आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:प्रवास सुरक्षित मातृत्वाचा...

डॉ. प्रतिभा फाटक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपनिषदात एक गोष्ट आहे. लढाईत दैत्यांचा पराभव केल्यामुळे देवांना आपल्या पराक्रमाचा गर्व झाला. हा अभिमान बरा नव्हे म्हणून सर्व देव दरबारात बसले असता त्यांना अकस्मात एक भव्य रूप दिसले. ग्रंथात त्याला यक्ष असे म्हटले आहे. दैत्यापेक्षाही फारच भयंकर रूप पाहून सारे घाबरले. कुणीतरी सामोरे गेले पाहिजे, म्हणून सर्वात बलवान असेल त्याने जावे असे ठरले. प्रथम वायू गेला. यक्षाने त्याला विचारले, ‘तुझी शक्ती कशात आहे?’ वायू म्हणाला, ‘माझ्या शक्तीने सारी सृष्टी मी हलवू शकतो.’ यक्ष म्हणाला, ‘ठीक आहे, ही येथे गवताची काडी आहे, ती हलव.’ वायूने सर्व शक्ती लावली, पण त्याला ती काडी हलवणे जमले नाही. तो लज्जित होऊन परतला. मग अग्निदेव गेले. त्यांनाही ती काडी आपल्या दाहक शक्तीने जाळता आली नाही. शेवटी स्वत: इंद्र गेला; पण त्याच्याशी साधे बोलणेही जणू कमीपणाचे आहे असे दर्शवून यक्ष अदृश्य झाला. मग इंद्र विचार करू लागला की, आपण आता देवांना काय सांगावे? त्याचे हे चिंतन चालू असताना त्याला एक देदीप्यमान स्त्री दिसली. अत्यंत तेजस्वी अशी हेमवती. तिने त्याला सांगितले की, तू ज्याचा शोध घेतोयस त्याच शक्तीमुळे वायू शक्तिमान आहे, त्याच शक्तीमुळे अग्नीला दाहकता आहे. ती शक्ती सर्व सृष्टीची, परब्रह्माची जननी, ही जगन्माता मातृत्वाचे मूळ स्वरूप आहे.

अगदी ऋग्वेद काळातही गर्भाधान, सूतिका, योनीशी संबंधित आजार यांच्याविषयीच्या ऋचा आढळतात. त्यावरून त्या काळातही मातृत्व सुखकर करण्याचे शास्त्र विकसित होते, हे सिद्ध होते. पुढे उत्तर वैदिक काळात आयुर्वेदातील चरक सुश्रुत ग्रंथांमध्ये या विषयातील सविस्तर वर्णन आढळते. कौमारभृत्यतंत्र हे तर विकसित असे शास्त्र माता आणि बाल आरोग्याचे विस्तृत वर्णन करते. रामायण, महाभारत काळातील शंभर कौरवांच्या जन्माचा अपवाद वगळता अपत्यांची संख्या पाच-सातच्या पुढे आढळत नाही. याचा अर्थ तेव्हा संततिनियमनाच्या किंवा लैंगिक संयमाच्या काही पद्धती नक्की विकसित असाव्यात, असे वाटते. पुढे कालौघात परकीय आक्रमणातून झालेल्या हानीमध्ये हे ज्ञान सर्वश्रुत राहिले नसावे आणि अगदी अलीकडील काळात म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अनेक मुले जन्माला घालून त्यातली मोजकीच जगणे किंवा बाळंतपणात त्या मातेला जीव गमवावा लागणे, हा जणू निसर्गनियमच झाला होता. फार आधीची गोष्ट नाही. अगदी १९९० चा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की, एक लाख जन्मामागे चारशे ते पाचशे मातांचा मृत्यू होत होता. आठ ते नऊ वेळा गर्भधारणा आणि त्यातील चार ते पाच मुलं जगत होती. मातामृत्यू आणि नवजात बालकाचा मृत्युदर हे सुरक्षित मातृत्वाचे निर्देशांक मानले जातात. मातृत्वाचा हा प्रवास फार बिकट होता. तो सुरक्षित करण्याचे अनेक प्रयत्न सुरू झाले. सरकारे या विषयात लक्ष घालू लागली. स्वतंत्र उपक्रम अस्तित्वात आले. सगळ्यात आधी असुरक्षित मातृत्वाची कारणं शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यात बालविवाह, शिक्षणाचं कमी प्रमाण, महिलांमध्ये असलेलं बालपणापासूनचं कुपोषण, पुरेशा पोषक आहाराचा अभाव, महिलांची उंची पाच फुटांपेक्षा कमी असणे ही मुख्य कारणे आढळतात. प्रत्येक टप्प्यावर होणारा उशीर, हेही महत्त्वाचं कारण आहे. त्यात आरोग्य केंद्रापर्यंत अशा माता पोहोचणे आणि तिथे पोहोचल्यावर योग्य ते उपचार मिळायला होणारा उशीर या सर्वांचा विचार आणि कारणांची मीमांसा केल्यानंतर माता-बाल आरोग्याच्या दृष्टीने ‘Safe Motherhood’ अर्थात सुरक्षित मातृत्वासाठी कार्यक्रम राबवायला सुरूवात झाली. त्या उपक्रमाच्या उद्दिष्टात १९९५ पर्यंत कुटुंब नियोजनाचे प्रमाण ४० % हून ६० % टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. एक वर्षापर्यंतच्या बाळांना संपूर्ण लसीकरण, कमीत कमी ७५ % गर्भवती मातांना उपचारांच्या कक्षेत आणणे, ८० % बाळंतपणाच्या वेळी कुणीतरी प्रशिक्षित सहायक उपलब्ध असणे याची खातरजमा, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे, अनेस्थेशिया, शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार वाढवणे, रक्ताची सोय, विशेष नवजात शिशूची काळजी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष सेवा यांंचा समन्वय इ. उद्दिष्टांचा समावेश यात होतो. आरोग्य केंद्रातील प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘पाच सी’ अर्थात स्वच्छतेचे पाच नियम बंधनकारक करण्यात आले. यामध्ये; स्वच्छ जागा, स्वच्छ हात, स्वच्छ ब्लेड, स्वच्छ दोरा आणि नाळ दाबण्यासाठीचा चिमटा या गोष्टींचा समावेश होता. पण, हा प्रयोग प्रामुख्याने मातामृत्यू आणि बाल मृत्युदर अधिक आहे अशा २१ जिल्ह्यांत राबवला गेला. एवढ्या प्रयत्नांनंतरही १९९५ मध्ये देशातील रुग्णालयांच्या अभ्यासात, एक लाखामागे ४२१ इतका माता मृत्युदर आढळून आला. ५० टक्के ते ९८ टक्के मातामृत्यू थेट प्रसूतीवेळच्या कारणामुळे होत असल्याचे दिसले. त्यात रक्तस्राव, संसर्ग आणि उच्च रक्तदाबाचे विकार, फाटलेले गर्भाशय, हिपॅटायटिस आणि अशक्तपणा अशी कारणे होती. या मृत्यूंपैकी ५० % बेकायदेशीर गर्भपाताशी संबंधित होते. कमी वय, बहुप्रसवता, अनियोजित गर्भधारणा आणि अवैध गर्भपात ही पण काही कारणे होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, ८८ ते ९८ % मातामृत्यू टाळता येण्यासारखे असतात. त्यासाठी बारा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजनांची आखणी केली गेली. त्यात वरील उपायांसोबतच प्रसूती व्यवस्थेतील समन्वय आणि सामूहिक निरक्षरता यावरही भर दिला गेला. माता आणि बाल आरोग्य सेवांना उच्च प्राधान्य देणे, प्रसूती आणि प्रसूतीदरम्यान काळजीकडे लक्ष देणे, उपकेंद्रात स्वच्छ व सुरक्षित प्रसूतीचे ठिकाण निर्माण करणे आणि जोखीम असलेल्या मातांसाठी रुग्णालयात प्रसूती, आरोग्य सेवा स्तरावर गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न, प्रसूतीपश्चात कार्यक्रम, माता-बाल आरोग्य आणि कुटुंब नियोजन सेवांमध्ये समन्वय, राष्ट्रीय रक्त संक्रमण सेवा, वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न, तरुण मुलींना आरोग्य आणि लैंगिक संबंधाबद्दल शिक्षित करणे, माता-बाल आरोग्यावर अनौपचारिकपणे जनतेला प्रशिक्षित करणे, प्रसूती आणि स्त्रीरोग प्रशिक्षण व व्यावहारिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे, प्रजनन वर्तन संशोधन तसेच प्रत्येक महिलेला सुरक्षित मातृत्वाचा अधिकार निश्चित करणे इ. उपायांचा समावेश आहे. अथक प्रयत्नांनंतर हळूहळू २००८ पर्यंत माता मृत्युदर एक लाखामागे ४२१ वरून २५४ इतका कमी करण्यात यश आले. २०१३ पर्यंत हा दर लाखामागे १३० आणि २०२० पर्यंत १०० इतका कमी करण्याचे निश्चित करण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे, आज हा माता मृत्युदर १३० वरून ९७ पर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुमन, RMNCH+A अशा सगळ्या उपक्रमांचा यात मोठा वाटा आहे. मातृत्वाचा हा प्रवास फक्त आकड्यांच्या भाषेतच सुधारला असं नाही, तर अनेक नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रसूती आणि मातृत्वापासून वंचित राहू शकणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातही एक नवी पहाट आली आहे. अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे आदी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषांमध्ये वीर्यात शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणे अपत्यप्राप्तीत बाधा आणतात. परंतु, आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे या अडचणींवर मात करता येऊ शकते. आयव्हीएफ, भाडोत्री मातृत्व (सरोगसी), वीर्यपेढी इत्यादी तंत्राच्या सहाय्याने अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते. आपल्या समाजात एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराने मातृत्वाचा आनंद मिळवण्यासाठी स्वतःच्या शरीरावर अनेक प्रयोग करवून घेणाऱ्या, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी त्यासाठी तयार असणाऱ्या माता आहेत, तर दुसरीकडे दुर्गम भागातील अनुभव अजूनही अंगावर शहारे आणतात.. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगरात वसलेला एक छोटा पाडा. तिथे राहणारी जेवा दुसऱ्यांदा गर्भवती होती. नववा महिना चालू होता. जेमतेम दोन वेळा गरोदरपणातील तपासणी झालेली. पावसाळ्याचे दिवस होते. तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू होता. त्या दिवशी रात्री जेवाला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. काळोख होता. भरपावसात तिला डोंगर उतरून खाली येणे शक्य नव्हते. घरातच तिची तडफड सुरू झाली. पावसाचा जोर कमी होत नव्हता. जेवाचा नवरा हतबल होऊन पाहत होता. दिव्याच्या उजेडात तिला तसे पाहणे त्याला शक्य होत नव्हते. तो तिला एकटीला त्याच अवस्थेत सोडून खाली राहणाऱ्या गावातील दाईला बोलवायला पावसात-अंधारात तसाच गेला. दीड तासाने तो दाईला घेऊन परत आला तेव्हा दिव्यातील रॉकेल संपले होते. वात विझली होती. जेवाचीसुद्धा... खाली पसरलेल्या रक्ताच्या थारोळ्यात नवजात अर्भक रडत होते. दाईने पाहिले, बाळ बाहेर आल्यानंतर वार पडलीच नव्हती. भीषण रक्तस्रावासोबत जेवाचे गर्भाशय बाहेर आले होते. ही घटना घडून फार काळ लोटला असं नाही. तीन वर्षांपूर्वीची ही घटना. अशा अनेक जेवा आजही आपला जीव गमावत आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आपल्याला मातामृत्यू एक लाखामागे ७० इतका कमी करायचा आहे. त्याचवेळी नवजात शिशंूचा मृत्युदरही आणखी खाली आणायचा आहे. या संदर्भातील आपले दोन्ही निर्देशांक नक्की सुधारले आहेत. पण, एक समाज म्हणून याबाबतीत आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे, याची जाणीवही सर्वांना निश्चितपणे असायला हवी. आपल्या तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रश्नावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही केला आहे. देशातील सात राज्यांच्या दुर्गम भागात शासन आणि स्वयंसेवी संस्था मिळून आशाताईंना प्रशिक्षित करून ‘केअर मदर आनंदी माँ’ या किटद्वारे त्या भागातील मातांना घरपोच तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते आहे. त्यामुळे साठ टक्के जोखमीच्या मातांना लवकर ओळखून योग्य त्या ठिकाणी पाठवणी केली जाते. त्यामुळे माता आणि नवजात शिशूंना जीवनदान मिळत आहे. आरोग्याची आशा असलेली ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील आशाताई, तिच्या रूपाने अगदी शेवटपर्यंत आरोग्यसेवेचे जाळे शासनाने उभे केले आहे. पण, अजून गरज आहे, ती त्यांच्या सक्षमीकरणाची आणि त्यांच्या योग्य त्या सन्मानाची. आरोग्यदायी वर्तन असलेला समाज, मूल्याधारित वैद्यकीय शिक्षण घेतलेला आणि शिकत असतानाच सेवेचा अंकुर रुजलेला आरोग्यसेवक, भ्रष्टाचारमुक्त शासन, अवाढव्य नफ्याची हाव नसलेला उद्योजक, दखल घेणारी प्रसारमाध्यमे आणि सेवाभावी सामाजिक संस्था एकत्र आल्यास भारतीय मातृत्वही सुखावह होईल. त्यातूनच आपल्या आरोग्याचे निर्देशांकसुद्धा जागतिक स्तरावर अव्वल ठरतील. {संपर्क : drpratibhaphatak@gmail.com