आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Treat The Ladies Of The House To A Feast Of Sparkling Delicacies | Article By Vishnu Manohar

चवींच्या गावा जावे...:घरातील महिलांना द्या चमचमीत पदार्थांची मेजवानी

विष्णू मनोहर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जा गतिक महिला दिनानिमित्त पुरुषांनी काही पदार्थ बनवून महिलांना खाऊ घातले तर खऱ्या अर्थाने हा दिवस त्या पुरुषाने साजरा केला, असं मला वाटेल. गंमत अशी आहे की, सध्याच्या जगात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. दिवसभर दोघेही आॅफिसमध्ये असतात, पण घरी कामावरुन परतणाऱ्या पुरुषांची अपेक्षा हीच असते, की त्याला घरी आल्यावर आयता चहा मिळावा. पण, हेच कधी उलट झालं तर? तुम्हाला आयत्या चहाचा जो आनंद मिळतो, तो तुमच्या घरच्या स्त्रीला मिळाला, तर तिला किती बरं वाटेल, याची कल्पना करा. एकदा कधीतरी चहा केला म्हणून नेहमीसाठी आपल्याला हे बनवावे लागेल, असा विचार करू नका! कारण आपण भूक लागते म्हणून अन्न खातो ही प्रकृती असतेे, भूक लागली नसताना अन्न ग्रहण केले तर ती विकृती असते. पण, स्वत:ला भूक लागली असताना आपले अन्न इतरांना देतो ती आपली संस्कृती असते. अशा संस्कृतीचा संस्कार झालेल्या या महिला असतात. तुम्ही रोज त्यांच्याकरिता चहा कराल, अशी त्यांची अपेक्षा नसेल. म्हणूनच इथं मी सांगितलेले काही पदार्थ उद्या आपल्या घरच्या महिलांसाठी स्वत: बनवा आणि खऱ्या अर्थाने ‘महिला दिन’ साजरा करा. काॅर्नफ्लेक्स कबाब { साहित्य : पोटॅटो फ्लेक्स २ वाट्या, काॅर्नफ्लेक्स १ वाटी, हिरवी चटणी अर्धी वाटी, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, कोथिंबीर, काजू पाव वाटी. { कृती : सर्वप्रथम पोटॅटो फ्लेक्समध्ये काजूचे तुकडे, हिरवी चटणी, मीठ, लिंबू, साखर मिसळून त्याचे छोटे वडे थापून काॅर्नफ्लेक्समध्ये घोळवा. साॅसबरोबर खायला द्या. ब्राऊन ब्रेड रोल सँडवीच { साहित्य : न कापलेला ब्राऊन ब्रेड १ नग, हिरवी चटणी अर्धी वाटी, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, पालकाची पाने ३-४, पानकोबीचे पाने ३-४, चाट मसाला चवीनुसार, टोमॅटो साॅस २ चमचे { कृती : न कापलेला ब्रेड घेऊन त्याच्या लांब स्लाईसेस कापा व त्याच्या दोन बाजूच्या लांब कडा कापून ठेवा. हिरवी चटणी, कोथिंबीर, आलं-लसणची पेस्ट लावा. नंतर टोमॅटो साॅस, पत्ताकोबी आणि पालकाची पाने घालून त्याचा रोल करा. नंतर त्याचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवा. खायच्या वेळी ८-१० मिनिटे बेक करून चाट मसाला घालून खायला द्या. इन्स्टंट रसमलाई { साहित्य : तयार रसगुल्ले १० नग, मिल्क पावडर १ वाटी, दूध १ वाटी, केशर पाव चमचा, मीठ चिमूटभर, पिस्ते १५-२०. { कृती : सर्वप्रथम मिल्क पावडरमध्ये दूध मिसळून घट्टसर मिश्रण तयार करा. नंतर एका पातेल्यात गरम पाणी तयार करून त्यात तयार रसगुल्ले घाला. त्यांना पिळून लगेच तयार दुधात घाला. केशरामध्ये थोडे दूध मिसळून, उकळून ते मिश्रण रसमलाईवर घाला वरून बारीक पिस्ते कापून घाला. दडपे पोहे { साहित्य : पातळ पोहे १ वाटी, ओलं खोबरं पाव वाटी, चिरलेला कांदा पाव वाटी, हिरवी मिरची ३-४, कोथिंबीर ४ चमचे, मीठ, साखर, लिंबू चवीनुसार, मोहरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा. { कृती : पातळ पोहे, ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यावर मोहरी, हिंग, हळद यांची फोडणी घाला आणि लगेच झाकून ठेवा. आलू टिक्की { साहित्य : उकडलेले बटाटे अर्धा किलो, चिंचेची चटणी अर्धी वाटी, पुदिना चटणी अर्धी वाटी, मलाईचे दही १ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, कोथिंबीर ४ चमचे, शेव १ वाटी, चाट मसाला १ चमचा, तूप पाव वाटी, काळी मिरी १ चमचा. { कृती : बटाटे कुस्करून यामध्ये चवीनुसार मीठ व काॅर्नस्टार्च घालून त्याचे गोल गोळे तयार करून खोलगट तव्यावर तुपामध्ये तळून घ्या. सर्व्ह करतेवेळी गोळा चपटा करून खरपूस परतून घ्या. प्लेटवर घेऊन त्यावर दही, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, कांदा, कोथिंबीर आणि शेव घालून सर्व्ह करा. ड्रायफ्रूट बर्फी { साहित्य : अंजीर ७-८, खजूर ७-८, किसमिस अर्धी वाटी, काजू, बदाम अर्धी वाटी, खसखस अर्धी वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी. { कृती : सर्वप्रथम अंजीर, खजूर आणि किसमिस एकत्र करून बारीक करून घ्या. त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट मिसळून आवश्यकतेनुसार मिल्क पावडर मिसळवा व एका ट्रेमध्ये मिश्रण थापून घ्या. फ्रिजमध्ये १० मिनिटे थंड करून वड्या पाडा. वरून चांदी वर्ख लावून खायला द्या.{संपर्क : ९८९०५५५५५९

बातम्या आणखी आहेत...