आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:यथार्थ गौरव

टीम मधुरिमा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा, मानाचा समजल्या जाणाऱ्या “जनस्थान’ पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांची निवड करण्यात आली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड ‘जनस्थान’ आणि “गोदा गौरव’ पुरस्कार दिले जातात. जनस्थान पुरस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी, तर गोदा गौरव कला, साहित्य, संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी प्रदान केले जातात. ‘सत्यकथा’पासून आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा करणाऱ्या आशा बगे यांची ‘रुक्मिणी’ही १९८० मध्ये प्रकाशित कथा खूप गाजली होती. मौज दिवाळी अंकामध्ये त्या नियमितपणेे लेखन करतात. त्यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष लोकप्रिय आहे. त्याशिवाय ‘भूमी’ (२००६ ची साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त) आणि ‘त्रिदल’ या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह.

एकत्रित कुटुंबात बालपण आणि आयुष्य व्यतीत झाल्यामुळे असेल कदाचित, पण आशा यांनी स्त्रियांची कुटुंबात होणारी घुसमट प्रभावीपणे आपल्या लेखणीतून कागदावर उतरवली. त्यांना संगीताची विशेष आवड आहे, जाण आहे. त्यांच्या लेखनातील संगीतविषयक संदर्भ आणि संगीताशी संबंधित लेखनातूनही हे जाणवते.

नागपूर इथे बालपण गेलेल्या आशा बगे यांचे वडील वकील होते. मराठी साहित्य आणि संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे. विशेष म्हणजे, उच्चशिक्षण घेऊनही स्वेच्छेने कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या आशाताईंनी आपल्या लेखन-वाचनाचा छंद जोपासला. मौज प्रकाशनाचे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वत:ची स्वतंत्र लेखनशैली तयार केली. २०१८ पर्यंत १३ लघुकथासंग्रह, ७ कादंबऱ्या आणि २ ललित लेखनाची पुस्तके अशी विपुल साहित्य संपदा आशाताईंच्या नावावर आहे. १० मार्च या कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरात, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते हा ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्या आणखी आहेत...