेक पुरुषदेखील उत्तम स्वयंपाकी आहेत. परंतु हा स्वयंपाक हॉटेलमध्ये व्यावसायिक शेफ म्हणून केला जातो. स्वतःच्या घरी मात्र हा स्वयंपाकी स्वयंपाक करत असेल हे एेकण्यात नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात अनेक स्त्रिया खासगी क्षेत्रातही काम करतात. अनेक जणी सरकारी नोकरीतही असतात. प्रत्यक्ष या स्त्रिया आता घराच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. त्यांचा महत्त्वपूर्ण हातभार त्यांच्या संसारामध्ये आहे. पण म्हणून काही त्यांची घरातील कामे चुकली नाहीत. घरकामाचे समविभाजन हे आजही झालेले दिसत नाही आणि त्यामुळेच की काय, सायंकाळी टीव्ही पाहत असताना दिसलेली एका खाद्यतेलाची जाहिरात मनाला खोलवर स्पर्शून तर गेलीच; पण नव्या विचारांच्या नांदीची साद घालणारी वाटली.

या जाहिरातीत एका घरातील सुनेला त्या घरातील कुणीतरी विचारते की, आज नाष्ट्याला काय आहे व ती चटकन उत्तरही देते की पोहे व पराठे, त्याचसोबत टोमॅटोची चटणीदेखील बनवली आहे. त्या स्वयंपाकघरात तिची सासूदेखील काहीतरी कामात असते. त्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर किंचित मिश्किल हास्य येते. दिसणारे हास्य फार काही आनंदाचे वगैरे नाही तर ते हास्य काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वाटले. काहीतरी समस्या जी वर्षानुवर्षी चालत आलेली आहे आणि त्या समस्येचे सातत्य ती आपल्या विचारातही स्पष्ट करते. त्या सासूच्या मनात विचार येतो की आज नाष्ट्याला काय बनवलं हा प्रश्न अगोदर मला विचारला जायचा, आज तिला (सुनेला). पण यात काही फरक तिला जाणवला नाही. कारण अगोदर सासूने ती सर्व कामे केलेली होती, जी आज नव्या काळात तिची सून करत होती. कामे तीच ती होती, फक्त व्यक्तीमध्ये बदल होता. आणि त्यामुळेच त्या जाहिरातीतील सासूला पडलेला प्रश्न अधिकच रास्त व महत्त्वाचा वाटतो. हा प्रश्न असतो की काळ बदलला आहे, पण हा प्रश्न बदलला नाही. या ठिकाणी हा प्रश्न केवळ घरकाम विभाजनापुरताच नाही तर तो स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांच्या विरोधी घडणारी हिंसा, पुनर्विवाह व बालविवाहाच्या बाबतीतही आजही असलेला दिसतो. केवळ या प्रश्नांच्या स्वरूपात बदल झाला आहे. परंतु प्रश्न मात्र आजही आहेत.

स्टँड पॉइंट थिअरीनुसार आपण ज्या स्थानावर आहोत, तेथून आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगात आपण नेमके कुठे आहोत, आपलं स्थान काय आहे, आपली भूमिका काय आहे, किंवा आपल्या नजरेतून जग कसे दिसते या बाबी अधिक स्पष्टपणे उमगतील. अगदी त्याच पद्धतीने आपण स्त्रीप्रश्नांचा विवेकी विचार केला तर निश्चितपणे या स्त्रीप्रश्नांच्या निराकरणासंदर्भात कृतिशील निर्णयांची गरज आजही भासते..!

डॉ. सविता बहिरट संपर्क : savitabahirat.e@gmail.com

बातम्या आणखी आहेत...