आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला दिन विशेष:​​​​​​​माफियासम्राज्ञींचे वास्तव चित्रण...

​​​​​​​उल्का राऊतएका महिन्यापूर्वीलेखक: उल्का राऊत
  • कॉपी लिंक

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर आजवर अनेक भाई, डॉन, कुख्यात गुंड यांचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, पुरुष गुन्हेगारांइतक्याच कारस्थानी, पाताळयंत्री आणि साहसी गुन्हेगार स्त्रियाही या अंडरवर्ल्डचा अविभाज्य भाग होत्या. त्यांचा थरारक परिचय म्हणजे ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक. एस. हुसेन झैदी आणि जेन बोर्जेस लिखित या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे उल्का राऊत यांनी... हा अनुवाद करताना या माफिया क्वीन्सची मानसिकता, व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी केलेले बंड आणि त्यांच्या अफाट रंजक चित्तरकथा यावर स्वत: उल्का राऊत यांनी केलेली ही मांडणी खास आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त...

‘पुरूषापेक्षा स्त्री अधिक धोकादायक असते’ - रुडयार्ड किपलिंग

गंगूबाईवर चित्रपट येतोय ही बातमी सध्या चर्चेत आहे. नेमकी कोण ही गंगूबाई ? हिच्या जीवनावर चित्रपट? तो बनवण्याइतकी ही महत्वाची आहे ? तिच्याविषयी बरंच कुतूहल निर्माण झालं. हिच्याशी माझी ओळख काही वर्षांपूर्वीच-माफिया क्वीन्सवरील पुस्तकाचा मी अनुवाद केला तेव्हा झाली. तोवर गंगूबाईच काय, एकाही माफिया क्वीनचं नाव मी ऐकलं नव्हतं. मूळात अशा क्वीन्स असू शकतात, नव्हे आहेत ह्याचीच जराही कल्पना नव्हती. अनेक क्रूरकर्मा, धूर्त आणि कपटी माफिया किंगविषयी ऐकलं-वाचलं होतं. त्यामुळेच तशा स्त्रियाही होऊन गेल्या. त्या क्रूर, कपटी, कारस्थानी होत्या, कदाचित पुरूषांपेक्षाही अधिकच, ही गोष्ट मला अतिशय विलक्षण आणि अविश्वसनीय वाटली. तसं वाटलं ह्यामागे कारण आहे. सर्वसाधारणत: स्त्रीची प्रतिमा कशी आहे? प्रेमळ. मृदु. संवेदनशील. सहनशील. क्षमाशील. ह्या प्रतिमेला छेद देणाऱ्या, प्रसंगी रणरागिणीचं, चंडिकेचं रूप धारण करणाऱ्या स्त्रिया आहेत. असाव्यातच. शतकानुशतकं त्या मुकाट्याने अन्याय सहन करत आल्या आहेत. रूढी, परंपरा, समाज, रीतिरिवाज अशा विविध दोरखंडांनी तिच्या मुसक्या बांधून तिचा आवाज बंद केला गेला. तू दुय्यम आहेस. तुला अक्कल नाही. तू आज्ञेचं फक्त पालन करायचं. का? कशासाठी? मीच का? हे आणि अशासारखे प्रश्न मोठ्याने तर विचारायचे नाहीतच, पण मनातही आणायचे नाही. हेच सतत कानाकपाळी बिंबवलं गेलं. बंडखोर स्त्रिया नसतील असं नाही, पण एखाद दुसरा क्षीण आवाज कोण ऐकतंय? ह्या माफिया क्वीन्स झुकल्या नाहीत. बंड करून उठल्या. लढल्या. म्हणून त्यांचं कौतुक. त्यांनी हिंसा करायला नको होती असा बेसूर कोणी लावेलही. पण त्यांच्यावर झालेले अन्याय, अत्याचार पराकोटिचे क्रूर होते. ते असह्य झाल्यावरच त्यांचा बंडाचा, सूडाचा,जिद्दीचा धगधगता प्रवास सुरू झाला. त्यामधे त्या स्वत:सुध्दा होरपळून निघाल्या. पण प्रत्येक स्त्रीला हा अनुभव आहेच. तुम्ही विरोध केला तर संघर्ष होणारच.पण नमायचं नाही. हा धडा प्रत्यक्ष गिरवणाऱ्या मुंबईच्या राण्यांच्या अफाट रंजक, वेधक चित्तरकथेने मी अक्षरश: थरारून गेले होते. गंगूबाई , जेनाबाई , सपनादीदी , महालक्ष्मी पापामणी ,मोनिका बेदी ह्या आणि अशा अनेक राण्यांशी ओळख झाली. प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी तितकीच खिळवणारी...गुंगवून टाकणारी...आणि तोंडात बोट घालायला लावणारी...अकल्पनीय घटनांची मालिका. महाधूर्त जेनाबाई. चावलवाली जेनाबाई. दारूवाली जेनाबाई. अख्ख्या डोंगरीमधे तिचा दरारा होता. पोलिस आणि माफिया जिला इज्जत द्यायचे अशी मुंबईच्या अंडरवर्ल्डची राणी. दाऊद इब्राहिम तिला आई मानायचा. हाजी मस्तान तिला आपा म्हणायचा. म्हणजे मोठी बहिण. अशी निरनिराळी भूमिका असलेली जेनाबाई आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी मोर्चामधे सामील होणारी, दिवसभर घोषणा देत रस्त्यावरून हिंडणारी गांधीजींची समर्थक जेनाबाई. एकाच व्यक्तीची किती विविधं रूपं. तिचा जीवनप्रवास कमालीचा वेधक आणि थरारक आहे ह्यात नवल नाही. चौदाव्या वर्षी निकाह. पाच मुलं झाली. फाळणीनंतर नवऱ्याला पाकिस्तानला जायचं होतं. जेनाने ठाम नकार दिल्यावर तो बायकोमुलांना सोडून खुशाल निघून गेला. पाच मुलांना वाढवायची जबाबदारी जेनावर पडली. त्याकाळी रेशनवर धान्य दिलं जायचं, तेही पुरेसं नसे. नाईलाजाने लोक काळ्या बाजारातून धान्य घेत. जेनाला पैसे कमावायचा मार्ग सापडला. घाऊक धान्य विक्रेते आणि तेच धान्य चढ्या भावाने विकणारे किरकोळ दुकानदार ह्यामधील दुवा बनली ती. घाऊक बाजारातून धान्य आणायचं. ते किरकोळ दुकानदारांना विकायचं. ह्याबद्दल तिला दलाली मिळायची. ह्यानंतरच तिला ‘जेनाबाई चावलवाली’ ह्या नावाने लोक ओळखू लागले. चावलवाली पुढे दारूवाली कशी झाली ह्याचा किस्साही रंजक आहे. १९५० साली मुंबईमधे दारूबंदी जाहिर झाली. परिणामत: दारूचा बेकायदा धंदा आणि तस्करी सुरू झाली. जेनाबाईने इक्बाल गांधीशी पुनर्विवाह केला होता पण तो काही कमवत नव्हता. धान्याच्या दलालीतही फार कमाई होत नव्हती. जेनाबाईला हलाखीच्या परिस्थितीचा वीट आला. तिला त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवला वरदाराजनने. खतरनाक डॉन. गंमत म्हणजे तमिळ वरदाराजन मुनीस्वामी मुदलियार तिला बिस्मिल्ला शाहबाबांच्या दर्ग्यात भेटला. ती नियमितपणे दर्ग्यात जायची. वरदाराजनही तिथे जात असे. जेनाबाई धाडस करून त्याच्या जवळ गेली. काहीतरी मार्ग दाखवा म्हणाली. त्याने दारूचा धंदा करशील का विचारलं तेव्हा तिला धक्का बसला. असा धंदा करणं तिच्या धर्माविरूध्द होतं. पण बऱ्याच विचारांती जेनाबाई तयार झाली. जन्मजात हूशारी आणि पोलिसांना लपेटण्यामधली चतुराई ह्यामुळे धंदा तेजीत सुरू झाला. चावलवालीची दारूवाली व्हायला वेळ लागला नाही. वरदानेच तिची मस्तानशी ओळख करून दिली. पोलिसांनी तिच्या घरावर वारंवार धाडी घातल्या, पण दर वेळी ती अलगद सुटायची. दारूचा साठा घरातच असे. एका कोपऱ्यात देवदेवतांच्या तसबिरी लावलेल्या असत. त्यामागे दारूचा पेटारा असे. पोलिस तिथे हात लावायचे नाही.एकदा मात्र रंगेहाथ पकडली गेली. अटकेनंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना ती भेटली. तेव्हा नेमकं काय घडलं माहित नाही,पण जेलमधून बाहेर पडल्यानंतर ती पोलिसांची खबरी बनली हे खरं आहे. मात्र सर्वात धाकट्या लाडक्या लेकाच्या खूनाचा बेत झालाय ही खबर तिला मिळाली नाही. त्याच्या मृत्युने ती खचलीच. त्यातून करीम लाला, मस्ताननेच तिला सावरलं. पुढे गुन्हेगारी जगतातील दोन अति शक्तीवान गटांमधे मैत्रीपूर्ण तह झाला त्यामागे जेनाबाईची चतुराई आणि मुत्सदीपणाचा फार मोठा हात होता. एका अशिक्षित बाईच्या दबदब्याची, खतरनाक माफिया किंग्जना तिच्याविषयी वाटणाऱ्या आदराची पावती होती ती. गंगूबाईवर चित्रपट बनतोय हे योग्यच आहे. कारण तिची कहाणी अत्यंत नाट्यमय, फिल्मी म्हणतात तशी आहे. उच्चशिक्षित खानदानी घरात जन्मलेल्या केवळ सोळा वर्षांच्या गंगाची परवड आणि फरफट सुरू झाली हिशेबनीस रमणिकबरोबर मंदिरात गांधर्व विवाह करून ती मुंबईला पळून आली तेव्हापासून. लॉजमधे आठ दिवस राहून दोघांनी मजा केली. अर्थात रमणिकच्या सांगण्यावरून तिने घरून चोरलेले पैसे आणि आईचे दागिने होतेच. रमणिकचं काम झालं. त्याने ‘लॉज परवडत नाही.मी खोली शोधतो, तोपर्यंत तू माझ्या मावशीकडे राहा’ असं सांगितलं. तिला घ्यायला स्वत: मावशी लॉजवर आली. सतत पान चघळणाऱ्या मावशीला पाहून गंगाचं मत फारसं बरं झालं नाही. त्या दोघींनी टॅक्सीत बसवून रमणिकने पोबारा केला. शीलामावशीने गंगाला फसवून थेट कामाठीपुऱ्यात आणलं. गंगाची गंगूबाई होण्याचा प्रवास त्या क्षणी सुरू झाला. गंगा पुढील कैक दिवस रडत होती. नवऱ्याने पाचशे रूपयात आपला सौदा केला ही गोष्ट तिच्या जिव्हारी लागली. मारझोड, उपासमार, चोवीस तास पहारा ह्यामुळे पळून जाता येईना.जीव देणंही शक्य नव्हतं. अखेर दोन आठवड्यांनी ती परिस्थितीला शरण गेली. सांगेन तशी वागेन असं म्हणाली तेव्हा शीलामावशीने तिला आनंदाने मिठीच मारली.

त्याच रात्री गंगाची नथ उतरवली गेली. शेठने खूश होऊन तिला खूप सारे पैसे, शिवाय सोन्याची अंगठीही दिली.त्या रात्रीनंतर गंगू धंद्याला सरावली. गि-हाईकाला खूश करायचं कसब असल्याने तिला फार मागणी असे. परिस्थितीमुळे निरागस, भोळीभाबडी गंगा पार बदलली. कठोर,पक्की व्यावहारिक धंदेवाली झाली. एक उभाआडवा दांडगा विकृत आणि आत्यंतिक क्रूर पठाण तिचे अतिशय हाल करायचा. दुसऱ्या वेळी तर तिला रूग्णालयात दाखल करावं लागलं. कित्येक आठवडे. गंगूला हे असह्य झालं. तिने त्याचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं.आधी त्याची माहिती काढली. नाव शौकत खान. करीम लालाच्या टोळीत आहे हे समजलं. गंगू आणि करीम लालाच्या भेटीचा प्रसंग अत्यंत हृद्य आहे. तो नमाज करून घरी परततांना तिने त्याच्या घराजवळ त्याला गाठलं. त्याच्याशी बोलतांना ती घाबरली नाही. ती वेश्या आहे हे लालाच्या लक्षात आलं. रस्त्यात बोलणं बरं दिसत नाही. घरी चल म्हणून तो ताडताड चालू पडला. त्याने शौकतचा बंदोबस्त केला. ती त्याला भाऊ मानायची. त्यानंतर गंगूला त्रास द्यायचं धाडस कोणीही केलं नाही. तरूण वयातच ती घरवाली म्हणून निवडून आली. गंगूबाई काठेवाली. काठेवाली हा कोठेवालीचा अपभ्रंश. कोणाही मुलीला जबरदस्तीने धंद्याला लावायचं नाही असा निर्णय तिने घेतला. स्त्रियांना पैशापेक्षा अधिक महत्व देणारी स्त्रियांची कैवारी असा तिचा लौकिक होता. पुढे तिला बडे घरवाली हे पदही मिळालं. कोठ्याची सर्वेसर्वा. एकदा आझाद मैदानात महिला परिषदेत तिने वेश्यांची बाजू अत्यंत तळमळीने आणि मुद्देसूदपणे मांडली. पुढे कामाठीपुरा आमच्या सभ्य वस्तीत नको म्हणून स्थानिक लोक आणि नजिकच्या शाळेच्या अधिकाऱ्यांंनी फार मोठं आंदोलन छेडलं. तेव्हा गंगूबाईने प्रत्यक्ष नेहरूंची भेट घेतली. वेश्यांना न्याय मिळवून दिला.तिचा बिनतोड मुद्दा त्यांना पटला- ‘शंभर वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वेश्यावस्तीच्या बाजूला मूळात शाळा बांधलीच का ?’ सोळाव्या वर्षापासून संघर्षमय जीवन जगत आलेल्या गंगूने अनेक संघर्षांना यशस्वी लढा दिला. ‘कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी’ अशा गंगूबाईचा फोटो तिथल्या प्रत्येक खोलीत आढळतो. अशरक आणि सपनादीदी... भाबडी, निरागस, नवऱ्यावर जीवापाड मोहोब्बत करणारी, व्यवहारी जगाची जराही समज नसलेली अशरफ. आणि नवऱ्याच्या हत्येमुळे हादरून गेलेली, दु:खाने वेडीपिशी झालेली आणि त्याच्या मारेकऱ्यावर सूड उगवायचा,त्याला खतम करायचं ह्या एकाच गोष्टीचा ध्यास घेतलेली, त्यासाठी वाटेल त्या थराला जायची तयारी असलेली सपना. दोघी एकच. अशरफचं सपनादीदीमधे झालेलं परिवर्तन थक्क करणारं आहे. कायम बुरखा घालणारी अशरफ पिस्तूल चालवायला शिकते.त्यासाठी हसेन उस्तरा ह्या गॅंगस्टरकडून तिने धडे घेतले. गोळी झाडून तिला त्या हत्याराला ठार करायचंय. आणि तो कोण होता? सर्वात बलाढ्य आणि सामर्थ्यवान डॉन दाऊद! भले भले त्याचं नाव ऐकून भीतीने थरथर कापत आणि ही वेडी त्याला दुबईत जाऊन मारायची स्वप्नं पाहात होती. त्यामागील धोके,अडचणी तिला समजल्या नाहीत.किंवा समजल्या तरी तिला पर्वा नव्हती. जीवावर उदार होणं म्हणजे काय ह्याचं मूर्तीमंत उदाहरण होती सपना. दाऊदचा खातमा करण्यासाठी तिने जे काही प्रयत्न केले ते मूळातच वाचण्यासारखे आहेत. पण दीर्घकाळ मी तिला विसरू शकले नाही हे मात्र खरं. सपनाचा भीषण अंत काळजाला घरं पाडतो. तिच्या शरीराबरोबर तिच्या स्वप्नाच्याही चिंधड्या उडाल्या. तिच्या साहसाचं, जुनूनचं कौतुक वाटतं. महालक्ष्मी पापामनी ही तर मादक पदार्थांचा व्यापार करणारी मुंबईची महाराणीच! अत्यंत गरीबीतून ती महाराणी कशी बनली हा तिचा थरारक जीवनप्रवासही वेधक आहे. अशा कितीतरी राण्या ह्या पुस्तकात भेटल्या. आशा गवळी,नीती नाईक,पद्मा पुजारी,मोनिका बेदी, बारबाला तरन्नुम खान,अर्चना शर्मा उर्फ मनीषा, छोटा शकीलकी मोटी गर्लफ्रेंड रूबिना-हिच्या धिप्पाड देहामुळे तिला पठाणही म्हणत-,मिसेस पॉल...कितीतरी नावं. प्रत्येक राणी आपापल्या परिने वैशिष्ट्यपूरण. खास. साऱ्याच साहसी, धाडसी, परस्थितीला शरण न जाता झुंजणाऱ्या,अन्यायाला कडाडून विरोध करणाऱ्या ,हूशार,प्रसंगी कपटी आणि धूर्त वागणाऱ्या, नीडर, कठोर...

पण आपणा सर्वांमधे हे गुण कमीजास्त प्रमाणात आहेतच. मात्र ह्याची जाणीव प्रत्येकीला व्हायला हवी. ‘मला देवीपद नको. मी दासीही नाहीच. मी राणी आहे. मी विचार करू शकते. योग्य निर्णय घ्यायची कुवत माझ्यात आहे. मला दाबून टाकायचा प्रयत्न केला तर दुप्पट जोमाने उसळी घेईन ‘ हे स्वत:ला पटवून दिलं की पुढचं सारं सोपं होईल. आत्मविश्वास असेल तर स्त्री काहीही करू शकते. हे कायम लक्षात असू दे. महिला दिनी इतकंच लक्षात ठेवा...

सावली....

ती कडक उन्हात उभी अनंतापासून सावली देणाऱ्या छताच्या अपेक्षेत... पण बये थांबू नकोस तिथेच... उन्हात उभं करणाऱ्यांकडून सावलीची अपेक्षा करतेस हे चूकच... सावलीच्या शोधात तूच नीघ आता... कधीतरी थंडावा मिळेल... ह्या आशेवर पावलं टाकत राहा... तेव्हाही झळा लागतीलच... पण ते दूरवरचं छत घेईलच सावलीखाली... तिथे विसावून बस निवांत... तुझ्या हक्काच्या स्वत: शोधलेल्या गारव्यामध्ये... ulkaraut211@gmail.com (लेखिका मराठी साहित्याच्या प्रख्यात अनुवादक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...