आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:युक्रेनियनांवर आता ‘आतल्या’ युद्धाचं संकट

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता युद्ध नावाची गोष्ट दोन देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण जगावर प्रभाव टाकणारी होऊन बसली आहे, हा धडा युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानसिक आणीबाणीतून घ्यायला हवा. या युद्धामुळे निर्माण झालेला युक्रेनियन समाजाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न भीषण आहे. युक्रेन आपल्या ‘आत’ सुरू असलेल्या या युद्धात त्याच्या कुवतीप्रमाणं लढत असला, तरी एकूणच समाजाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज या युद्धाच्या परिणामांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सा धारण तेरा महिन्यांपूर्वी रशियाने आपला शेजारी देश असलेल्या युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं. बलाढ्य रशियासमोर कोणत्याच बाबतीत तुल्यबळ नसलेला युक्रेन युद्धाच्या खाईत लोटला गेला. या दोन देशांमधल्या तणावाची पार्श्वभूमी पाहता हे युद्ध आश्चर्यकारक नसलं, तरी युक्रेनसाठी अकस्मात आलेलं संकट होतं. सैन्यबळाच्या बाबतीत दुबळ्या असलेल्या युक्रेनने शर्थीची झुंज दिली, परंतु आक्रमणाची तीव्रताच इतकी जबरदस्त होती की, युक्रेनियन सैन्याचं संख्याबळ कमी पडू लागलं. अखेर हे आक्रमण थोपवण्यासाठी थेट सामान्य युक्रेनियन नागरिकांनाच हातात शस्त्र घेण्याचं आव्हान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केलं. लागलीच घराघरातून तरुण पोरं, प्रौढ माणसं सैन्यात दाखल होऊ लागली. ज्यांनी कधी बंदूक पाहिलीही नव्हती अशा लोकांच्या हातात थेट एके-५६ रायफली देण्यात आल्या. युद्धभूमीत उतरलेल्या या नवख्या सैनिकांनी युक्रेनवरचं आक्रमण बराच काळ थोपवून धरलं. अजून युद्ध पूर्णपणे संपलेलं नसलं, तरी त्याची तीव्रता मात्र कमी झाली आहे. बंदुका हातात घेतलेले ते सामान्य नागरिक आपापल्या घरी परतू लागलेत. मानसिक आजारांचं आव्हान या लोकांच्या पावलांमागून एका वेगळ्याच समस्येने तिथल्या घरांमध्ये प्रवेश केला आहे. या घरी परतलेल्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रॉमा, डिप्रेशन आणि इतर मानसिक विकार जडल्याचं दिसून येतंय. एवढंच नव्हे, तर ते आता आपल्या पत्नीला किंवा घरातील इतर लोकांनाच शत्रू समजून त्यांच्यावर हल्ले करत असल्याच्या बातम्याही येत आहेत. युद्धानंतर युक्रेनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. असुरक्षिततेमुळे आणि मारहाणीच्या भीतीमुळे महिला घर सोडून गेल्याच्या घटना घडत आहेत. वर्षभर युद्धाच्या सावटाखाली वावरलेल्या या लोकांच्या बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्याचं युक्रेनसमोरचं हे संकट किती भीषण आहे, याची प्रचिती येतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आजघडीला युक्रेनमध्ये सुमारे १ कोटी ३० लाख लोक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. त्यापैकी ४० लाख लोकांना गंभीर मानसिक आजार झाले आहेत. डिप्रेशन, स्ट्रेस अँक्झायटी, पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर असं या विकारांचं स्वरूप आहे. या निमित्ताने युक्रेनियन नागरिकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न आणि या युद्धामुळे एकंदरच जगावर झालेल्या परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ‘वॉर ट्रॉमा’चा गहिरा घाव युद्धाच्या काळात बसलेल्या मानसिक धक्क्याला ‘वॉर ट्रॉमा’ असं म्हटलं जातं. आपल्या देशावर, आपल्या जवळच्या लोकांवर होणारे हल्ले, त्यांचं जखमी होणं किंवा मृत्यू होणं या गोष्टी व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम करतात. ही वेळ आपल्यावर केव्हाही येऊ शकते, अशी सततची भीती भरून राहिल्याने तणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक अवस्था हळूहळू वाढू लागतात. युद्धकाळात देशाचं, आपल्या शहराचं, समाजाचं आणि पर्यायाने आपलं पुढे काय होणार, आत्ताची परिस्थिती बदलून ती पुन्हा पूर्ववत होणार की नाही याबद्दलची अनिश्चितता हे मानसिक तणावाचं आणखी एक कारण. या अनिश्चिततेतून भविष्याबद्दलची असुरक्षितता जन्म घेते. युक्रेनमध्ये सध्या अशा प्रकारच्या मानसिक रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग ८ महिने चाललेल्या सशस्त्र नागरी संघर्षात ६ हजारांहून जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर ९ ते १० हजार लोक जखमी झाले आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्यानंतरच्या मानसिक धक्क्यातून अजून तिथली जनता सावरलेली नाही. येत्या काळात हा घाव अधिक गहिरा होत जाण्याची चिन्हे आहेत. युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने येत्या काळात दीड कोटी नागरिकांना मानसोपचाराची गरज भासणार असल्याचं म्हटलं आहे. युद्धादरम्यान अत्यंत धक्कादायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या लोकांमध्ये नैराश्य, अँक्झायटी, अमली पदार्थाचे सेवन करण्याची सवय असे अनेक मानसिक विकार बळावण्याची शक्यता असते. युद्धाच्या प्रत्यक्ष प्रभाव क्षेत्रात असलेल्या ५ पैकी एका व्यक्तीला मानसिक आजारांचा सामना करावा लागतो, हे जागतिक पातळीवरील संशोधनातून दिसून आलं आहे. युक्रेनही याला अपवाद राहिलेला नाही. युक्रेनमधील २२ टक्के लोकसंख्येला येत्या १० वर्षांत गंभीर मानसिक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. संघर्षाच्या दरम्यान अनेक सरकारी दवाखान्यांना, मनोरुग्णालयांना लक्ष्य केले गेले. त्यात असंख्य डॉक्टर, आरोग्य कर्मचारी मारले गेले. त्यामुळे उपचार करू शकणाऱ्या कुशल डॉक्टरांचे संख्याबळही तोकडे पडू लागले आहे. फर्स्ट सोशल मीडिया वॉर युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना तिथल्या हिंसक संघर्षाची मन हेलावून टाकणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ युद्धाच्या काळात वाऱ्याच्या वेगाने पसरले. फक्त युक्रेनमध्येच नव्हे, तर तिथून हजारो किलोमीटरवर असलेल्या भारतातील एखाद्या खेड्यात ती दृश्ये पाहिली गेली. वारंवार येणारे आणि वाढत जाणारे मृत्यूचे आकडे, जखमी झालेल्या लोकांचे व्हिडिओ यांचा भडिमार झाला. या सगळ्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम न होता तरच नवल! युद्धाची माहिती प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा झालेला वापर ही या युद्धातील विशेष बाब होती. गेल्या दोन दशकांत सोशल मीडिया ही गोष्ट आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली. या काळात सीरिया, अफगाणिस्तानसारखी अनेक युद्धे झाली, पण युक्रेनच्या युद्धात ज्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर झाला, तितका यापूर्वी तो कधीच झाला नसावा. एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभरात प्रसारित झालेली या युद्धाची माहिती पाहण्याचा, ऐकण्याचा काही परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर झाला असेल का? अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला तेव्हा नुकतीच घराघरात टीव्हीने जागा घेतली होती. ९/११ च्या भीषण हल्ल्याच्या चित्रफिती तेव्हा टीव्हीवर दाखवल्या गेल्या. या दहशतवादी हल्ल्याला ‘टेलिव्हिजन डिझास्टर’ असं म्हटलं गेलं. नंतर समोर आलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की, या हल्ल्याचे व्हिडिओ टीव्हीवर पाहिलेल्या लोकांमध्ये तणाव, नैराश्य अशा मानसिक आजारांचं प्रमाण जास्त आहे. रशिया - युक्रेन युद्धाला ‘फर्स्ट सोशल मीडिया वॉर’ म्हटलं गेलं. या युद्धाच्या काळात खोटी माहिती पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला गेला. त्यातून जास्तीत जास्त भीती आणि अनिश्चितता निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. आपल्या मोबाइलच्या स्क्रीनवर हे सगळं पाहणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या मनावर, विचारांवर या माहितीने प्रभाव टाकला असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आता आपण एका मर्यादेपलीकडे जगापासून दूर जाऊ शकत नाही. युद्ध, नैसर्गिक संकटं, अपघात यांसारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आता जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडत असल्या, तरी माणूस म्हणून तिथल्या लोकांशी आणि त्यांच्या वेदनांशी एकरूप होण्याचं म्हटलं तर चांगलं, म्हटलं तर वाईट असं स्वातंत्र्य आपल्याला सोशल मीडियाने देऊ केलं आहे. जगभरात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युद्ध ‘कन्झ्युम’ करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मनावरही या युद्धाच्या खुणा कोरल्या गेल्या आहेत. आता युद्ध नावाची गोष्ट कोणत्याही दोन देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण जगावर प्रभाव टाकणारी होऊन बसली आहे, हा धडा या युद्धाच्या आणि त्यानंतर युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानसिक आणीबाणीच्या परिस्थितीतून आपण घेतला पाहिजे. या युद्धामुळे तयार झालेला युक्रेनियन समाजाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न भीषण आहे. युक्रेन आपल्या ‘आत’ सुरू असलेल्या या युद्धात त्याच्या कुवतीप्रमाणे लढत आहे. जागतिक समुदायाच्या सहकार्याने हा लढा अधिक व्यापक आणि परिणामकारक होत असला, तरी एकूणच आपल्या समाजाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज या युद्धाच्या परिणामांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

स्नेहल ठाणगे thange.sneha.r@gmail.com