आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:खोड...

अरविंद जगतापएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सारंग झाडावर चढला होता, त्या गोष्टीला आज महिना झाला. आता सारंगच्या घरी दहा दिवसाआडसुद्धा पाणी येत नाही. आणि कुणी त्याचा फोनही घेत नाही. मागच्या आठवड्यात रात्री झालेल्या मारहाणीनं तो चांगलाच शांत झाला होता. बराचसा मुकामार असला, तरी एक-दोन ठिकाणी चांगलेच वळ उमटले होते. त्यामुळं अंगावर पाणी घ्यायची त्याची इच्छाच उरली नव्हती. पण, आज महिना झाल्यावर त्याला हे सगळं पुन्हा आठवलं. कारण महापालिकेसमोरचं ‘ते’ झाड अचानक रात्रीच पडलं होतं...

रा त्री दीडला महापौरांना फोन आला. आमच्या भागात लाइटचा एक पण खांब नाही. मला माझं घर सापडत नाही.. महापौर वैतागले. त्यांनी आयुक्तांना फोन करायला सांगितलं. रागारागात आयुक्तांचा नंबर पण दिला. खूपदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक महापौरांना फोन करायचे. गटार तुंबलंय, ड्रेनेज वाहतंय वगैरे.. महापौरांना वैताग यायचा. त्यांना वाटायचं लोक आयुक्तांना फोन का करत नाहीत? पण, लोकांची अडचण अशी होती, की आयुक्त मराठीत बोलायचे नाहीत. बोलले तर लोकांना कळायचं नाही. मग त्यांना आपली समस्या काय सांगणार? म्हणून मग आपले वाटणारे महापौर त्यांना बोलायला सोपे वाटायचे. खरं तर महापौरही श्रेष्ठी म्हणतील तसं वागायचे. काही वर्षांपूर्वी ते फक्त पोळी-भाजी खायचे, पण आता श्रेष्ठींना खुश करण्यासाठी पैसे खाऊ लागले. पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसं स्वतःसाठी कमवतो असं कधीच म्हणत नाहीत. अर्थात सख्ख्या भावाला द्यायची वेळ आली, तरी लवकर हो म्हणत नाहीत...

...तर रात्रीच महापौरांना एक फोन आला आणि झोप मोडली. त्यात पुन्हा पहाटे एकदा फोन आला. त्याचं नाव सारंग. व्यवसाय शेअर मार्केट. दिवसभर घरीच. वेळच वेळ. त्यानं महापौरांना सकाळपासून पंचवीस वेळा फोन केला होता. त्याच्या भागात पाण्याची समस्या मोठी होती. महापौर आता फोन उचलतच नव्हते. तेवढ्यात त्यांच्या पीएला फोन आला. सारंग आता महापालिकेसमोरच्या झाडावर चढला होता आणि जीव द्यायची धमकी देत होता. आता मात्र महापौरांना सगळं सोडून पळावं लागणार होतं. कारण लोकांना ते झाड खूप सोपं झालं होतं. एकदा त्या लिंबाच्या झाडावर चढलं की सगळे गोळा होतात. मीडिया पण लगेच धावत येतो आणि जीव द्यायची एक-दोन तास धमकी देणारा माणूस हीरो होऊन जातो. ज्याला घरातसुद्धा कुणी विचारत नाही, त्याची बाहेरची पन्नास- शंभर माणसं मनधरणी करू लागतात. आज सारंग त्या झाडावर चढला होता...

झाड खूप जुनं आणि उंच. त्याला दहा-पंधरा खिळे ठोकून ठेवलेले. कुणी गुप्तरोग तज्ज्ञ, कुणी ज्योतिषी, कुणी मांत्रिक अशा खूप लोकांनी आपले नंबर आणि नाव असलेल्या पाट्या ठोकून ठेवल्या होत्या. त्यामुळं लोकांना झाडावर चढणं सोपं व्हायचं. दर महिन्याला असा कुणी न कुणी झाडावर चढायचा. पेपर, केबल, सोशल मीडियावर बातमी व्हायची. आयुक्त किंवा महापौर धावून यायचे. त्याला समजवायचे. लोक तमाशा बघायचे. शेवटी तो माणूस खाली यायचा आणि खेळ संपायचा. पण, आज सारंग काही केल्या खाली उतरायला तयार नव्हता. आयुक्त सुटीवर होते. महापौर धावून गेले. अगदी हात जोडले, पण सारंग काही खाली उतरायला तयार झाला नाही. त्याची मागणी फार मोठी नव्हती. दोन दिवसाआड तरी पाणी आलं पाहिजे, असं तो म्हणत होता. खरं तर लोक रोज पाणी आलं पाहिजे, असं म्हणतात. पण, नेतृत्वच दरिद्री असलेली काही शहरं असतात. तिथले लोक बिचारी मागणी करतानाही दोन दिवसाआड पाणी आलं पाहिजे, असं म्हणतात. सारंगने तेच केलं. पण, दोन दिवसाआड पाणी देणार कुठून? धरणातून शहरापर्यंत वीस वर्षांत आलटून पालटून पाइप आले किंवा खड्डे आले. पाणी काही आलं नाही. आणि आता येणंही शक्य नव्हतं. कारण जुनी पाइपलाइन होती, ती हायवेमध्ये बुजून गेली. नव्यानं पाइपलाइन करायला पुन्हा तीन-चार वर्षे लागणार. मग पाणी येईल, असं आश्वासन कसं देणार? एरव्ही सभेत बोलताना, तुमच्या घरी नळाला वाइन येईल म्हणलं तरी लोक विश्वास ठेवतात. पण, झाडावर चढलेला माणूस हातघाईला आलेला असतो. जीवन-मरणाचा प्रश्न असतो...

महापौर घामाघूम झाले होते. सारंग काही ऐकायला तयार नव्हता आणि खाली यायलाही तयार नव्हता. एका पोलिसाने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला, पण सारंगने लगेच उडी मारली आणि दुसऱ्या फांदीला लटकला. ते बघून महापौर पोलिसालाच ओरडले. क्षणभर त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. महापौर पुन्हा त्याला खाली यायची विनंती करू लागले. सारंग म्हणाला, ‘खालून बोलू नका, वर येऊन बोला. सगळ्यांना कळू द्या. इथं ह्या झाडावर चढून शपथ घ्या, की दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणार..!’ महापौर लोकांकडं बघू लागले. लोक काही वेळ शांत होते. पण, महापौरांनी झाडावर चढायला पाहिजे, असे काही आवाज गर्दीतून यायला लागले. महापौरांना लक्षात आलं, हीच ती वेळ आहे मीडियात हीरो व्हायची! मागचा-पुढचा विचार न करता ते झाडावर चढू लागले. कितीतरी वर्षे लोटून गेली होती झाडावर चढून. आज जे पालकमंत्री आहेत, त्यांची सभा झाडावर बसून ऐकली होती, एवढंच त्यांना आठवत होतं. पण, आज ते स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी झाडावर चढले होते. सारंगच्या समोरच्या फांदीवर बसले होते. मीडियावाले त्यांच्याकडे माइक फेकत होते. त्यांना आवाज क्लिअर पाहिजे होता. पण, माइक झेलता झेलता महापौर स्वतःच पडायला आले. त्यामुळं तो बेत रद्द झाला. माइकशिवाय बोलणी सुरू झाली...

पुढारीच कशाला, सामान्य माणूससुद्धा फायद्याशिवाय काही करत नाही. झाडावर चढला तरी ते आंब्याच्या किंवा नारळाच्या. लिंबाच्या झाडावर कोण चढणार? पण, सारंगसारखी माणसं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी झाडावर चढू लागली. आणि आज चक्क महापौर मागणी पूर्ण करतो, हे सांगायला झाडावर चढले. ते वर आले या गोष्टीनेच सारंग भारावून गेला. तो म्हणाला, ‘आता तीन दिवसाआड का होईना पाणी आलं तरी चालेल साहेब.’ साहेब माघार घेणार नव्हते. पाणी येणार आणि दोन दिवसाआड नाही, एक दिवसाआड येणार म्हणू लागले. हे ऐकून सारंगच्या डोळ्यातूनच पाणी येऊ लागलं. सारंग झाडावरून उतरला. लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही म्हणून साहेब काही वेळ झाडावर प्रायश्चित्त घेणार, असं जाहीर करण्यात आलं. पब्लिक घालवण्यात आली. मीडिया परत पाठवण्यात आला. मग लक्षात आलं की वर चढता चढता साहेबांची पँट फाटली होती...

सारंग झाडावर चढला होता, त्या गोष्टीला आज महिना झाला. आता सारंगच्या घरी दहा दिवसाआडसुद्धा पाणी येत नाही. आणि त्याचा कुणी फोनही घेत नाही. खरं तर तो बिचारा फोनही करत नाही. कारण मागच्या आठवड्यात रात्री झालेल्या मारहाणीनं तो चांगलाच शांत झाला होता. बराचसा मुकामार असला, तरी एक-दोन ठिकाणी चांगलेच वळ उमटले होते. त्यामुळं अंगावर पाणी घ्यायची इच्छाच उरली नव्हती सारंगची. पण, आज महिना झाल्यावर त्याला हे सगळं पुन्हा आठवलं. कारण महापालिकेसमोरचं ते झाड अचानक रात्रीच पडलं. पहाटेच्या आत कर्मचारी लोकांनी ते तिथून उचलून पण टाकलं. एरव्ही घरासमोरचं झाड तोडायला कितीतरी परवानग्या लागतात. पण, महापालिकेत काहीही होऊ शकतं. एकच अडचण झाली. महापालिकेत भली भली माणसं रोज आपल्या नजरेत पडतात आणि पुन्हा निवडून येतात. पण, ते लिंबाचं झाड पडलं ते कायमचं. आता ते आंदोलन करणाऱ्या लोकांचा आधार असलेलं एकमेव झाड महापालिकेपुढं नसल्यानं लोकांनी मागण्या करणंच सोडून दिलंय. नगरसेवक खरं तर महापालिकेत महापौरांच्या अभिनंदनाचा ठराव आणणार होते. आंदोलन करणाऱ्या पब्लिकची खोड मोडल्याबद्दल. पण, झाड तुटलं म्हणून सेलिब्रेशन करणं बरं दिसणार नाही, असं एक नगरसेविका म्हणाली. मग अचानक विचार बदलून, शहराची समस्या कायमची मिटली म्हणून एका रिसॉर्टवर पार्टी झाली...

झाड कुणी तोडलं हे काही शेवटपर्यंत कळलंच नाही. मात्र, एका फटक्यात शहराच्या नाही, पण महापालिकेच्या खूप समस्या मिटल्या, हे खरंच. सारंग येता जाता त्या कापून टाकलेल्या लिंबाच्या खोडाकडं बघतो. माणसं अडचणीत साथ देऊ शकत नाहीत. पण, झाड देऊ शकतं, हे त्याला आता मनोमन पटलं आहे. खरं तर प्रेतयात्रेतसुद्धा खांदेकरी बदलत असतात. शेवटपर्यंत सोबत असतात बांबू. आणि सोबत जळणार असतं ते फक्त लाकूड. म्हणजे झाडच! मग सारंगला विचार आला, निवडणुकीत माणसं का उभं राहतात? त्यानं काय मिळतं? सालं आपल्याकडून एक झाड उभं राहिलं पाहिजे.. नाही तर आपण उभं केलं पाहिजे...